फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्न…

फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्न…

कोकणातील तरुणांनी शेतीकडे वळण्याची गरज : फळबाग लागवड ठरू शकते शाश्वत उत्पन्नाचा मार्ग –

             मनोज गांधी, मंडळ कृषी अधिकारी, चिपळूण

 

कोकण हा नैसर्गिक सौंदर्य, डोंगरउतार, भरपूर पाऊस आणि सुपीक जमिनींसाठी ओळखला जाणारा प्रदेश आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम यांसारख्या फळपिकांसाठी कोकणाची जमीन अतिशय पोषक मानली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कोकणातील ग्रामीण भागात एक वेगळीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग शहरांकडे स्थलांतर करत आहे. यामुळे गावातील शेती, विशेषतः डोंगरउतारावरील जमीन ओसाड पडू लागली आहे.

आज कोकणातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन मुंबई, पुणे, ठाणे किंवा इतर शहरांकडे नोकरीसाठी जात आहेत. शहरातील नोकरी म्हणजे स्थिर उत्पन्न, सुरक्षित भविष्य आणि आधुनिक जीवनशैली अशी मानसिकता तयार झाली आहे. मात्र शहरातील वाढती स्पर्धा, महागाई, मानसिक ताण आणि अस्थिर रोजगार यामुळे अनेक तरुणांना अपेक्षित समाधान मिळत नाही.

दुसरीकडे गावातील शेती मात्र मनुष्यबळाअभावी दुर्लक्षित होत आहे. अनेक कुटुंबांची शेती आज फक्त नावापुरती उरली आहे. पूर्वी जिथे भातशेती, फळबागा आणि विविध पिकांची लागवड होत होती, त्या जमिनी आज गवत आणि झुडपांनी व्यापलेल्या दिसत आहेत.

उताराच्या जमिनी फळबागांसाठी अत्यंत उपयुक्त असून

कोकणातील भौगोलिक रचना ही डोंगरउतारांची आहे. अशा उताराच्या जमिनी पारंपरिक पिकांसाठी काही प्रमाणात मर्यादित असल्या तरी फळबाग लागवडीसाठी त्या अतिशय उपयुक्त ठरतात. विशेषतः आंबा, काजू, कोकम, फणस, नारळ आणि बांबू यांसारख्या पिकांना अशा जमिनीत चांगली वाढ मिळते.

फळबाग लागवड ही एकदाच केलेली गुंतवणूक असून त्यातून अनेक वर्षे नियमित उत्पन्न मिळू शकते. योग्य नियोजन, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि तांत्रिक मार्गदर्शन घेतल्यास कमी मजुरांमध्येही फळबाग यशस्वीपणे विकसित करता येते.

आज अनेक तरुण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग शेतीत यश मिळवत आहेत. सोशल मीडिया, ऑनलाइन विक्री, प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन यांची जोड दिल्यास शेती हा फक्त पारंपरिक व्यवसाय न राहता आधुनिक उद्योग बनू शकतो.

 

शेतीकडे शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्याची गरज –

आजच्या काळात शेती ही फक्त उपजीविकेचे साधन नसून व्यवसाय म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. विशेषतः फळबाग शेतीत दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाची क्षमता अधिक आहे.

एकदा फळबाग उभी राहिल्यानंतर अनेक वर्षे उत्पादन मिळते. आंबा, काजू आणि नारळ यांसारख्या पिकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यासोबतच प्रक्रिया उद्योग — जसे की आंबा पल्प, काजू प्रक्रिया, कोकम सरबत, फणस प्रक्रिया — यामधूनही अतिरिक्त उत्पन्न निर्माण होऊ शकते.

तरुणांनी आधुनिक शेती, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती व्यवस्थापन, ऑनलाइन मार्केटिंग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीला नवे स्वरूप देण्याची गरज आहे.

 

शासनाच्या विविध योजना तरुणांसाठी लाभदायक –

शासनाकडून फळबाग लागवड आणि शेती विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, ठिबक सिंचन योजना, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग अशा अनेक योजनांचा लाभ तरुणांनी घेतला पाहिजे.

फळबाग लागवडीसाठी अनुदान, सिंचन सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. कृषी विभाग यांच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन मिळू शकते.

जर तरुणांनी शासनाच्या योजनांचा योग्य वापर केला तर गावात राहूनही चांगले आर्थिक उत्पन्न मिळवणे शक्य आहे.

 

वाढते तापमान आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक –

सध्या जगभरात हवामान बदलाचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. वाढते तापमान, अनियमित पाऊस, जमिनीची धूप आणि पाण्याची कमतरता ही मोठी आव्हाने निर्माण होत आहेत. कोकणालाही याचा परिणाम जाणवू लागला आहे.

अशा परिस्थितीत वृक्ष लागवड हा सर्वात प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरतो. फळझाडे केवळ उत्पन्न देत नाहीत तर पर्यावरण संतुलित ठेवण्याचेही मोठे काम करतात. झाडांमुळे मातीची धूप कमी होते, भूजल पातळी सुधारते, कार्बन शोषला जातो आणि जैवविविधता टिकून राहते.

कोकणातील डोंगरउतारांवर मोठ्या प्रमाणावर फळबागा विकसित झाल्यास पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक समृद्धीही साधता येईल.

 

कोकणातील तरुणांनी पुढाकार घेण्याची वेळ –

आज गरज आहे ती कोकणातील तरुणांनी शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची. गावातील ओसाड जमिनी पुन्हा हिरव्यागार करण्याची. फळबाग लागवड, नैसर्गिक शेती, प्रक्रिया उद्योग आणि कृषी पर्यटन यांच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण करण्याची.

जर प्रत्येक गावातील काही तरुणांनी पुढाकार घेतला तर कोकणातील शेती पुन्हा नव्या उमेदीने उभी राहू शकते. पर्यावरण संवर्धन, शाश्वत उत्पन्न आणि गावांचा विकास या तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी फळबाग लागवड हा अत्यंत प्रभावी मार्ग ठरू शकतो.

“शेती ही फक्त परंपरा नाही, तर भविष्यातील समृद्धीचा मार्ग आहे,” हे कोकणातील तरुणांनी ओळखण्याची वेळ आता आली आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *