असावा सुंदर काताचा बंगला…

आमच्या लहानपणी ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…’ हे बालगीत खूपच प्रसिद्ध होतं… बच्चे कंपनीचे ते आवडतं होतं. मात्र आताच्या काळात कात व्यवसायातील भरभराट बघून, त्यातून येणारा चमचमाट बघून कात व्यवसायिकांच्या आणि इतर सर्वसामान्य मुलांनाही ‘ असावा सुंदर काताच्या चॉकलेटचा बंगला ‘ असं प्रकर्षाने वाटू लागले आहे. इतके आकर्षण आणि वलय या व्यवसायाला आणि तो करणाऱ्यांना आले आहे. प्रत्यक्ष कुबेर महाराजानाही खंत वाटत असावी की आपण कात उद्योग का केला नाही? ‘ साधू – संत येती घरा तोचि दिवाळी – दसरा ‘ हे आपल्यासाख्या सर्वसामान्य माणसांसाठी ठीक आहे. पण कात व्यावसायिक आहेत (अपवाद सोडून)त्यांच्या घरी, (कारखान)दारी इन्कम टॅक्स, जीएसटी, फ़ॉरेस्ट, प्रदूषण, ईडी चे अधिकारी आले, पाच पन्नास जणांचे पथक आले की, दोन – चार दिवस राहिले की किती आनंद होतो म्हणून सांगू… दिवाळी – दसऱ्याचा आनंदही फिका पडतो त्यापुढे. बरं हा आनंद वारंवार मिळावा म्हणून किती प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, डोकं वापरावे लागतं. मुळात गणित चांगलं असावं लागतं. एवढ्या पैशाचा हिशोब ठेवणं, बेहिशोबी पैशाचाही हिशोब ठेवणं, सरकारला ‘योग्य तो’ टॅक्स भरला जाईल याची खबरदारी घेणं, आजूबाजूच्या नद्या – नाले यांचे काताच्या पाण्याने शुद्धिकरण करणे असं बरंच काही करावं लागतं. त्याशिवाय वरचे ‘पाहुणे’ येत नाहीत आणि आनंदही मिळत नाही.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात खैर झाडाच्या तोडीसाठी लागणारी परवानगीची अट शासनाने शिथिल केली आहे. त्यामुळे कात उद्योजक आणि फ़ॉरेस्टवाले यांच्या डोक्याचा ताप गेला आहे. वजनदार लोकप्रतिनिधीनी यासाठी प्रयत्न केले व ते यशस्वी झाले. त्यातून अनेकांनी स्वतःच्या आणि इतरांच्याही कात उद्योगाची भरभराट केली. पण या भरभराटीतूनच स्पर्धाही वाढली आहे. शत्रूत्वही वाढीस लागले आहे. कात व्यवसायातील भरभराट ही पानमसाला, गुटखा अशा ‘औषधी’, तरुण पिढी घडविणाऱ्या, मजबूत करणाऱ्या घटकातून येत असल्याने ती समाजसेवा, देशसेवा या ‘उच्च श्रेणीत’ मोडते. त्यातूनच अनेकांचा ‘घोडा’ वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. त्यातून प्रेरणा घेऊन मग अनेकांना पंख फुटले. तेही जोरात उडू लागले. प्रसंगी एकमेकांचे पंख छाटू लागले.

दोन दिवसांपूर्वी सावर्डे येथे एका कात उद्योगावर ईडी ची धाड पडली. अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी मालक स्वगृही येईपर्यंत तिथेच तळ ठोकला. त्यातून काय निष्पन्न होणार की नाही होणार, नेहमीप्रमाणे धुरळा उडणार आणि खाली बसणार हे कळायला थोडा वेळ जाईल. पण या धाडीने नेहमीपेक्षा जास्तच खळबळ उडाली (अर्थात लोकांच्यात… मालकांच्यात असेल असं नाही.. कदाचित नेहमीचेच पाहुणे म्हणून गुलाब पाकळ्या उधळून स्वागतही केलं असेल ) हे मात्र खरं. त्यावर खुद्द सावर्डे आणि परिसरात, तालुक्यात अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या, ऐकू आल्या. कोणाला वाटलं भाजपवाल्यांचे काम असेल. सामंत बंधूनचा माणूस म्हणून केलं असेल. काहींनी थेट भावाभावातील सुप्त संघर्षावर बोट ठेवत हा उद्योजक जास्त करुन किरणजींकडे असल्याने उदयजींनी शाळा केली असेल असेही सांगण्यास कमी केले नाही. काहींनी कात उद्योगातील दोन संघटनातील स्पर्धेवर बोट ठेवलं. काताच्या रसाच्या 95 टक्के धरणावर ‘धाड फेमस’ चा कब्जा असल्याने बाकीचे नाराज आहेत. त्यांच्या काताचा कडुपणा अधिक वाढला आहे. ही धाड कदाचित या स्पर्धेतूनही असू शकते. आणखी एक चर्चा जोरात होती की राहू – केतूची फ्रेंडशिप जोरात होती पण काही महिन्यांपूर्वी घराचे वासे फिरले आणि ही मैत्री तुटली. ‘केतू’ ने आपली ‘पॉवर’ दाखवण्यासाठी तर काही कांड केलं नसेल अशीही शंका व्यक्त झाली. काहींनी हळहळ व्यक्त केली असेल दाखवण्यापूर्ती आणि रात्री बारला सेलिब्रेशनही केलं असेल अशीही चर्चा होती. अर्थात ‘धाड एक आणि चर्चा अनेक ‘ असा हा प्रकार आहे. खरं खोटं काय ते मालक आणि ईडीवाले जाणोत. सर्वसामान्य माणसाच्या डोक्यापलीकडचा हा विषय आहे. याच व्यवसायात असं नव्हे इतरही अनेक व्यवसायात खऱ्यापेक्षा खोटं जास्त केल्याशिवाय कोणी अतिश्रीमंत झालाय असं वाटत नाही. सचोटीने व्यवसाय झाले असते, नैतिकतेचे राजकारण झाले असते तर तर देशात इन्कम टॅक्स, ईडी आणि इतर यंत्रणांची गरजच लागली नसती. अर्थात हा फारच सात्विक विचार झाला, पण किमान भ्रष्टाचाराची, अनैतिकतेचि, खोटेपणाची किमान पातळी तरी ओलांडली जाऊ नये. अति तेथे माती हा निसर्गनियम आहे आणि तो कोणालाही चुकलेला नाही. सत्तेचा, पैशाचा माज हा फार काळ टिकत नाही एवढं जरी संबंधितानी लक्षात घेतलं तरी खूप झालं.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *