आवाज कमी कर! डीजे तुला बाप्पाची शपथ हाय!!!
*आवाज कमी कर! डीजे तुला बाप्पाची शपथ हाय!!*
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
‘आवाज वाढव.. डीजे तुला आयची शपथ हाय’ गाणं ऐकायला, त्याच्यावर ठेका धरायला किंवा अंगात वारं भरल्याप्रमाणे नाचायला अनेकांना आवडत असलं तरी आता मात्र डीजे ही निखळ करमणूक न राहता दिवसांगणिक त्याचा उन्माद वाढत चालला आहे. कानांना, मनाला आनंद देणारे असे हे वाद्य नसून आयुष्य उध्वस्त करणारे यंत्र आहे. अर्थात या वाद्याला दोष देणं तितकंसं उचित वाटत नाही, कारण ते काही आपलंआपण वाजून लोकांना त्रास देत नाही. या वाद्याचा बेजबाबदाऱपणे वापर करणारे, या बेजबाबदारपणाला प्रोत्साहन देणारे हे आजच्या काळातले राक्षसच आहेत. ते इतके उन्मत्त, उद्दाम झाले आहेत की, आता खुद्द बाप्पाला या राक्षसांचे निर्दालन करावे लागेल असे वाटते. समजावून सांगण्याएवढा आणि समजून घेण्याएवढा मेंदू त्यांच्या डोक्यात तर नक्कीच नाही, पण गुडघ्यातही नाही. त्यामुळे बाप्पा आता तुम्हीच अशी शिक्षा द्या की हे उद्दाम झालेले राक्षस ना धडपणे जगले पाहिजेत… ना धडपणे मेले पाहिजेत. डीजेच्या दणदणाटामुळे असंख्य लोकांचे जिणे हराम करणाऱ्या या आधुनिक राक्षसांना अजिबात माफ करू नका. आजारी, वृद्ध, बालकं, विद्यार्थी आणि दिवसभर थकूनभागून विश्रांतीची, शांततेची गरज असलेल्या प्रत्येकाचे शाप, त्यांचे तळतळाट यांना भोगावे लागले पाहिजेत.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून जो गदारोळ सुरु आहे, ज्या बापट नावाच्या जागृत नागरिकाने ही व्यथा मांडली त्यांना ज्या पद्धतीने धमाकावण्यात आले किंवा येत आहे ते पाहता अशी मंडळे, त्यांचे उद्दाम कार्यकर्ते, राजकीय स्वार्थासाठी त्यांना पाठीशी घालणारे नीच प्रवृत्तीचे लहानमोठे सर्वपक्षीय पुढारी यांना बाप्पाने अद्दल घडवावी एवढीच प्रार्थना आहे. कारण गणेशोत्सवाचा मूळ उद्देश, सांस्कृतिक परंपरा आणि एकूणच बुद्धीचा यांच्याशी काडीचाही संबंध नाही. तू बुद्धिची देवता आहेस पण त्याचा उपयोग होण्याच्या पलीकडे गेलेली ही मंडळी आहेत. त्यांना आता तुझ्या हातातील शस्त्रांची गरज आहे. अशी मंडळे आणि असे उच्छाद मांडणारे कार्यकर्ते जिथे आहेत तिथे तुझ्या नावावर स्वार्थकारण, अर्थकारण, राजकारण, दंडेलाशाही एवढंच चालू आहे आणि असतं. राजकीय पुढाऱ्यांनी तर सगळ्याचा इतका विचका करुन ठेवलाय ना की ही कीड पहिली ठेचून काढ. आता प्रश्न केवळ पुण्याचा राहिलेला नाही तर राज्याचा झाला आहे.
गणेशोत्सवाला आलेले बाजारू, विकृत स्वरूप पाहता बाप्पा आता तुम्हीचं असं काहीतरी करा की या राक्षसांना चांगली अद्दल घडली पाहिजे. खरं तर यासाठी कायद्याची आणि वर्दीची पॉवर असणारी मंडळी नेमलेली आहेत, पण त्यांच्यातले बहुतांशी पुचाट, विकावू आणि राजकीय पुढऱ्यांचे, दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांचे घरगडी म्हणून ओळखले जातात. त्यांना अधिकार दिलेत ते फक्त सर्वसामान्य माणसाला दमात घेण्यासाठी! एरवी त्यांची गल्लीतल्या दादापुढे पण फाटते. पुण्यात तर पोलीस प्रशासन देखव्यापुरते असल्याचे दिसते.
मूर्तिच्या उंचीला मर्यादा नाही, त्यांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूकींना वेळेची मर्यादा नाही, डीजेफिजे आणखी काय असेल त्याच्या आवाजाला मर्यादा नाही, खोट्या स्पर्धेला मर्यादा नाहीत, अचकट विचकट कार्यक्रमांना मर्यादा नाही. थोडक्यात काय तर बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी ‘अमर्याद त्रास ‘ देण्याचा विडाच उचलला आहे. आणि आमचं सरकार, मंत्री, नेते, खासदार, आमदार, नगरसेवक आणि अगदी गल्लीबोळातला पुढारी यांच्यात या विकृतीला विरोध करण्याची, उत्सवाला चांगलं स्वरूप देण्याची हिम्मत नाही, तेवढी कुवत नाही. यात दोष आपल्या सामान्य माणसाचाही आहे. याच नतद्रष्ट पुढऱ्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो. मग ते अशा रितीने आपल्या डोक्यावर बसतात.
शंभरातली फार तर दहा टक्के मंडळे बाप्पाचा उत्सव हा सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जपत, सामाजिक भान ठेऊन साजरा करतात. लोकांनीही अशा मंडळाना भेट द्यावी आणि उन्मत्तपणे वागणाऱ्या, सामाजिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या मंडळाकडे फिरकुही नये. मुळात त्यांच्या अर्थकारणाला शह बसला पाहिजे. त्यांचे मंडप ओस पडले पाहिजेत. इकडचा राजा, तिकडचा राजा असल्या भानगडीत भक्तांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. तो जर मुळात देव आहे, तो सर्वशक्तिमान आहे तर तो राजा का? राजा देवापेक्षा कमीच असणार ना?
वरील सर्व विकृतीला आळा घालण्यासाठी आता जेन झी नी पुढाकार घेतला पाहिजे. कारण याच पिढीच्या हातात बरंच काही आहे. स्वतःचे भविष्य उज्ज्वल हवं असेल तर आधी या समाजविरोधी राक्षसांना वठणीवर आणावं लागेल. या राक्षसांच्या हातचं बाहुले बनलेल्या प्रशासनालाही वठणीवर आणावं लागेल. बाप्पा तुम्हाला तरी ही बुद्धी देवो. निर्बुद्ध लोकांविरुद्ध लढण्याची ताकद देवो. जे धाडसाने पुढे येऊन विरोध करत आहेत, काही चांगलं घडवू पहात आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. हातातून वेळ जाण्यापूर्वी सर्वांनीच पुढे आलं पाहिजे.
ता. क. – ज्या राजकीय नेत्यांमध्ये विकृतीला विरोध करण्याची धमक आहे किंवा जे अशी हिम्मत दाखवतील तेच जनतेच्या मनात आदर मिळवतील. पोलिसांमधील उच्च पदावरील अधिकाऱ्यांबाबतही हेच. नाहीतर पीडितांचे तळतळाट तुम्हाला जन्मभर भोगावे लागतील एवढं लक्षात ठेवा आणि वर्दीला जागा.
🌹 गणपती बाप्पा मोरया 🌹

