‘त्या’ पाहुण्यांना चांगलं फटकवा…
‘अतिथी देवो भव ‘ ही आपली अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे. संस्कृती आहे. आलेल्या पाहुण्यांचे चांगल्या पद्धतीने आगत – स्वागत करणं हे आपल्यासाठी समाधानाची बाब असली तरी आलेला पाहुणाही किंवा त्याचं येणं हेही तितकंच आनंददायी असावं. पाहुणा जर आगाऊ असेल तर मात्र त्याला ‘ अतिथी देवो भव ‘ म्हणून सन्मान देण्याची गरज नक्कीच नाही. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की आता कोकणात पर्यटन व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरावत आहे. कोकणाचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, येथील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ठेव अनुभवण्यासाठी देश – विदेशातून हजारो पर्यटक कोकणात येत असतात. येथील अथांग समुद्र, विस्तीर्ण किनारे, डोंगरदऱ्या, नारळी – पोफळीच्या बागा, पुरातन मंदिरे यासह येथील खाद्यसंस्कृतीही पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करत असते. गोवा, केरळ, कर्नाटक सह अनेक राज्यातून मूलभूत सुखसोयिंमुळे आणि पर्यटनकेंद्री धोरणामुळे तेथील पर्यटन व्यवसाय आपल्यापेक्षा कैक पटीने विस्तारला आहे. आदरातिथ्य हाही एक प्लस पॉईंट आहे. आपण याबाबतीत कमी पडतोय हे खरं आहे, मात्र नवीन पिढी याबाबतीत सजग दिसते. चांगले रस्ते नसणं तसेच पर्यटकांच्या दृष्टीने अन्य ज्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत त्याबाबत आपले सरकार, संबंधित विभाग, ग्रामपंचायत आदी तसे उदासीनच दिसतात. अर्थात असं असलं तरी गेल्या काही वर्षांचा विचार करता कोकणातील पर्यटन वाढत आहे, व्यवसाय वाढत आहे यात शंका नाही. फक्त त्याला अधिक चांगलं स्वरूप कसं देता येईल यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
असो, मूळ मुद्द्याकडे वळतो. कोकणाच्या विकासासाठी, येथील तरुण, महिलांच्या रोजगारासाठी, स्थानिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्यटकांचा ओघ वाढता राहील, तो कायमस्वरूपी राहील हे अत्यन्त गरजेचे आहे याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण…
येणाऱ्या पर्यटकांनी आपण पर्यटक आहोत, कोकणचे पाहुणे आहोत याचे भान राखले पाहिजे. आपण जसा कोकणच्या निसर्गसौंदर्याचा, येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोकणात येता त्यांचप्रमाणे तुमचे येणं हेही येथील स्थानिकांना आनंद देणारं असलं पाहिजे. येथील शांतता, शिस्त बिघडणार नाही, येथील संस्कृतीला धक्का बसणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे. आम्हाला पर्यटन वाढवायचं आहे, आर्थिक उन्नती हवीय त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची मुजोरी, दादागिरी, बेशिस्तपणा खपवून घेतला पाहिजे असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला वेळीच छेद देण्याची गरज आहे.
यासाठी मुरुड किंवा हर्णे समुद्रकिनारी तरुणांकडून दारू पिऊन हुल्लडबाजी करण्याच्या, गाडयांची धोकादायक पद्धतीने रेस लावण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्यामुळे अन्य पर्यटकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होतो. त्यांचा हिरमोड होतो. वारंवार आवाहन करूनही, सूचना देऊनही असे हुल्लडबाजीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांनाही जर हे पर्यटक धूप घालत नसतील तर पोलिसांच्या वर्दीचा काय उपयोग? त्यांच्या लाठ्या काय नुसत्या शोभेसाठी आहेत?
पर्यटक असला म्हणून काय झालं… त्यांची हुल्लडबाजी का सहन करायची.. हे पर्यटक अतिथी नाहीत, देव त्याहून नाहीत.. ते आहेत दानव.. सैतान! त्यांना असं फटकावून काढा की कित्येक दिवस त्यांना उठता पण नाही आलं पाहिजे आणि बसताही… दबंग सिनेमातल्या डायलॉगप्रमाणे ‘कहा से हंसे और कहा से पादे समझ में ना आना चाहिए’. त्यांचा पार्श्वभाग चांगला सुजवून ठेवा.
जी परिस्थिती या हुल्लडबाज तरुणांची तीच परिस्थिती समुद्रात बुडणाऱ्यांची! आगाऊपणा ते करतात, बुडतात ते आणि कारण नसताना आमचे समुद्रकिनारे मात्र बदनाम होतात. समुद्र जसा जिथे आहे तसाच आहे. तो काय निमंत्रण घेऊन येत नाही…माझ्या पोटात शिरा आणि मरा! ही सगळी बेशिस्त, बेजबाबदार, आगाऊ पर्यटकांची चूक आहे. समुद्रात खोलवर जाणाऱ्यावर लक्ष ठेऊन न बुडता तो बाहेर आला की त्याला पण चांगला फटकवून काढायला हवे. दुसरा पर्याय नाही. येणाऱ्या पर्यटकांपैकी दोन चार टकली आगाऊ असतात पण त्यांच्यामुळे इतरांना त्रास होतो, पर्यटनाचा आंनद घेता येत नाही. येताना दहा जणं आले तर जाताना सर्व परत जातील याची खात्री नसते. कारण त्यात बुडण्याची हौस असणारे महाभाग असतातच.
पर्यटक यावेत, चांगल्या पद्धतीने यावेत. त्यांचे स्वागत उत्तम रितीने व्हावे. त्यांना पुन्हा पुन्हा यावेसे वाटावे. पण जे दुसऱ्या प्रकारचे पर्यटक आहेत त्यांना असं फटकवा की तो कोकणातच काय दुसरीकडे पण जायच्या स्थितीत राहता कामा नये.
मकरंद भागवत, चिपळूण.

