उपनगराध्यक्षपदी रुपाली दांडेकर!

चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदी रूपाली दांडेकर बिनविरोध

स्विकृत नगरसेवकपदी फैसल कास्कर,

विकी लवेकर,शितल रानडे यांची निवड

 

चिपळूण, ता. १२ ः गेल्या काही दिवसांपासून लक्षवेधी ठरलेली उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. भाजपच्या रूपाली दांडेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्विकृत नगरसेवक पदासाठी उद्धव सेनेचे फैसल कास्कर, शिंदे सेनेचे विकी लवेकर आणि भाजपच्या शितल रानडे यांची निवड करण्यात आली. या निवडी दरम्यान सर्व नगरसेवकांनी शहरासाठी विकासासाठी एकजुठीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्राच्या तालीम सभागृहात ही विशेष सभा घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी काम पाहिले. सर्व प्रथम उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र मागवण्यात आले. त्यासाठी भाजपच्या रूपाली दांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर स्विकृत नगरसेवकपदासाठी फैसल कास्कर, विकी लवेकर व शितल रानडे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले, निवडणूक होताच राजकारण संपले आणि समाजकारण सुरू झाल्याची भावना व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मी आपल्या सर्व नगरसेवकांसोबत एकदिलाने व राजकारण विरहीत काम करणार आहे. चिपळूण शहराचा नगराध्यक्ष या भावनेतून प्रत्येक नगरसेवकाला सोबत घेऊन काम करण्याची तयारी ठेवली आहे. तेव्हा नगरसेवकांनी साथ द्यावी. यानंतर भाजप गटनेते शशिकांत मोदी, उद्धव सेनेचे विकी नरळकर व शिंदे सेनेचे निहार कोवळे यांनी एकमेकांचा मान ठेवून सभागृहात यापुढे कामकाज करण्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच नरळकर व कोवळे यांनी खिलाडू वृत्तीने उपनगराध्यक्षपदासाठी विरोधी अर्ज दाखल केला नाही. त्याच पद्धतीने यापुढे विरोधक म्हणून दुजाभाव न करता विकास कामात सर्वांना समान न्याय मिळावा, अशी विनंती केली. उपनगराध्यक्षा दांडेकर म्हणाल्या की, आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात आपण काम केले आहे. मात्र आता उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून नव्या क्षेत्रात संधी मिळाली आहे. या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

या निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाजपचे नेते प्रशांत यादव, माजी आमदार डॉ. विनय नातू, सिमा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भूरण, मंगेश तांबे, विजय चितळे, आशिष खातू, रिहाना बिजले, सुवर्णा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *