नानांचे नाव देताय… दर्जा पण राखा!

नानांचे नाव देताय… दर्जा पण राखा!

*नानांचे नाव देताय.. दर्जा पण राखा!*

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

पॉवर हाऊस (सागर प्रेस ) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका ) या मुख्य रस्त्याला दैनिक सागरचे चतुरस्त्र संस्थापक संपादक, कोकणचे बुद्धिवैभव आणि आपल्या ‘ प्रवाहाने ‘ समाजातील विविध स्तरातील लोकांच्या मनात आदराचे, आपुलकीचे स्थान ज्यांनी मिळविले त्या स्व. निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांचे नाव देण्याचा कार्यक्रम चिपळूण नगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला होणार आहे. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, आम. भास्कर जाधव, आम. शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नानांवर प्रेम करणारी मंडळी यांची उपस्थिती असणार आहे. या मुख्य रस्त्याला नानांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा चिपळूण नगरपालिकेचा निर्णय अभिनंदनास पात्र आहे.

नगरपालिका निवडणुकीदरम्यान ‘सागर वेव्ह’ चॅनलच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एका व्यासपीठावर आणून त्यांची शहराच्या एकंदर विकासासंदर्भातील भूमिका, विचार जाणून घेण्याचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या रस्त्याचे रुंदीकरण करुन एक मॉडेल रोड म्हणून काम करणार आणि त्याला स्व. नानांचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेपैकी एक स्व. नानांचे नाव देण्याचे कार्य स्वातंत्र्यदिनी होत आहे त्याबद्दल उमेश सकपाळ आणि सर्वच सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन! पण….

पण आता एका गोष्टीची अपेक्षा म्हणा, विनंती म्हणा करावीशी वाटते. नानांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे संपूर्ण आयुष्य या चिपळूण शहरात दुधात साखर मिसळून जावे अशा रितीने व्यतित झाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात नानांनी दैनिक सागरच्या माध्यमातून चिपळूणचे नाव देश पातळीवर पोहचवलेच, पण राजकारण असो… साहित्यसंमेलन असो… संगीत महोत्सव असो… नाट्य संमेलन असो…धार्मिक कार्यक्रम असो… नानांच्या वक्तृत्वाने श्रोत्यांचे कान तृप्त झाले. नानांबरोबरच्या गप्पा हा तर वेगळाच अनुभव. म्हटलं तर मेजवानीच! नाना चिंचनाक्यापासून ते न्यूयॉर्कपर्यंत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात सहज फिरवून आणत असत. कोणत्याही विषय आणि कोणत्याही स्तरातील, क्षेत्रातील माणसाशी नाना सहजपणे गप्पा मारत याचा अनुभव असंख्य जणांना आहेच. सांगायचा मुद्दा हा आहे कि ज्यांनी चिपळूणकर जनतेचे बौद्धिक, कला, साहित्य क्षेत्र समृद्ध केलं, ज्यांनी एक आमदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण समोर ठेवलं त्या नानांचे नाव रस्त्याला देताना त्या रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याची, एक मॉडेल रोड म्हणून जे काही करावे लागेल ते चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारीही स्वतः नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सर्व नगरसेवक, नप अधिकारी आणि प्रामुख्याने जो कोणी ठेकेदार असेल त्यांची आहे. नामकरणाच्या कार्यक्रमात संबंधितानी त्याचे ‘ वचन ‘ द्यावे आणि पावसाळा संपल्यानंतर लगेचच रस्त्याचे काम सुरु होऊन ते वेळेत पूर्ण कसे होईल हे पाहिले पाहिजे. एकदा काम केल्यावर त्या रस्त्याला किमान दहा वर्ष तरी खड्डा पडणार नाही, गटार कोसळणार नाही याची ग्वाही दिली पाहिजे. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच आहे कि केवळ नाव देण्याचे श्रेय घेऊ नये त्याच्या दर्जाचीही जबाबदारी घेतली पाहिजे तरच ती स्व. नानांना खरी श्रद्धांजली ठरेल. आज चिपळूण शहरातल्या अनेक रस्त्यांची काय अवस्था आहे, महाराष्ट्र हायस्कूल मॉडेल रोडचं काय झालं याची कल्पना नागरिकांना आहेच.

स्व. नानांचे नाव मुख्य रस्त्याला देत आहात याचा आनंद प्रत्येकालाच आहे. वर्षभरात हा रस्ता उत्तम व्हावा एवढीच माफक अपेक्षा. हायवेवरून चिपळूण शहरात प्रवेश करताना बाहेरच्या लोकांनाही चांगले वाटले पाहिजे असा रस्ता तयार करा. धन्यवाद.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *