स्व.दत्ताशेठ ओक – कोतळूकचा आधार!

स्व.दत्ताशेठ ओक – कोतळूकचा आधार!

          माझ्या आठवणीतील अण्णा

           *कोतळूकचा आधार, सर्वांचे अण्णा*

 

कोतळूक गावातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अवलिया व्यक्तीमत्व असले सर्वांना अण्णा या नावाने सुपरिचित असलेले दत्तात्रय काशिनाथ ओक यांच्याविषयी थोडेसे मत….

 

कै. दत्तात्रय काशिनाथ ओक उर्फ अण्णा काहीजण दत्ताशेट या नावाने ओळखले जाणारे व्यक्तीमत्व. सामाजिक कार्याचे हे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच त्यांचे वडील कै. नानासाहेब ओक यांच्याकडून मिळाले होते. कै. नाना ओक यांचा सामाजिक कार्याचा वारसा अण्णांनी अविरतपणे सुरू ठेवला होता.

 

अण्णांच्या जवळचे सहकारी म्हणून माझे बाबा त्यांच्यासोबत असायचे त्यांच्यामुळे माझ्या बाबांची ओळख सर्वदूर झाली. कोणी मुकुंदशेट तर अण्णांच्या भाषेत एम. आर. भाऊंनो अशी विशेषणे लागून ही जोडी कायम बरोबर असायची.

 

#### *उदमेवाडी आणि श्री हनुमंत मंदिर*

 

उदमेवाडी अध्यक्षपद भूषविताना त्यांच्या जोडीला सेक्रेटरी पदाची जबाबदारी बाबांची अगदी २००७ पर्यंत. अण्णांनी उदमेवाडीचे अध्यक्ष पद भूषविताना बडेजावी न करता आवश्यक आहे तिथे कडक शिस्त, खेळकरपणा, लहान, मोठे यांचा समन्वय साधून कारकीर्द यशस्वी केली.

 

१० ज्ञाती बांधव असलेली उदमेवाडी मध्ये श्री हनुमंताचे मंदिर सर्वांचेच श्रद्धास्थान. श्री हनुमंतांचा जन्मोत्सव कार्यक्रम आला की अण्णांच्या पण अंगात हनुमान संचारायचा. आमच्या पंचक्रोशीत तेव्हापासून आजपर्यंत दोन दिवस धुमधडाक्यात हा जन्मोत्सव साजरा केला जातो.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार, रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत नमन, भारूड, नाटके असे अनेक कार्यक्रम या ठिकाणाहून पहावयास मिळाले ते त्यांच्यामुळेच. कार्यक्रम ठरवायला आपल्या सहकाऱ्यांना स्वतः च्या गाडीतून स्वखर्चाने घेऊन जाऊन तो कार्यक्रम ठरवायचे.

 

पहिल्यांदा गणपतीमध्ये एकच दिवस भोवनीचा नाच असायचा सकाळ व्हायची. त्यामुळे दररोज ४ ते ५ घरात पारंपारिक, नव्या पद्धतीचा नाच करण्याचा विचार अंमलात आणून ते स्वतः शेवटपर्यंत सर्व मंडळींबरोबर सहभागी असायचे.

 

वाडीतील मनुष्यबळाचा विचार करून वाडीमध्ये ग्रामदेवतेच्या येणाऱ्या दोन पालख्या घरोघरी न फिरवता श्री हनुमंताचे मंदिरातच ठेवून तिथे सर्वांनी येऊन पुजा केली तर काय होईल हा विचार समोर आला. वाडीतील ग्रामस्थांनी दूरदृष्टी ठेवून सर्वांच्या संमतीने तो स्वीकारला आणि एक नवीन पायंडा पडला तो आजपर्यंत.

 

अण्णांची आदरयुक्त भिती आम्हा सर्वांनाच होती. मी वाडीचा अध्यक्ष मी फक्त बसून आदेश सोडणार असला विचार नव्हता. उलट लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सर्वांना कधी कडक शब्दात तर कधी आपल्या विनोदी वृत्तीने, कधी शब्द न वापरता कृतीतून स्वतः कामाला सुरुवात करत. केरसुणी हातात घेऊन कचरा काढायला सुरुवात केली की मागोमाग सर्वजण कामाला लागायचे. असे सर्वांना सामावून घेऊन काम करून घ्यायची त्यांची पद्धत होती.

 

जुने असलेले श्री हनुमान मंदिर, श्री हनुमंताची दगडी पाशाणात असले सुबक मूर्ती मुंबई बोटीतून आणण्यापासून अगदी २००७ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार करण्यापर्यंत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 

#### *सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक जीवन*

 

अण्णा फक्त उदमेवाडी पुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण कोतळूक गाव, गुहागर तालुका यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने हे व्यक्तिमत्त्व सर्वदूर गेले होते. त्या काळात किराणा, रेशन दुकान, रॉकेल दुकान चालवताना कोतळूक बरोबरच कुटगिरी, पाभरे, जामसुत, सुरळ अशा ठिकाणांहून आलेल्या लोकांना योग्य ती सेवा देण्यासाठी ते तत्पर असायचे.

 

पूर्वी कॉंग्रेस नंतर जनसंघ, भाजपा असा प्रवास करताना आज जो २२ किलोमीटरचा तळी आबलोली रस्ता आहे तो अण्णांच्या व त्यांचे सर्व सहका-यांच्या पुढाकाराने प्रत्येक १ किलोमीटर मागे १ लाख प्रमाणे २२ लाख रूपयांमध्ये तत्कालीन सभापती आणि अण्णांचे घनिष्ठ संबंध असलेले कै. सदाशेट आरेकर यांच्या मार्फत पूर्ण झाला आणि दळणवळणाची मोठी सोय निर्माण झाली.

 

सामाजिक कार्यात काम करत असताना मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या लांब ठिकाणी न थकता गाडी चालवत आंबा वाहतुकीचा व्यवसाय करत होते. जोडीला किराणा मालाचे दुकान व बागायत हे सर्व सांभाळून एक मुलगा, दोन मुली यांना शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे केले.

 

देशभरात जेव्हा अयोध्या श्रीराम मंदिर लढा सुरू होता तेव्हा आमचे अण्णा मागे राहिले नाहीत. ज्या ज्या वेळी कारसेवा झाली तेव्हा तालुक्यातील अनेकजण कारसेवक म्हणून गेले होते त्यामध्ये अण्णां बरोबर माझे बाबा सुद्धा गेले होते. तिकडच्या सुद्धा अण्णांच्या आठवणी खूप आहेत.

 

#### *माणूस म्हणून अण्णा*

 

२०२० पर्यंत एक दिवसाआड बागेतून येताना अण्णा आमच्या घरी बसून चहासोबत गप्पागोष्टी करून मग पुढे घरी प्रस्थान करायचे. तसेच माझे बाबा दररोज सायंकाळी त्यांच्याकडे गप्पा मारायला जायचे.

 

माझ्या आठवणीप्रमाणे २०१४ पर्यंत रात्री जेवण झाले कि पत्त्यांचा म्हणजे मेंडी कोटचा डाव अण्णांकडे रंगायचा. कै. पांडुरंग दादा चव्हाण, कै काशिनाथ दादा महाडीक, कै. जोशी काका, पाटील काका, कै. महाडेश्वर गुरूजी, पशुवैद्यकीय शिपाई म्हणून काम करत असलेले कदम काका, डॉ गांधी असे भिडू सोबतीला असायचे. पण तो खेळ पण अगदी शिस्तीत न बोलता डाव संपल्यानंतर चर्चा करून पुन्हा नव्याने डावाला सुरुवात व्हायची आणि ठरलेल्या वेळेत रात्री ११ पर्यंत डाव बंद व्हायचा.

 

गावात अनेकांना अण्णांनी विविध माध्यमातून मदत केली पण कोणावरही उपकाराची जाणीव करून दिली नाही. अनेकांना घरे बांधण्यासाठी जागा, ग्रामपंचायत कार्यालय , ग्रामदेवता सहाण, सोसायटी, शाळा अशा समाजपयोगी कामासाठी सुद्धा दानशूर रितीने जागा देऊन अण्णांनी सढळ हस्ते सहकार्य केले आहे.

 

कोतळूक गावात अण्णांची ही यशस्वी कारकीर्द सहज झाली नाही. दुकानावर, कामावर जायचे नाही बहिष्कार अशा अनेक संघर्षमय प्रसंगातून सुद्धा त्यांना जावे लागले पण ते डगमगले नाहीत. त्यांच्या साथीदारांच्या सहकार्याने त्यांनी त्यावरही मात करून आपला रूबाबदारपणा दाखवला.

 

पहिल्यांदा जुन्या काळात अनेक नाटकांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय करून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला आहे. वाहतो ही दुर्वांची जुडी, लहानपण देगा देवा ,एखादी तरी स्मित रेषा, अश्रूंची झाली फुले, बेबंदशाही, एकच प्याला अशा अनेक मोठमोठ्या नाटकात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.

 

बाब्याकाका पेडणेकर, लक्ष्मण काका शिगवण, कै. सायबाशेट ऊर्फ भाई बागकर, कै. पांडुरंग आरेकर,आबा आरेकर, कै. दत्ताराम शिगवण, एकनाथ बागकर असे अनेक सहकारी शिकारीसाठी जंगलात जाताना असत. शिकारीसाठी गाडी चालवतानचा अण्णांचा हात कोणीच धरू शकत नव्हते. प्रत्येक ठिकाणी अण्णांचे सोबती हे असायचेच.

 

जुन्या काळात फक्त अण्णांकडेच चार चाकी गाडी होती. रात्री अपरात्री कोणावरही कसलाही प्रसंग आला आणि अण्णांना हाक आली की लगेच शर्ट घालून कसलाही मागे पुढे विचार न करता अण्णा गाडी घेऊन हजर असायचे. गाडीची चावी गाडीला की बाजूलाच ठेवलेली असायची. तीन वर्षे पूर्ण झाली की गाडी बदलयाची हा अण्णांचा नियम होता.

 

लहानपणापासूनच अण्णांना मी स्वतः प्रत्यक्ष खूप अनुभवले आहे. २००७ नंतर श्री हनुमंताचे मंदिर नवीन झाल्यानंतर मात्र वयोमानानुसार आमच्यात काही गोष्टीत वैचारिक मतभेद सुद्धा झाले पण ते तेवढयापुरतेच मर्यादित होते ही वस्तू स्थिती नाकारून चालणार नाही.

 

आमच्या पेक्षा अण्णा वयाने खूप मोठे. पण हनुमंताचे जन्मोत्सव कार्यक्रमात पहिल्या दिवशी रात्री नाटक संपल्यावर घरी न जाता उपस्थित असलेल्या ग्रामस्थांसमवेत चेष्टा मस्करी करून घरी जाऊन आंघोळ करून जन्मोत्सवाच्या आधी पहाटे भजनाची सुरुवात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री नमन आटोपल्यावर आटपाआटपीचे कामे ते स्वतः पुढाकार घेऊन करत असत ती कला त्यांच्या अंगात होती.

 

#### *पदे आणि योगदान*

 

अण्णांसारखे असे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही.

 

१९६९ ते १९८१ या मध्ये १२ वर्षे सरपंचपद, ३० वर्षे सदस्य, पंचायत समिती सदस्य, गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ अध्यक्ष, कोतळूक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन, प्रियदर्शनी शिक्षण संस्था कोतळूक कार्याध्यक्ष, ग्रामदेवता मंदिर समितीचे कार्याध्यक्ष, नातू प्रतिष्ठान संचालक, खरेदी विक्री संघ, तंटामुक्त समिती अध्यक्ष, स्वच्छता अभियान अध्यक्ष अशा विविध पदांवर यशस्वीपणे काम केले आहे.

 

माजी आमदार कै तात्यासाहेब नातू, माजी आमदार डॉ विनयजी नातू साहेब यांच्याबरोबर भाजपचे काम करताना भातगाव पट्यात खडतर प्रवास करून त्यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली.

 

#### *अंतिम काळ*

 

मला समजायला लागल्यापासून आतापर्यंतचे अण्णांना मला अनुभवायला मिळाले पण ते आता आपल्यात राहिले नाहीत. ते शरीराने जरी नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम स्मरणात राहतील.

 

गेल्या दोन वर्षातले श्री हनुमंताचे जन्मोत्सव मिरवणूक मधील व्हिडीओ त्यांच्या उमेदीच्या वयात त्यांची हौस काय असेल ते सांगून जातात.

 

सहा वर्षांपूर्वी ऋदयविकाराचा त्रास अण्णांना झाला. डॉक्टरांकडून रिपोर्ट नुसार नकारात्मक सल्ला आला. त्यानंतर २०२४ मध्ये ते घरीच पडले. खुबा निसटला. मोठे ऑपरेशन झाले. पण जगण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर या दोन्ही प्रसंगातून अण्णांनी मात केली.

 

वाहन चालवणे अण्णांचा आवडता विषय होता. त्यांच्याबरोबर मी खूप प्रवास केला आहे. निघायच्या वेळेच्या आधीच १० मिनिटे अण्णा वेळेत उपस्थित असायचे हा त्यांच्या वेळेचा शिस्तपणा. पुढे वयोमानानुसार त्यांनी वाहन चालवणे बंद केले.

 

कोणाकडेही मंगलकार्य, दु:खद प्रसंग आला तर अण्णांची हजेरी न चुकता असायचीच. मग ती मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी असली तरी ते संबंधित व्यक्तीला भेटून यायचे. सर्वच क्षेत्रात आवड असल्यामुळे कोणी विचारले अण्णा येताय काय तर अण्णा तयारीतच असायचे.

 

रत्नागिरी किर्तन संध्या कार्यक्रमाला माझा दादा, मकरंद काटदरे यांच्याबरोबर ते जायचे. अखंडपणे गुहागरच्या गोकुळाष्टमी उत्सवात ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलेसे करत असत.

 

त्यांना कोठे जायचे झाले तर सध्या ते एस.टी ने, वडापने, अगदी खात्रीचा चालक असेल तर दुचाकीने प्रवास करायचे. त्यासाठी त्यांना कामाची काहीच गरज नाही. मनात आले की आमचे अण्णा तळीत जाऊन भागवत हॉटेल, शिवसागर हॉटेल, अन्य दुसरी हॉटेल ही असतील तिथे जाऊन मनसोक्तपणे पदार्थांची चव घेऊन पुन्हा घरी यायचे.

 

३० जून २०२६ त्यांचा शेवटचा एस. टी. चा आणि येताना वडापचा प्रवास. तो आटपून ते घरी आल्यावर तारेच्या बागेकडून चालत येऊन पुन्हा घरात गेल्यावर घरातच अण्णा पडतात काय. त्यानंतर दोन दिवसांतच सॅल्युटाईज बेक्टेरीया होऊन पायाला जखम काय होते.

 

आणि दोन प्रसंगातून उठलेले आमचे अण्णा यावेळी पण उठतील. एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाणार नाही असे वाटत असताना मात्र ते पुन्हा भरारी न घेता कोलमडून जाऊन जगण्याची इच्छाशक्तीच ठेवत नाहीत. बघायला आलेल्या सहका-यांना झोपूनच त्याच भाषेत विचारपूस करत असत.

 

१५ दिवसाचा हा सर्व खेळ सुरू होता. अगदी अण्णांना देवाज्ञा झाली त्या दिवशी सकाळी कोणाला वाटले पण नव्हते अण्णा आज आपल्यातून निघून जातील. पण शेवटी नियती पुढे कोणीही काहीही करू नकत नाही. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे.

 

अण्णांचा हा थक्क करणारा प्रवास अखेर ८५ व्या वर्षी दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी कायमचा थांबला. त्यांच्या निघालेल्या अंत्ययात्रा वेळी जमलेल्या गर्दीने अण्णांच्या व्यक्तीमत्वाची जाणीव दिसून येते.

 

#### *अंतिम शब्द*

 

अण्णांच्या या सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्याचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी नक्कीच जेवढे शक्य होईल तेवढा प्रयत्न आम्ही करू. शरीराने ते आमच्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

 

*अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.* 🌸

 

 

श्री. सचिन मुकुंद ओक , उपसरपंच- कोतळूक ग्रामपंचायत

सरचिटणीस भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *