भाजपमधील सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता…

चिपळूण – चिपळूण नगरपालिकेची निवडणूक आता खऱ्या अर्थाने गाजू लागली असून आघाडी आणि महायुतीतील तणाव कायम आहेच, पण त्याचवेळी पक्षांतर्गत नाराजी नाट्याचे प्रयोगही रंगू लागले आहेत. याची सुरुवात भाजपमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

नारायण राणे, निलेश राणे यांचे खंदे समर्थक परिमल भोसले यांनी काल भाजपचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. मात्र त्यासाठी निवडणुकीसाठी जी प्रक्रिया राबविण्यात आली त्यावर त्यांनी आक्षेप असल्याचे कारण दिले . पण त्याहीपेक्षा त्यांचा नाराजीचा मूळ मुद्दा आहे तो ठाकरे शिवसेनेतून भाजपात आलेल्या शशिकांत मोदी यांना उमेदवारी दिल्याचा. या पत्रकार परिषदेत भोसले यांनी मोदी यांच्यावर अनेक गम्भीर आरोप केले एवढेच नाही तर त्यांच्या निष्ठेविषयी संशय व्यक्त केला.

भोसले यांच्या राजीनाम्याने भाजपमध्ये फार मोठी खळबळ माजली नसली तरी यामागे असलेला नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील सुप्त संघर्ष कदाचित अधिक मोठ्या प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता जुन्या जाणत्या भाजप कार्यकर्त्यांना वाटते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार येथील निवडणुकीची जवळपास सर्व सूत्र नुकतेच प्रवेशकर्ते झालेल्या प्रशांत यादव यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारी देतानाही चव्हाण समर्थक किंवा यादव यांच्या जवळच्याना संधी दिली गेल्याची काहीशी नाराजी पक्ष कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. भोसले यांच्या म्हणण्यानुसार आणखी कार्यकर्ते राजीनामा देणार आहेत. नुपूर बाचीम आणि विनोद कदम यांनीही आधीच राजीनामा दिला आहे.

आज अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर भाजपचे नेते या नाराजी नाट्यावर विचारविनिमय करतात की सरळसरळ दुर्लक्ष करतात हे दोन दिवसांत कळेलच. अर्थात परिमल भोसले यांच्या राजीनाम्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली नाही त्यार्थी हा राजीनामा गांभीर्याने घेतलेला नाही असाच मेसेज दिल्याचे सांगण्यात येते. त्यातच शशिकांत मोदी आणि परिमल भोसले यांच्यातील वाद मागील काही महिन्यात उफाळून आला, त्याला जाहीर स्वरूप मिळाले. परंतु हा पक्षीय मतभेदापेक्षा वेगळा मुद्दा असल्याचेही भाजपमधून बोलले जाते. गतवर्षी निलेश राणे यांच्या गुहागर दौऱ्याच्या दरम्यान चिपळूण येथे राणे समर्थक आणि भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात ठाकरे गट आमनेसामने आले. दगडफेक झाली. यात ठाकरे सेनेकडून शशिकांत मोदी आक्रमक होते आणि याचा राग आजही राणे समर्थक असलेल्या भोसले यांना आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठी भोसले यांच्या राजीनाम्याला अजिबात महत्व देणार नाहीत अशी चर्चा भाजप गोटातून ऐकण्यास मिळत आहे.

मात्र, असं असले तरी यातून राणे आणि चव्हाण समर्थक यांच्यातील दरी वाढेल आणि त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसेल असे राजकीय जाणकारांना वाटते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *