रमेशभाई.. खिलाडूवृतीने निवृत्ती घ्या!

*रमेशभाई…खिलाडूवृत्तीने निवृत्ती घ्या!*

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण. मो . 9850863262

चिपळूणचे माजी आमदार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेशभाई कदम यांनी आज पक्षाला रामराम केला आहे. चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर रमेशभाईंच्या राजीनाम्याची कुजबुज सुरु होती. आज राजीनामा प्रत्यक्ष कृतीत आला. रमेशभाई यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्याच्या, जिल्ह्याच्या राजकारणात काही प्रमाणात खळबळ उडणे शक्य आहे, मात्र ती फार मोठ्या प्रमाणात नाही हेही वास्तव आहे. भाईंच्या राजीनाम्यावर ऐकू येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता रमेशभाईंनी आता राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे असे वाटते आणि तीही अत्यन्त समाधानाने, खिलाडूवृत्तीने!

ते ज्या पक्षात होते आणि ते ज्यांना आदर्श मानतात ते पवारसाहेब 85 व्या वर्षीही पक्षासाठी झटतात, फिरतात, काम करत आहेत हे जरी खरं असलं तरी तोच क्रायटेरिया सर्वांना लावून उपयोग नाही. कारण पवारसाहेब हे फार वेगळं रसायन आहे. भाईंनी वयाची 75 पार केलेली आहे. ते अजूनही शारीरिक, मानसिकदृष्ट्या एकदम फीट आहेत. ‘ अवघे पाऊणशे वयोमान ‘ हे त्यांच्या बाबतीत खरे आहे. त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असा आहे याबाबत कोणाचेच दुमत नाही. कायम हसतमुख, प्रसन्न असणारा नेता म्हणून रमेशभाईंचेच नाव पुढे येते. हे सर्व असलं तरी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी कारण गेल्या काही वर्षांत त्यांची राजकारणाची दिशा चुकत राहिली. त्यांना सूर गवसला नाही. त्यासाठी थोडेफार ते जबाबदार आहेत तसंच राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारणही जबाबदार आहे. 2009 च्या निवडणुकीनंतर भास्करराव जाधव यांच्या रूपाने भाईंच्या राजकारणाला लगाम घातला गेला. त्यांची दिशा चुकत गेली. घड्याळातली वेळही चुकत गेली. रमेशभाईंनी 1999 च्या निवडणुकीत नुकत्याच जन्माला आलेल्या राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली, फॉर्मात असलेल्या भास्कररावांना जबरदस्त टक्कर दिली. 2004 मध्ये चिपळूणची आमदारकी प्राप्त केली आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकत ठेवला. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत नवख्या सदानंद चव्हाण यांनी कदम यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केलं. एकीकडे मोठा पराभव, दुसरीकडे भास्कररावांचे पक्षात वाढलेलं महत्व, ज्येष्ठ नेत्यांनी केलेली उपेक्षा अशा कात्रीत रमेशभाई सापडले ते कधी त्यातून सुटलेच नाहीत. मधल्या काळात त्यांचा शेकाप, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आता राजीनामा, त्यानंतर चर्चेत असलेला शिंदे गटातील किंवा अजितदादा गटातील प्रवेश…असा हा प्रवास आहे. तो अजून चालू राहणार आहे की थांबणार आहे हे भाईंनाच माहिती. मधल्या काळात त्यांचा शेकाप प्रवेश हा भाईंचा पक्षाने केवळ वापर म्हणून केलेला प्रयोग होता. मात्र एकंदर ‘भाईंचा पक्षप्रवेश ‘ हा सामान्य माणूस आणि त्यांचे राजकीय विरोधक यांच्यादृष्टीने केवळ करमणूक ठरत आहे.

आमदार झालेल्या व्यक्तीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी की नाही यावरही मोठी चर्चा झाली. टीका झाली. तरीही भास्कररावांनी शब्द दिला, मित्रवत प्रेम दिले आणि भाई निवडणूक रिंगणात उतरले. चिपळूण शहर म्हणजे रमेशभाई असं एक काळ समीकरण झालं होतं, पण काळ बदलला, राजकारण बदललं, पिढी बदलली आणि शेवटी या सर्वांचा परिणाम भाईंच्या पराभवात झाला. अर्थात याला जबाबदार महाविकास आघाडीतील बिघाडीही आहेच. भाई नगराध्यक्ष झाले असते तर त्यांच्या राजकीय वाटचालीत हा महत्वाचा टप्पा ठरला असता. कदाचित ते पुन्हा ताकदवार बनले असते, पण नियतीच्या मनात तसे नाही. निवडणूक प्रचारात भाईंनी ही आपली अखेरची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते.

आता एकंदर राजकीय परिस्थिती पाहता भाईंनी सन्मानपूर्वक आणि खिलाडूवृत्तीने राजकारण संन्यास घ्यावा हे उचित. भाई राजकारणात असले तरी ते मुळातले खेळाडू आहेत. जय – पराजय, टीका – कौतुक, आनंद – दुःख, मित्र – शत्रू अशा कोणत्याही क्षणी समतोल ठेवणारा, नेहमी हसतमुखाने वावरणारा, सहज आपलंस करणारा असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे भाईंनी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन खिलाडूपणे सक्रीय राजकारणातून संन्यास घ्यावा.

संन्यास घेतला तरी त्यांची स्वतःची अशी मतपेटी असणार आहेच. त्याचा कधी, कुठें, कसा वापर करायचा हे ते ठरवू शकतात. कोणाला बांधील नाही. कोणी अन्याय केला म्हणून रडण्याची गरज नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची.

राजकारण सोडून भाई क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहू शकतात. त्यांना त्याची विशेष आवड आहेच. तिथे त्यांनी योगदान द्यावे हे अधिक चांगले. फक्त पक्ष प्रवेशाचे खेळ आता नको. तो स्पोर्ट्स मध्ये मोडत नाही. इतकी वर्ष राजकारणात सक्रिय राहिलात, मानसन्मान, प्रेम मिळाले. त्यात समाधान मानायला आणि थांबायला हरकत नाही.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *