सुरेश कलमाडी यांचे निधन…

 

पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश शामराव कलमाडी यांचे आज, मंगळवार ६ जानेवारी रोजी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणामुळे त्रस्त होते.

सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात आणि राष्ट्रीय पातळीवर एक प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पुण्याच्या राजकारणावर त्यांचा दीर्घकाळ मोठा प्रभाव राहिला. त्यांनी अनेक वर्षे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि पुण्याच्या राजकारणात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता.

मात्र, २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतील कथित घोटाळ्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. आयोजन समितीचे अध्यक्ष असताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली, मात्र त्यानंतरही ते सक्रिय राजकारणात कमबॅक करू शकले नाहीत.

गेल्या काही वर्षांपासून सुरेश कलमाडी हे प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली होती.

१ मे १९४४ रोजी जन्मलेले सुरेश शामराव कलमाडी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, अनेक वेळा खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून, दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. विशेष म्हणजे, ते भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक (पायलट) होते आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *