सुरेश कदम ठाकरे सेनेचे (रत्नागिरी द.) नवे संपर्कप्रमुख

सुरेश कदम ठाकरे सेनेचे (रत्नागिरी द.) नवे संपर्कप्रमुख

 

*दक्षिण रत्नागिरीच्या संघटनबांधणीस नवे बळ;

सुरेश कदम यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुखपदाची धुरा*

मुंबई :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कोकणातील संघटनबांधणीला आणखी बळकटी देण्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या दक्षिण रत्नागिरी विभागाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसैनिक श्री. सुरेश आत्माराम कदम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या सहीने ही माहिती देण्यात आली आहे.

 

मूळचे संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी (पोस्ट आंबव) येथील रहिवासी असलेले सुरेश कदम हे सध्या वडाळा विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि शिवसैनिकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांनी मुंबईसह कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

 

दक्षिण रत्नागिरी हा शिवसेनेसाठी पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी काळात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. कोकणातील शिवसैनिकांना एकत्रित ठेवून पक्षाची ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे या दृष्टीने सुरेश कदम यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक पुनर्बांधणी सुरू असताना दक्षिण रत्नागिरीतील ही नियुक्ती पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीतील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या निवडीबद्दल कोकणातील शिवसैनिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून सुरेश कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *