चिपळूण पालिकेवर ठाकरे शिवसेनेची धडक…

चिपळूण पालिकेवर ठाकरे शिवसेनेची धडक…

*“चिपळूण नगरपरिषदेत शिवसेनेची धडक; अपूर्ण कामांवर प्रशासनाला जाब, आंदोलनाचा इशारा”*

 

चिपळूण शहरातील प्रलंबित कामे, प्रशासनाची ढिलाई आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणने आक्रमक भूमिका घेत थेट नगरपरिषदेत धडक दिली. शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेत निवेदनांच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला.

 

बहादुरशेख नाका टेलिफोन एक्सचेंज ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळा दरम्यानचा मंजूर रस्ता मुद्दाम अर्धवट ठेवण्यात आल्याचा आरोप करत या रस्त्यामुळे नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

 

याचबरोबर शहरात महानगर गॅस कंपनीकडून टाकण्यात आलेल्या पाईपलाईननंतर रस्त्यांवर उघडेच ठेवलेले खड्डे हा नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ असल्याचा आरोप करण्यात आला. कंपनीने आगाऊ रक्कम भरूनही नगरपरिषदेकडून दुरुस्ती न होणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असल्याचे सांगत तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली.

 

तिसऱ्या निवेदनात “रम्बलर स्ट्रीप” कामातील गंभीर दिरंगाईचा मुद्दा उपस्थित करत, करारनामा व कामाचे आदेश देऊनही संबंधित ठेकेदाराकडून विविध कारणे देत दोन वेळा मुदतवाढ घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. केवळ ६० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित असलेले हे काम वारंवार मुदतवाढ मिळूनही अद्याप प्रत्यक्षात पूर्ण झालेले नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे सदर ठेका तात्काळ रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी करण्यात आली.

 

या तिन्ही निवेदनांवर चर्चा करताना मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सर्व बाबी गांभीर्याने घेत संबंधितांना नोटिसा बजावणे, आवश्यक तेथे ठेके रद्द करणे आणि कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनांवर आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

दरम्यान, केवळ निवेदनांपुरते मर्यादित न राहता शिष्टमंडळाने शहरातील इतरही प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. मुरादपूर येथील गणपती मंदिर ते अमेय पार्क रस्त्याची दुरवस्था, ग्रॅव्हिटी पाईपलाईन योजनेतील संथ गती, तसेच पंचायत समिती कार्यालयासमोरील महामार्गालगत बुद्धवाडी ते दीपक हॉटेल दरम्यानच्या सर्विस रोडच्या समस्या यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीत विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुका समन्वयक राजू देवळेकर, उपशहर प्रमुख संजय रेडीज, विभाग प्रमुख रविराज उर्फ बापू चिपळूणकर, गणेश फके, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे यांनी सहभाग घेतला. सदर चर्चेला बांधकाम सभापती कपिल शिर्के उपस्थित असतानाही शहरातील प्रलंबित कामांबाबत प्रशासनाची निष्क्रियता अधोरेखित झाली.

 

यावेळी उपशहर प्रमुख राजू विखारे, राजन खेडेकर, मनोज पांचाळ, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, संतोष मिरगल, विनोद कानेकर, मनोज शिंदे, महेंद्र काणेकर, राजू अदावडे, पंकज कदम, राहुल गुरव, आयुष कुबडे, राजा पडवेकर, महेश पडवेकर, समीर माळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सुरुवातीला मुख्याधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असले, तरी त्यानंतरच्या चर्चेत शिवसेनेने प्रशासनाला जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला. “आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम हवे; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराच यावेळी देण्यात आला.

 

चिपळूणकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांकडे प्रशासनाने आतापर्यंत केलेला दुर्लक्षाचा पवित्रा आता टिकणार नाही, हे आजच्या धडक आंदोलनातून स्पष्ट झाले आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *