शेठचं ‘ भाई प्रेम ‘!
- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. राजकारणाचे आणि पुढऱ्यांचे वेगवेगळे रंगही पाहण्यास मिळत आहे. महायुती की नुसतीच युती आणि आघाडी की बिघाडी असाही राजकीय शह – काटशह यांचा खेळही जोरात आहे. पक्षांतर्गत कुस्त्याही रंगात आल्या आहेत. पुढच्या आठ दिवसांत असं बरंच काही घडत राहणार आहे.

पण, या सर्व घटनांमध्ये एक घटना महत्वपूर्ण म्हटली पाहिजे ती म्हणजे भास्करशेठ यांचं रमेशभाईंवर जडलेलं प्रेम! त्यांचा ‘दोस्ताना’ पाहून कोणालाही हेवा वाटला तर नवल वाटायला नको. तसं म्हटलं तर या दोघांच्यात अधेमधे प्रेमाचे भरते येते पण ते जेव्हा वेगवेगळ्या पक्षात असतात तेव्हाच! एकाच पक्षात असतील तर प्रेमाला, मैत्रीला ओहोटी लागते. आत्ताही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भास्करशेठ यांनी रमेशभाई यांना मनापासून पूर्ण पाठिंबा दिला आहे. पक्षीय भूमिकेपेक्षा त्यांनी आघाडीचा धर्म पाळण्यावर भर दिला आहे. नुकत्याच घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून त्यांनी हा संदेश लोकांपर्यंत पोहचवला आहे. या पत्रकार परिषदेत रमेशभाई हेच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत असं ठामपणे सांगतानाच भास्करशेठ यांनी रमेशभाईंचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यांच्या कार्याचा, अनुभवाचा, शांत – संयमी स्वभावाचा शेठनी गौरव केलेला पाहून चिपळूणकर जनतेच्याच नव्हे तर कोकणातील जनतेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असतील यात शंका नाही. अर्थात चांगल्या राजकीय वातावरणासाठी ही चांगलीच गोष्ट आहे आणि ती कायम टीकावी अशी अपेक्षा आहे. कारण मागच्या 27/28 वर्षांच्या राजकीय इतिहासात डोकावले तर या दोघांतील संघर्ष उठून दिसतो. 1995 ते 2004 या काळातील संघर्ष हा नुसताच तात्विक नव्हता तर प्रसंगी रस्त्यावरही झालेला आहे. दुर्गवाडीची कुस्ती त्याचा कळस होता. 2004 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चिपळूणच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. त्यात रमेशभाईंचे भाग्य फळफळले. दरम्यान, राजकीय करियर धोक्यात आलेल्या भास्करशेठना (रमेशभाईंची मनधरणी करून, त्यांची समजूत काढून ) पवार साहेब आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी करून घेतले. त्यावेळी रमेशभाईंच्या घरी स्नेहभोजनही झाले. जाहीर प्रवेशप्रसंगी दोघांची गळाभेट झाली आणि इतक्या वर्षांच्या टोकाच्या संघर्षाचे रूपांतर ‘मैत्रीत’ झाले. बघता बघता शेठ पवार साहेबांच्या मर्जीतले झाले. एकापेक्षा एक मोठी पदं मिळाली आणि इकडे रमेशभाईना मात्र नुसतंच घड्याळ्याच्या काट्याकडे बघत बसावं लागलं. ‘भास्कर’ (हा एकेरी उल्लेख नाही एवढी समज समर्थकांना असेल अशी अपेक्षा आहे.) तेजोमय होत गेला तशी त्याची प्रखरताही वाढत गेली आणि त्याचे चटके रमेशभाईंसह जिल्ह्यातील अनेक लहानमोठ्या नेत्यांना बसू लागले. आणि शेवटी वैतागून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. एखादा पाहुणा घरात घ्यावा आणि त्याच्यामुळे मूळ मालकालाच घरातून बाहेर पडावं लागून रानोमळ भटकावं लागावं अशीच काहीशी परिस्थिती भाईंची झाली. त्यानंतर त्यांना किती पक्ष फिरावे लागले हे सर्वांना ज्ञात आहेच. बरं एवढं होऊनही ज्यांना बरंच काही मिळालं (पण ते कमी वाटलं म्हणून) त्यांनीच पवार साहेबांना सोडलं आणि ज्यांच्या नकला केल्या त्यांच्याकडे उडी मारली. पण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला बुचकळ्यात टाकतील, संभ्रमित करतील अशा राजकीय घडामोडी घडल्या. 2019 पासून सुरु झालेल्या नाट्यमय घडामोडी मागच्या लोकसभेपर्यंत चालूच होत्या. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची छकलं झाली. त्यावेळी भास्करशेठ ठाकरे यांच्याबरोबरच राहिले ( आणि कायम नाराजही राहिले) तर रमेशभाई यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेत तुतारी वाजवली. आघाडीच्या धर्मामुळे शेठ – भाई यांच्यात पुन्हा दोस्ताना सुरु झाला. गतवर्षी दोघांनी मिळून प्रशांत यादव यांना आमदार करण्यासाठी एकत्रितरित्या प्रचंड मेहनत घेतली यात वाद नाही. पण त्याच प्रशांत यादव यांनी त्यांची साथ सोडत कमळ हाती घेतलं आहे. पुन्हा एकदा वेगळी राजकीय समीकरण घडून त्यात रमेशभाई, भास्करशेठ एकत्र आले आहेत.
शेठना मैत्रीला जागून कोणत्याही परिस्थितीत भाईंना नगराध्यक्ष करायचं आहे. स्वभावानुसार शेठ एकदा शब्द दिला, एकदा मैत्री केली की जीवाची बाजी लावून पाठीशी उभं राहणार यात वाद नाही. पण….
*यात गंमतीचा भाग म्हणा किंवा नियतीचा, काळाचा महिमा कसा असतो हे मला सांगायचे आहे. या दोघांची मैत्री अखंड राहो अशीच भावना सर्वांची आहे. पण आज नगराध्यक्ष पदासाठी भाई कसे योग्य आहेत हे भास्करशेठ सांगत आहेत त्याच भास्करशेठ यांनी त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या काळात भाईंनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात भ्रष्टाचार केल्याच्या जवळपास 165 तक्रारीचा अर्ज करून नगरविकास खात्याकडून चौकशी आणि कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी रवींद्र माने नगरविकास राज्यमंत्री होते आणि ते भाईंचे मित्र असल्यामुळे शेठच्या तक्रार अर्जावर फार काही होत नव्हते. त्यामुळे शेठ स्वतःच्याच सरकारवर नाराज होते. फार विलंबाने नंतर भाईंना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले.. मग भाई कोर्टात गेले.. स्थगिती आली असं बरंच काही घडलं. शेठच्या आणि भाईंच्या जुन्या कार्यकर्त्यांना याची माहिती आहेच.* मी या घटनेची आठवण करून दिली एवढंच. भ्रष्टाचारी नगराध्यक्ष म्हणून कारवाईची मागणी ते हेच नगराध्यक्ष हवेत यासाठी आग्रह, प्रचार हा काळाचा महिमा आहे. (ज्याच्या सल्ल्यानुसार ‘ फैसला ‘ केला जातो तो सल्लागार त्यावेळी भाईंच्या दरबारात होता, नंतर शेठच्या मर्जीत आणि आता पुन्हा दोघांचाही सल्लागार! कालाय तस्मै नमः||
मकरंद भागवत. 9850863262

