विनायक राऊत यांनी सुनेचे छळाचे आरोप फेटाळले…

विनायक राऊत यांनी सुनेचे छळाचे आरोप फेटाळले…

“जादूटोणा सुरू असताना तिचे आई-वडील काय करत होते?”        विनायक राऊतांनी आरोप फेटाळले….

 

मुंबई –    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्याच सुनेने गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुनेच्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत यांच्यासह एकूण सात जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत फिरोज बाबा नावाच्या एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे विनायक राऊत यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत यांच्या पत्नी सध्या घोडबंदर येथील चितळसर मानपाडा परिसरात राहतात. त्यांनी १० जून रोजी कापूरबावडी पोलिसांकडे धाव घेत राऊत कुटुंबाविरोधात लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार, २०१६ मध्ये एका विवाह संस्थेच्या माध्यमातून त्यांचे गितेश यांच्याशी लग्न जुळले होते. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये हा विवाह पार पडला.

तक्रारदार गिरीजा यांचा असा दावा आहे की, लग्नाआधी राऊत कुटुंबाने मुंबईत स्वतःचा बंगला असल्याची खोटी माहिती देऊन तिची फसवणूक केली. विवाहानंतर पतीने तिच्यासोबत वैवाहिक संबंध ठेवण्यास नेहमीच नकार दिला. याविषयी जेव्हा तिने विचारणा केली, तेव्हा तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली, तसेच तिचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला.

 

जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचा गंभीर आरोप

 

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुनेने सासरच्या मंडळींवर अघोरी कृत्य केल्याचा आरोप केला आहे. विनायक राऊत यांच्या कुटुंबाने सिंधुदुर्ग येथील काजीबाबा आणि फिरोज बाबा या दोघांच्या सहाय्याने आपल्यावर जादूटोणा केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयित फिरोज बाबा याला अटक केली आहे. या गुन्ह्यात विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश, राऊत यांच्या पत्नी यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.

 

५ वर्षांनी तक्रार का? विनायक राऊतांचा सवाल

 

या संपूर्ण प्रकरणावर माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडत सुनेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राऊत म्हणाले, “जर या सगळ्या गोष्टी घडत होत्या, तर सुनेसह तिच्या पालकांनी पाच वर्षांपूर्वीच तक्रार का केली नाही? आता इतक्या वर्षांनी तक्रार करण्यामागचे कारण काय?”

 

“लग्नानंतर गेल्या तीन वर्षांपासून मुलाची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यांनी तक्रारीमध्ये २०१८ ते २०२२ पर्यंत माझ्यासोबत अघोरी कृत्य केले जात होते असे म्हटले आहे. तर त्यावेळी त्यांनी ताबडतोब तक्रार का केली नाही. त्यांना कोणी अडवलं होतं का? आज २०२६ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही प्रकार घडले आहेत आणि ते २०२६ साली तक्रार करत आहे. यावरूनच दिसून येत आहे की यामागे काहीतरी आहे. हे सर्व प्रकार होत असताना त्यांनी तक्रारीत म्हटले की माझ्यासोबत माझे आई-वडील असायचे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.

 

“गिरीजा राऊत यांनी तीन महिन्यापूर्वी घरगुती हिंसाचाराचा अर्ज दाखल केला. त्यापूर्वी सुद्धा याप्रकरणी तरजोड करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. पहिल्या बैठकीमध्ये गिरीजाने पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. तीन खोल्यांचे घर मागितले होते, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली होती. दरमहा दोन लाख रुपये खर्चाला मिळावेत अशी मागणी केली होती. आम्ही ती मागणी मान्य केली नाही. त्यानंतर पुन्हा तिने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात नोटीस दिली, त्यानुसार १२ कोटी रुपयांची मागणी केली आणि दरमहा पाच लाख रुपये खर्च घर आणि गाडी ही मागणी कायम ठेवली. ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात घेऊन तिने खोटे आरोप केले आहेत ते आम्हाला मान्य नाही,” असंही विनायक राऊत म्हणाले.

 

“अघोरी उपचार केलेल्या आरोपांचा आणि पूर्णपणे खंडन करतो. आम्ही त्या पंथातील नाहीत. तिने स्वतःहून लिहून दिलय की अघोरी प्रकार असताना सुरू असताना माझ्यासोबत आई वडील असायचे मग आई-वडिलांनी हे सगळे प्रकार कसे होऊ दिले,” असा सवाल विनायक राऊत यांनी केला.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *