अखेर पिंपळी पुलासाठी निविदा प्रक्रिया सुरु!
चिपळूण – पिंपळी – नांदिवसें रस्त्यावरील पूल खचल्याच्या घटनेला अडीच महिने झाल्यानंतर आता अखेर या पुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निविदा जाहीर केली आहे. या पुलासह कॅनॉलवरील पुलाचीही नव्याने उभारणी करण्यात येणार असून या दोन्ही पुलांसाठी एकूण 29 कोटी 27लाख 79 हजार 982 रुपयांचा खर्च येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात पिंपळी – खडपोली पूल खचल्याने दसपटी, खडपोली एमआयडीसी परिसरासह आसपासच्या गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थ, कामगार यांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी म्हणून पेढांबे मार्ग अरुंद असल्याने आणि अवजड वाहनांसाठी वाहनांसाठी शिरगाव मार्गे मोठा वळसा घ्यावा लागत असल्याने वेळ पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंधरा दिवसात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोकण विभागाचे मुख्य अभियंता सचिन राक्षे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पूल नव्याने उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.
खचलेल्या पिंपळी पुलासह कॅनॉलवरील जुन्या पुलाचीही पुन्हा उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी 40 ते 45 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी या दोन्ही पुलांसाठी माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून त्याचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंदाजपत्र तयार करण्यात आले अखेर एमआयडीसीने दोन दिवसांपूर्वी निविदा जाहीर केल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पुलाचे कामही दर्जेदार आणि लवकरात लवकर होईल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

