कर्नाटकातले रस्ते!

 

चांगले रस्ते हा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक भाग आहे… मग हा विकास एखाद्या विभागाचा असो, राज्याचा असो वा देशाचा! आजच्या गतिमान काळात दर्जेदार रस्त्याचे जाळे असणे गरजेचे झाले आहे. मात्र, आपण कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातली बहुतांशी जनता याबाबतीत अभागी आहे, दुर्दैवी आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या काळातही महाराष्ट्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहिली की, अनुभवली की संताप होतो. जनतेला चांगले, दर्जेदार, वर्षानुवर्षे सुस्थितीतील रस्ते दिले तर आपण नरकात जाऊ अशी भीती आपल्या राज्यकर्त्यांना, संबंधित अधिकारी, अभियंता आणि ठेकेदारांना वाटत असावी. जास्तीजास्त रखडपट्टी आणि टक्केवारी ही आपली ओळख पुसली जाऊ नये यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. बाहेर फार जाण्याची गरज नाही. आपल्या राज्यकर्त्यांचे, अधिकारी, ठेकेदार यांचे ‘असामान्य कर्तृत्व’ सिद्ध करण्यासाठी मुंबई – गोवा हायवे, चिपळूण – कराड हायवे, चिपळूण – गुहागर, खेड – दापोली, रत्नागिरी – कोल्हापूर हे आणि असंख्य लहानमोठे रस्ते (नाईलाजाने रस्ता म्हणायचे ) पुरेसे आहेत. काय ती कामं, काय ते नियोजन, काय ते तंत्रज्ञान, काय ती शिस्त, काय तो दर्जा… बोलायची सोय राहिलेली नाही. या सर्वांची नावं इतिहासात डांबराने किंवा सिमेंटने लिहिली जातील यात शंका असू नये.

पर्यटन वाढले पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, आरोग्य सुविधा, उपचार गतीने मिळाले पाहिजेत असं फक्त भाषणात बोलायचं प्रत्यक्ष वास्तव मात्र भयंकर, भीषण! पर्यटकांची हाडं खिळखिळी झाली पाहिजेत, व्यावसायिक वाहनांचा वेळ आणि इंधन वाया गेला पाहिजे, रुग्णवाहिका वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोचता कामा नयेत, सर्वसामान्य जनतेलाही मजबूत रोड टॅक्स, टोल लावून गाडीच्या ऐवजी होडीतून चालल्याचा अनुभव घेता आला पाहिजे असे अनेक हेतू समोर ठेऊन आपल्याकडे रस्त्यांची कामं कासवगतीने सुरु आहेत. आपल्या दोन तीन पिढ्या संपल्या तरी यांचे रस्ते होतील याची शाश्वती नाही.

महाराष्ट्रसारख्या प्रगत राज्यात रस्त्यांची दुर्दशा पाहून चीड येते. उद्वेग वाटतो. अशा परिस्थितीत बाहेरच्या राज्यातले दर्जेदार रस्ते पाहिले की त्या लोकांचा हेवा वाटतो. फिरण्याच्या निमित्ताने नुकताच कोस्टल तसेच मध्य कर्नाटकात जवळपास हजार किमी प्रवास झाला. गतवर्षीही कर्नातकातील अन्य काही भागात सहाशे सातशे किमी प्रवास झाला. राष्ट्रीय, राज्य महामार्गच नव्हे तर गावातील रस्त्यांनीही प्रवास झाला. खूपच छान अनुभव होता. इतके सुंदर रस्ते पाहून, अनुभवून प्रवासाचा क्षीण वाटलाच नाही. ऐसपैस, चकाचक, गुळगुळीत रस्ते, योग्य तिथे मार्गदर्शक फलक, दोन्ही बाजूने हिरवाई… कधी कधी वाटलं आपण परदेशात तर प्रवास करत नाही ना! आपल्याकडे जसा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तसाच तिकडे आहे. भौगोलिक रचनेत फरक नाही. भ्रष्टाचारातही आपल्यासारखीच कमी नाही, मात्र रस्ते सुंदर! तेल सांडलं तर सहज गोळा करुन घेता येईल असे गुळगुळीत! पोटातलं पाणी म्हणून हलणार नाही! (आपल्याकडच्या रस्त्यावर पोटात पाणी रहातच नाही. डचमळून बाहेरच पडणार ) तिकडे कदाचित पैसे खाण्यासाठी कामाच्या खर्चात वाढ करत असावेत पण मूळ खर्चात रस्ते चांगले करत असावेत. आपल्याकडे मूळ खर्चात वाढ करुन ते खाऊन उरलेल्यातले पण खायचे धोरण असल्यामुळे रस्ते न करता खड्डेच पाडायचे काम चालते.

पावसामुळे रस्ते टिकत नाही म्हणतात तर चिपळूण गुहागर रस्ता जो एन्रॉंच्या काळात झाला तो 25 वर्ष कसा टिकला… आता सगळीकडे सिमेंट रस्त्यांचे फॅड आले आहे. ते पावसातही खराब होत नाहीत असं सांगितलं जातं. असं असेल तर मुंबई गोवा हायवेवर वर्ष सहा महिन्यात सिमेंट रस्त्याची काय परिस्थिती आहे ती बघा… सगळा हायवे पूर्ण होईपर्यंत पहिलं झालेलं (खरं तर कसतरी उरकलेलं )काम अस्तित्वाच राहणार नाहीये. भिंग घेऊन चांगला रस्ता किंवा रस्त्याचा तुकडा शोधावा लागेल इतकं ‘ जागतिक ‘ दर्जाचे काम चालू आहे. पूर्वी महाल, किल्ले, मंदिरे यांची बांधकामे दोन – तीन पिढ्यापर्यंतही चालू असल्याचे इतिहास सांगतो. तसंच काहीसं मुंबई – गोवा हायवे, कराड रोड, रत्नागिरी कोल्हापूर हायवे यांचं होईल असं वाटतं.

आपल्याकडे झालेल्या रस्त्याना लेव्हल हा प्रकार नाही. कधी अचानक खड्डा येईल याचा नेम नाही. जोडाच्या ठिकाणी चार पाच इन्चाची तरी गॅप आहे की त्यामुळे गाडी दणकली पाहिजे, गाडीतील प्रवाशांची डोकी आपटली पाहिजेत. रस्त्यात मध्येच उगाच दोन चार फुटापासून अर्धा – पाव किमी कच्चा रस्ता का ठेवेलेला असतो, तेवढ्याच भागात काय अडचण असते ते देवच जाणो. बरं असं एखाद्या ठिकाणी नाही तर जागोजागी दिसतं. त्यातून अभियंते, ठेकेदार यांचा काय हेतू असतो तो तेच जाणोत. डायव्हर्जनचे बोर्ड, बाण, सूचना अजिबात कळता कामा नयेत असा जणू दंडकच आहे. चालकाचा गोंधळ उडाला पाहिजे, त्यातून अपघात झाला पाहिजे, बळी जाऊन लोकसंख्या कमी झाली पाहिजे असाही त्यांचा हेतू असू शकतो. रस्ते असे करावेत की त्यातून ऍडव्हेन्चर चा थ्रील अनुभवता आला पाहिजे, गॅरेज चालली पाहिजेत, हाडाचे डॉक्टर, हॉस्पिटल चालली पाहिजेत, इंधन जास्त लागून पम्प चालले पाहिजेत, वेळ वाया जाऊन पेशन्ट गेला पाहिजे अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेऊन महाराष्ट्रात, कोकणात कामं चालू आहेत.

याच्या उलट परिस्थिती कर्नाटक, गोवा, गुजरात येथे अनुभवली. गुण द्यायचे झाले तर येथील रस्त्यांसाठी संबंधितांना 80% नक्कीच देईन. तर आपल्याकडचे संबंधित काठावर पास झाले तरी पेढे वाटून आनंद साजरा करायला हरकत नाही.

शेवटी तंत्रज्ञान कितीही आधुनिक झाले असले तरी हे सर्व करताना किमान नैतिकता, प्रामाणिकपणा नसेल तर काहीच चांगले घडू शकत नाही. चांगलं काम करण्याची इच्छाशक्ती असणं गरजेचं. नुसतीच टक्केवारी खाणं हे काही माणूस असण्याचे लक्षण नाही. हे तर आधुनिक काळातील बकासुरच म्हटले पाहिजेत.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *