आंबा(काढणी पश्चात)बागेचे व्यवस्थापन!

आंबा(काढणी पश्चात)बागेचे व्यवस्थापन!

आंबा काढणीचा हंगाम संपल्यानंतर बागेचे व्यवस्थापन –

मनोज गांधी, मंडळ कृषि अधिकारी चिपळूण

 

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंबा काढणीचा हंगाम संपल्यानंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकदा फळ विक्री पूर्ण झाल्यानंतर बागेकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र पुढील वर्षी चांगला मोहोर, निरोगी झाडे आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी काढणीनंतरचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

*बागेची स्वच्छता-*

आंबा काढणी पूर्ण झाल्यानंतर झाडाखाली पडलेली फळे, रोगट फांद्या, वाळलेली पाने व इतर कचरा गोळा करून नष्ट करावा. यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. बाग स्वच्छ व हवेशीर राहिल्यास झाडांची वाढ चांगली होते.

*छाटणी व आकार व्यवस्थापन -*

काढणीनंतर वाळलेल्या, रोगट, एकमेकांवर घासणाऱ्या किंवा अनावश्यक फांद्या छाटाव्यात. झाडाच्या मध्यभागी सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. छाटणीमुळे नवीन फुटवे चांगले येतात व पुढील हंगामातील मोहोरासाठी पोषक वातावरण तयार होते.

*खत व्यवस्थापन-*

फळधारणा झाल्यानंतर झाडातील मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर झालेला असतो. त्यामुळे झाडांना पुन्हा जोम मिळण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.

माती परीक्षणाच्या आधारे रासायनिक खतांचा वापर करावा.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास त्यानुसार पूर्तता करावी.

*पाणी व्यवस्थापन -*

पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडाभोवती आळे तयार करावेत. पावसाचे पाणी झाडांच्या मुळांपर्यंत जास्तीत जास्त मुरेल यासाठी झाडाच्या वरील बाजूस चर मारून जलसंधारणाची कामे करावीत.

*कीड व रोग नियंत्रण-*

आंबा काढणीनंतर बागेची नियमित पाहणी करावी. खोडकिडा, तुडतुडे, फुलकिडे तसेच करपा, भुरी यांसारख्या रोगांचे निरीक्षण करावे. रोगट फांद्या काढून नष्ट कराव्यात. आवश्यकतेनुसार कृषि विभागाच्या अधिकार्‍यांचा सल्ला घेवून उपाययोजना कराव्यात.

*तण नियंत्रण -*

झाडाभोवती वाढलेले तण काढून टाकावेत. तणामुळे अन्नद्रव्ये व पाण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. तणांचे आच्छादन (मल्चिंग) म्हणून उपयोग केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

*मृद व जलसंधारण -*

कोकणातील उताराच्या जमिनीमध्ये पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे समपातळी चर, कंटूर ट्रेंच यांसारखी कामे करावीत. यामुळे माती व पाण्याचे संवर्धन होते.

*आंतरपीक नियोजन-*

आंबा बागेमध्ये उपलब्ध जागेनुसार हिरवळीच्या खतांची पिके घेता येतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि अतिरिक्त उत्पन्न मिळते.

आंबा काढणीचा हंगाम संपल्यानंतरचा काळ हा पुढील हंगामाच्या यशाचा पाया असतो. बागेची स्वच्छता, योग्य छाटणी, संतुलित खत व्यवस्थापन, जलसंधारण आणि नियमित निरीक्षण यामुळे झाडे निरोगी राहून पुढील वर्षी चांगला मोहोर व भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते. त्यामुळे आंबा विक्री संपली म्हणजे काम संपले असे न समजता, त्यानंतरच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे.

 

*आंबा काढणीनंतरची योग्य काळजी म्हणजे पुढील हंगामातील भरघोस उत्पादनाची खात्री.*

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *