आडमुठेपणाचे ‘ यीस्ट ‘
गाणे – खडपोली औद्योगिक वसाहतीतील गेली 45 वर्षे चालू असलेली, अनेकांना रोजगार देणारी अशी ओळख असलेली साफयीस्ट कंपनी गेले दोन तीन महिने कामगारांच्या प्रश्नावरून वादात सापडली आहे. 221 कामगारांना अचानक कमी करण्यात आल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांत अस्वस्थता निर्माण होणे साहजिक आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी प्रयत्न केले. त्याला काहीसे यश आले असले तरी या कामगारांपैकी काही कामगारांना कामावरच न घेण्याच्या भूमिकेमुळे हा असंतोष वाढत गेला. ज्या कामगारांना कम्पनी कामावर घेण्यास तयार नाही अशांनी आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर ज्यांना कामावर घेतले होते ते कामगारही आपल्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी बाहेर आले. मधल्या काळात विविध स्तरावर कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा चालू असली तरी ती फळास आलेली नाही. त्याचे मुख्य कारण कंपनीचे आडमुठे धोरण हेच आहे. कामगारांची जशी भूमिका आहे तशी काही बाबतीत कंपनीची असू शकते त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र प्राप्त परिस्थितीत कंपनीने दोन पावलं मागे जाऊन सर्व कामगारांना कामावर घेणे आवश्यक आहे. शेवटी कामगार आणि कंपनी दोन्हीना एकमेकांची गरज आहे. काही प्रश्न चर्चेतून आणि सामंजस्यातून सहज सुटणारे आहेत. बराचसा कामगारवर्ग हा स्थानिक असून वर्षानुवर्षे येथे काम करत आहे. त्यामुळे त्यांना अचानक काढून टाकणे नक्कीच अन्यायकारक आहे. हा कम्पनी मालक आणि व्यवस्थापनाचा उद्दामपणा आहे. मालक, व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात सौहार्दाचे वातावरण असेल, विश्वासाचे वातावरण असेल तर सर्वांच्याच फायद्याचे ठरते.
साफयीस्ट कंपनी दिवसेंदिवस मोठी होत असताना कामगारांना कमी करण्याचे कारण काय हेही एक कोडेच आहे. एक क्षण गृहित धरले की कामगारांची आवश्यकता नाही तर मग नवीन कामगार का आणले गेले या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. बरं कामगारांना कमी करताना नियमानुसार प्रक्रिया राबविली गेली का.. तर नाही. लेबर कॉन्ट्रॅक्टरना हाताशी धरून कामगारांवर दडपशाही करण्याचा उद्योग कंपनीने केल्याचे एकंदर चर्चेतून, बोलण्यातून जाणवत आहे.
प्रत्येक दिवशी थोडे वाढीव कामगार घेतो म्हणायचं आणि काहींना घेणार नाही अशी भूमिका घ्यायची असा आडमुठेपणा कंपनीने चालू ठेवल्याने कालपासून हे आंदोलन तीव्र होत आहे. कदाचित चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कंपनीने कामगारांना नियमानुसार वेतन, सुरक्षा किट, आरोग्यविषयक सुविधा, कामाच्या वेळा अशा अनेक बाबतीत आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे त्याचबरोबर कामगारांनीही सुरक्षाविषयक नियम, कामाच्या ठिकाणी शिस्त, प्रामाणिकपणा याचे भान ठेवणे गरजेचे आहे. बरेचदा दोन्हीकडून यात टाळाटाळ केली जाते असे दिसून येते. आणि असे प्रश्न निर्माण होतात.
तडजोड शक्य…
साफयीस्ट कंपनीत जो वाद सुरु आहे त्यात तडजोड होणं सहज शक्य आहे आणि त्यासाठी कंपनीने मोठेपणा दाखवून पुढाकार घेतला पाहिजे. मूळ मुद्दा ज्या कामगारांबद्दल कपंनीला तक्रार आहे त्यांचा आहे. त्यांच्यामुळे बाकीचे नव्वद टक्के कामगार आज बाहेर आहेत. ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत त्या काय स्वरूपाच्या आहेत त्या कपंनीने लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्यसमोर ठेवाव्यात. मात्र त्याहीपेक्षा त्या कामगारांना एक संधी देऊन कामावर घ्यावे. त्यांच्याकडुन भविष्यात बेशिस्तपणा होणार नाही याची हमी घ्यावी. (कामावर घेतल्यावर पुन्हा त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जाणार नाही.. त्यासाठी कामगार युनियन ने लक्ष ठेवले पाहिजे. दुसऱ्या बाजूला कामगारांना कामावर घेतल्यावर आपण कपंनीला नमवले अशा आविर्भावत वागू नये. कारण शेवटी कोणाचाही इगो हा नुकसानदायक असणार आहे.)
उद्योगमंत्री स्थानिक आहेत आहेत पण त्यांचा नेमका रोल काय आहे हे कळलेले नाही. ते निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसते. खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत. पण एवढ्या प्रयत्नांना, आंदोलनाला दाद न देणाऱ्या कपंनीला कोणाचा वरदहस्त आहे हे मात्र कळून येत नाही.

