सावर्डे गटात दोन माजी सभापती आमनेसामने?
सावर्डे गटात दोन माजी सभापती लढणार आमनेसामने?
सौ. पूजा निकम व सौ. धनश्री शिंदे यांच्यात रंगणार मुख्य लढत?

चिपळूण : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीत चिपळूण तालुक्यात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उबाठा सेनेच्या माजी सभापती व माजी खासदार विनायक राऊत यांच्या कट्टर समर्थक सौ. धनश्रीताई शिंदे या एक दोन दिवसात शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होईल. विशेष म्हणजे सौ. शिंदे या सावर्डे जिल्हा परिषद गटात माजी सभापती आणि आमदार शेखर निकम यांच्या पत्नी सौ. पुजाताई निकम यांच्या विरोधात लढण्याची तयारी ठेवली आहे.
आपला पूर्व विभागातील पारंपारिक गट सोडून दुसऱ्या गटातून लढण्याच्या सौ. शिंदे यांच्या या निर्णयाची तालुक्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सौ. शिंदे या उबाठाच्या महिला जिल्हा उपसंघटक होत्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीत उबाठाकडून प्रचारात आघाडीवर होत्या. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली तरी नेतृत्वाकडून ठोस हालचाली दिसत नाहीत.
यापुर्वीच सौ. शिंदे यांनी अलोरे गटातून जिल्हा परिषदेची तयारी केली होती. अलोरे गटातील प्रत्येक गावात त्यांना चांगला संपर्क ठेवला होता. मात्र हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाला. सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
विशेष म्हणजे सावर्डे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती सौ. पुजाताई निकम या लढणार असल्याचे बोलले जात आहे. सौ. निकम यांनी या गटात लोकांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत त्या स्थानिक उमेदवार असल्याने हा मतदारसंघ त्यांना परिचित आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ उमेदवाराची शिवसेनेला उणीव भासत होती. मात्र जे होईल ते होइल निवडणूकीला सामोरे जायचे या भावनेतून सौ. धनश्रीताई शिंदे यांनी सावर्डे गटातून शिंदे सेनेकडून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. तसे झाल्यास सावर्डे जिल्हा परिषद गटात ही लढत लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की.

