जि.प.निवडणूक भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात!
जि.प. व पं.स.निवडणूक : विनायक राऊत
यांनी घेतली आढावा बैठक

चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, शिवसेना नेते व सचिव श्री. विनायक राऊत यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धावता आढावा दौरा केला. या दौऱ्यांतर्गत त्यांनी चिपळूण तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आढावा व संवाद बैठक घेतली.
ही बैठक जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम आणि युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीदरम्यान विनायक राऊत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच चिपळूण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची निवडणूक शिवसेना नेते व गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना राऊत यांनी नुकत्याच पार पडलेल्या चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे व एकजुटीने काम केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार राजू देवळेकर यांनी पक्षाच्या आदेशानेच निवडणूक लढविली, हे स्पष्ट करत चिपळूण नगरपरिषदेतील नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, सत्ता, पैसा व यंत्रणा एकीकडे असताना तसेच पक्षाचे नाव, चिन्ह, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी फोडले गेले असतानाही मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणसाच्या जोरावर मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी लढा दिला आणि तब्बल ७१ नगरसेवक निवडून आणले. हा संघर्ष आपणा सर्वांसाठी आदर्श आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम आणि संपर्कप्रमुख सुरेश कदम यांनीही इच्छुक उमेदवारांना गावातील प्रत्येक नागरिकांशी वैयक्तिक संपर्कावर भर देण्यास सांगून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून बळ दिले आणि आम्ही पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही देवून चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढवून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा अनंत कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संपर्क प्रमुख अशोकराव नलावडे, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजू देवळेकर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, महिला आघाडी क्षेत्र संघटिका रुमा देवळेकर, तालुका संघटिका मानसी भोसले, शहर संघटिका वैशाली शिंदे, युवती सेना तालुका अधिकारी शिवानी कासार, उपतालुका प्रमुख नैनेश उर्फ राजाभाऊ नारकर, सचिन शेट्ये, उपतालुका संघटिका दिप्ती सावंत-देसाई, युवती सेना उपतालुका अधिकारी तीर्था लाड, यांच्यासह सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच संलग्न संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

