ईडीची काडी आणि जीएसटीची कॉमेडी!
चिपळूण तालुक्यातील सावर्डेनजिक काल एका कात व्यावसायिकावर जीएसटीची धाड पडल्याची चर्चा सर्वत्र आहे. काही वर्तमानपत्रातूनही त्याबाबतचे वृत्त आहे. मागच्याच महिन्यात सावर्डे येथील बड्या कात व्यावसायिकावर ईडीचा छापा पडला होता. काही महिन्यांपूर्वीही तिथेच इन्कमटॅक्स, जीएसटीवाल्यांची रेड पडली होती. या सर्व प्रकारामुळे परिसरात चर्चा होणं, बातमीदार या ना त्या मार्गाने बातम्या मिळवत राहणं आणि त्या प्रसिद्ध करणं या गोष्टी नेहमीच्याच झाल्यात.
पण, मुद्दा हा आहे की या तपास यंत्रणा नेमकं काय करतात, कशासाठी येतात, दोन दोन – चार चार दिवस तळ ठोकून काय करतात, त्यांना काय सापडतं, काही संशयास्पद, बेकायदेशीर सापडलं तर त्याचं पुढे काय होतं या सगळ्यापासून प्रसारमाध्यमाना दूर ठेवलं जातं. पर्यायाने जनतेला दूर ठेवलं जातं. प्रत्यक्ष छापा किंवा कारवाई चालू असेल तर त्यात कोणाचा डिस्टरबन्स नको हे मान्य करता येईल. पण सगळं झाल्यावरही तेथील स्थानिक मीडियाला योग्य ती माहिती कां दिली जात नाही? तशी दिली गेली तर उलटसुलट चर्चा, अफ़वा पसरण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
बरं त्यातूनही लोकल लेव्हलला काही माहिती देणं, मीडियाशी बोलणं त्यांच्या कार्यपद्धतीत बसत नसेल तर किमान त्यांच्या पोर्टलवर प्रेसनोट देऊ शकतात. तेथून मीडिया आणि जनतेला योग्य ती माहिती मिळू शकते. तपासात अडचण येणार नाही एवढी किमान कारवाईची माहिती देण्यास काहीच हरकत नाही. परंतु या तपास संस्था, त्यांचे अधिकारी आपला आणि जनतेचा काहीच संबंध नाही, आपण जनतेला माहिती देण्यास बांधील नाही अशाच तोऱ्यात वावरतात. शेवटी या देशातील सरकारी यंत्रणा या जनतेच्या सेवक आहेत. त्यांनी स्वतःला संस्थानिक समजू नये. या संस्था नेमकं काय करतात, त्याचा उपयोग होतो की नाही, गैरकृत्य करणाऱ्या, काळाबाजार करणाऱ्या, अवैध रितीने संपत्ती करणाऱ्या, टॅक्स चुकवणाऱ्या लोकांवर वचक बसतो की नाही, त्यांच्यावर शेवटपर्यंत कारवाई होते की नाही याचा काही पत्ता लागून दिला जात नाही. सामान्य आणि मध्यमवर्गीय माणसाला अक्षरशः ‘ व्याप ‘ करणाऱ्या या संस्था मोठमोठे राजकारणी, उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, व्यापारी, वाळू, खाण, जमीन अशा विविध प्रकारचे माफिया, भ्रष्ट अधिकारी – कर्मचारी यांच्या ताटाखालचं मांजर होतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यावर कातडं ओढलं जातं. आणि या लोकांवर कारवाई केली तरी बहुतांश वेळेला ही ‘नाटकं ‘ च असतात, त्यातून पुढे काही होत नाही हे सामान्य जनतेला पक्के माहिती झालं आहे. गेल्या काही वर्षांत ईडी चर्चेत आली. ईडी बद्दल तर लोकांना विश्वासच राहिला नाही. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षातील लोकांसाठी वापरायचं एक हत्यार एवढीच ईडीची ओळख राहिली आहे. ईडी स्वतंत्र आणि प्रामाणिक असती तर सत्ताधारी पक्षातीलही अनेकजणं आज तुरुंगात असायला हवे होते. पण तसं दिसत नाही. उलट ईडीचा धाक दाखवून आपल्या विरोधातील राजकारणी, उद्योजक अशांना आपल्याकडे खेचले जाते. ईडीच्या धाकाने काहीजण आपले आपणच सत्ताधारी पक्षात प्रवेश करतायत. ईडी काय करते तर सोईस्कर ठिकाणी ‘ काडी ‘ टाकते आणि तिथे आग धूमसेल असं बघते आणि संभ्रम निर्माण करते. ईडीने केलेल्या कारवाया आणि त्यातून शिक्षा झालेल्या लोकांचे प्रमाण फारच व्यस्त आहे. हेच इन्कमटॅक्स वाल्यांचं आणि जीएसटी वाल्यांचं. त्यांचा धाक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसाला, लहान लहान व्यवसायिकांना. मोठमोठे मासे उघडपणे ‘ कुबेराशी ‘ स्पर्धा करत आहेत, आपले काळे उद्योग बिनधास्त चालवत आहेत त्यातून आलेल्या अफाट संपत्तीचा माज समाजासमोर दाखवत आहेत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही या आविर्भावात वावरत आहेत, ईडी, इन्कमटॅक्स, जीएसटी आणि अशा अनेक संस्था आमच्या खिशात आहेत याचा त्यांना अभिमान आहे.
सर्वसामान्य माणसालाच नव्हे तर सर्वांनाच सर्व कळत असतं, दिसत असतं की अल्पावधीत मेहनत करुन, सचोटीने वागून कोणी कुबेर होत नाही. पण आपल्या समाजात त्यांनाच मोठेपणा आहे. राजकारणात त्यांचीच चलती आहे. सामान्य माणसाला दिवसाचा, महिन्याचा खर्च कसा भागवायचा याची चिंता आहे तर समाजातला असा एक वर्ग आहे की त्याला पैसे उडवण्यासाठी नवनवीन ‘ मार्ग ‘ शोधावे लागत आहेत. गरीब अधिक गरीब होतोय तर काळे धंदे करणारे अधिक काळे होत आहेत. आणि
‘ काळे ‘ असण्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. कौतुक आहे. ईडीची काडी त्यांना काही करू शकत नाही आणि तें जीएसटीची कॉमेडी एन्जॉय करतात. इन्कमटॅक्सला तें पायपुसणं समजतात.
या देशातील जे काही नियम, कायदे आहेत तें सामान्य आणि प्रामाणिक माणसांसाठी आहेत… गैरधंदे करणाऱ्यांसाठी नाहीत. सर्व प्रकारच्या यंत्रणा या त्यांच्या बटीक आहेत.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

