‘चिपळूण नागरी’विरोधात पुन्हा एकदा उपोषण!

‘चिपळूण नागरी’विरोधात पुन्हा एकदा उपोषण!

*चिपळूण नागरी सह. पतसंस्थेविरोधात पुन्हा एकदा उपोषणास्त्र!*

 

*4 मे ला काय घडणार… राज्यात उत्सुकता…*

 

चिपळूण (प्रतिनिधी):

येथील ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड’मध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कथित आर्थिक अनियमितता आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या कर्जवाटपाविरोधात आता सभासदांनी आरपारची लढाई पुकारली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत, या मागणीसाठी श्री. विकास महादेव हादवे आणि श्री. अकबर मूसा शिकलकर येत्या सोमवार, दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर ‘आमरण उपोषणास’ बसणार आहेत.

 

राजकीय वरदहस्तामुळे चौकशीला ‘ब्रेक’?

उपविभागीय अधिकारी (प्रांत कार्यालय, चिपळूण) यांना दिलेल्या निवेदनात उपोषणकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. पतसंस्थेच्या कारभारातील अनियमिततेबाबत यापूर्वी सहकार विभागाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात गैरव्यवहार निष्पन्न होऊनही, पतसंस्थेच्या चेअरमनचे जावई राजकारणात सक्रिय असल्याने, राजकीय दबाव वापरून ही चौकशी थांबवण्यात आल्याचा दावा विकास हादवे यांनी केला आहे.

 

पत्रकारावर हल्ला आणि माहिती दडवल्याचा आरोप

या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सभासदांना गप्प करण्यासाठी दहशतीचा वापर केला जात असल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. २५ मार्च २०२६ रोजी सभासद रुपेश सुरेश पवार हे उपोषणास बसले असताना, त्यांना आणि पत्रकार श्री. दीपक भागवत यांना जबर मारहाण करण्यात आली होती. तसेच, माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) मागवलेली माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

 

बेकायदेशीर सभासदत्व रद्द केल्याचा दावा

दुसरे उपोषणकर्ते अकबर मूसा शिकलकर यांनी आरोप केला आहे की, त्यांनी तक्रार केल्यामुळे पतसंस्था चालकांनी त्यांचे सभासदत्व बेकायदेशीरपणे रद्द केले आहे. चुकीची कारणे दाखवून त्यांचे हक्क हिरावले जात असून, या अन्यायाविरुद्ध ते पुराव्यासहित उपोषणाला बसणार आहेत.

 

पोलीस संरक्षणाची मागणी

पूर्वीचा मारहाणीचा अनुभव पाहता, ४ मे रोजी होणाऱ्या उपोषणादरम्यान आपल्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि पोलीस विभागाने पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा आणि निवृत्ती वेतन धारकांच्या ठेवी धोक्यात येत असल्याने, या उपोषणाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

*कोकण रिपोर्टर*

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *