‘JKNSY’ ची प्रतिष्ठा पणाला…

चिपळूण शहराच्या विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी कधी एकदा निवडून नगरपालिकेत जातोय असं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना झालंय. गेली चार वर्ष प्रशासन कारभार चालवत होते. लोकांना काही फार मोठा अडचणीचा विषय वाटला नाही. कारण इतकी वर्ष नगरसेवक निवडून येतायत म्हणून समस्या कमी झाल्यात असं घडलेलं नाही. पण तरीही शेवटी लोकशाहीनुसार जनतेचा प्रतिनिधी तिथे असणे आवश्यक आहे. फक्त तिथे गेल्यावर तो शहर विकासाची आस्था बाळगून काम करतो की स्वविकासाला महत्व देतो हे पाहणे आवश्यक आहे. असो. दोन तीन दिवसांनी 29 जणांची जनसेवेची इच्छा पूर्ण होईल.

अत्यन्त चित्र विचित्र राजकीय परिस्थितीत होत असलेल्या या निवडणुकीत नेत्यांचाही कस लागणार आहे. त्यांनीचं घातलेल्या गोंधळातून ते स्वतःला कसे बाहेर काढतात, यश मिळवतात याबाबत उत्सुकता आहेच. त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. या नेत्यांमध्ये भास्करराव जाधव, रमेशभाई कदम, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर सर आणि प्रशांत यादव यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कारण यशापयशाची जबाबदारी त्यांची असणार आहे. भास्करराव जाधव यांनी नैतिकतेच्या आधारे, शब्दाला जागण्याच्या भूमिकेतून नगराध्यक्षपदाचे उमेदवार रमेशभाई कदम आणि अन्य काही नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट शिवसेनेत सावळा गोंधळ असल्याचे समोर आले. आता घेतलेल्या ठाम भूमिकेनुसार भास्करराव रमेशभाईंना नगराध्यक्षपदावर बसवण्यात यशस्वी होतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या मुलीलाही निवडून आणायचं आहे. त्यांच्यादृष्टीने ही निवडणूक महत्वाची असेल कारण यातील यशपयशावर त्यांची पुढील राजकीय वाटचालिची दिशा ठरेल.

दुसरीकडे वयाच्या 75 नंतर आणि आमदारकी मिळाल्यानंतरही रमेशभाईंना पुन्हा एकदा चिपळूणचं नगराध्यक्षपद खुणावत आहे. कितीही टीका झाली तरी ते आपले नेहमीच्या ‘डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि खांद्यावर हात ‘ या तंत्रावर ठाम आहेत. त्यांनी भास्कररावांना ‘पटवले’ यात त्यांचे राजकीय कौशल्य लक्षात येते. त्यामुळे त्यांनी पहिली लढाई जिंकली आहे, मात्र आता खरा कस मतदानाच्या दिवशी आहे. भाईंच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असणार आहे कारण त्यांचा दबदबा अजूनही चिपळूण शहरात कायम आहे किंवा नाही याचे उत्तर मिळणार आहे.

आमदार शेखर सरांच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे केवळ संभ्रम ठरली आहे. महायुतीतला महत्वाचा घटक असलेला अजितदादा गट आणि स्वतः आमदार त्या पक्षाचे असताना भाजप आणि शिंदे सेनेने त्यांना अक्षरशः कस्पटासमान वागणूक दिली. शेवटी आता काहीतरी करायला हवे, पक्षाचे अस्तित्व दिसायला पाहिजे म्हणून नगरसेवक पदासाठी काही उमेदवार निवडणुकीत उतरवण्यात आले आहेत. तोंडघशी पाडणाऱ्या भाजप शिंदे सेनेला धडा शिकवण्यासाठी आणि स्वतःची, पक्षाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी बऱ्यापैकी उमेदवार निवडून आणण्याचा दबाव त्यांच्यावर आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांचे लाडके उमेदवार उमेश सकपाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे ही त्यांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. सध्या उदय सामंत ‘जे सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळेही महायुतीची मोडतोड झाल्याचे बोलले जाते. सामंत यांच्या हट्टापुढे काही चालत नाही. त्यामुळे स्वतःचा उमेदवार निवडून आणणे इतकेच नव्हे तर पालिकेत सत्ता मिळवून देणं त्यांची जबाबदारी आहे. सामंत यांचा विशेषतः रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये कस लागणार आहे.

प्रशांत यादव हे भाजपवासी झाल्यावर त्यांना लगेचच कोणतेतरी मोठे पद दिले जाईल असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण, भाजपने आधी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार यादव यांना चिपळूण पालिका निवडणुकीचे प्रभारी केले आणि भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी दिली आहे. या परीक्षेत ते पास झाले तर मग त्यांच्या ‘ पदा ‘ बाबत विचार केला जाऊ शकतो. कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीचीही परीक्षा यादव यांना द्यावी लागेल. प्रशान्त यादव, त्यांच्या पत्नी सौ. स्वप्ना यादव, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे कर्मचारी गेले महिनाभर तन, मन, धन अर्पण करुन निवडणूक प्रचारात उतरले आहेत. त्यांना सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेतच पण त्यांनी आग्रहपूर्वक मागून घेतलेल्या (असं बोललं जातं.. खरं खोटं तेच जाणोत )जागांवर कदम आणि खेडेकर यांना तर कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावे लागणार आहे. ते स्वतः तेथे जास्तीतजास्त ताकद लावताना दिसत आहेत. शहर किंवा तालुका भाजपचे सत्ताकेंद्र मार्कंडीतून बहाद्दूरशेख, खेर्डी आणि पिंपळीकडे सरकले आहेच. चिपळूण भाजपला ‘कॉर्पोरेट’ लूक मिळाला आहे. भविष्यात पक्षात किंवा आमदारकीच्या रूपात मोठे पद हवे असेल तर यादव यांना या निवडणुकीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास व्हावीच लागेल.

या मुख्य नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेच,पण त्याचवेळी अन्य दोन पक्ष आय काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि शिस्तीचा अभाव आहे तर ठाकरे गटात सावळा गोंधळ आहे.

 

ता. क. – या सर्वांची प्रतिष्ठा जरी पणाला लागली असली तरी ती राजकीय आहे. खरी प्रतिष्ठा चिपळूण शहराची येथील जनतेची आहे. चिपळूण शहराचे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, भौगोलिक अशा अनेक अंगानी असलेले महत्व, शहराची ओळख टिकवणं, ती वृद्धिंगत करणं ही खरी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे निवडणुकीत बोललेलं खरं करुन दाखवण्याची जबाबदारी निवडून आलेल्यांची आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *