प्रमोद जठार यांना विधान परिषदेत जाण्याची संधी

प्रमोद जठार यांना विधान परिषदेत जाण्याची संधी

दीर्घ प्रतीक्षा : प्रमोद जठार यांना भाजपकडून संधी

विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा

 

मुंबई, दि. २८ : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांना तब्बल एक दशकानंतर पक्षाने मोठी राजकीय संधी देत विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर विवेक कोल्हे, संजय भेंडे, माधवी नाईक आणि सुनील कर्जतकर यांनाही उमेदवारी देत भाजपने संघटनात्मक काम करणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे.

 

भारतीय जनता पक्षाने येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीच्या मंजुरीनंतर ही नावे जाहीर करण्यात आली. कोकणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रमोद जठार यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले होते.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षबांधणीसाठी सातत्याने काम करणाऱ्या जठार यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोकणात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल, अशी पक्षाची भूमिका असल्याचे मानले जात आहे.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावच्या कोल्हे घराण्याचे वारसदार विवेक कोल्हे यांनाही विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ते माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. विदर्भातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नागपूरचे माजी जिल्हाध्यक्ष संजय भेंडे यांना संधी देण्यात आली आहे.

 

तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माधवी नाईक यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे विश्वासू आणि दीर्घकाळ काम करणारे नेते सुनील कर्जतकर यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

 

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या या यादीतून प्रादेशिक संतुलन, संघटनात्मक निष्ठा आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती स्पष्ट झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *