आकले ग्रामस्थांसाठी शिवसेना ठाकरे गट मैदानात!
*आकले ग्रामस्थांच्या न्यायासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ) निवेदन; मोजणीचे आदेश, प्रशासनाचे आश्वासन*
चिपळूण, दि. २२ एप्रिल २०२६ मौजे आकले येथील ग्रामस्थांच्या खाजगी जमिनीत वन विभागाच्या नावाखाली झालेल्या कथित बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या वतीने आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. बळीराम गुजर यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार, विभागीय वन अधिकारी तसेच आलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम, उपशहर प्रमुख श्री. संजय रेडीज व श्री. राजू विखारे, शहर सचिव श्री. प्रशांत मुळये, विभाग प्रमुख श्री. गणेश फके व श्री. संतोष मिरगल, तसेच तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री. सचिन चोरगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मौजे आकले येथील अनेक ग्रामस्थांच्या गट क्रमांकातील खाजगी जमिनीत वन विभागाच्या गट क्रमांक १०२४ च्या फेंसिंग कामाच्या निमित्ताने सिमेंटचे खांब रोवून तार ओढण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित ग्रामस्थांनी याबाबत यापूर्वी २४ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने अखेर शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
निवेदनात सदर प्रकरणी तात्काळ अधिकृत सरकारी मोजणी करण्याची मागणी करण्यात आली असून, मोजणीदरम्यान ग्रामस्थ, महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित ठेवून पंचनामा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच अतिक्रमण सिद्ध झाल्यास संबंधित सिमेंट खांब व फेंसिंग काढून टाकून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत नायब तहसीलदार यांनी संबंधितांशी सविस्तर चर्चा करून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर मोजणी करण्याचे आदेश देत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच उपविभागीय वन अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, डिसेंबर २०२५ मधील फेरफारानुसार वनक्षेत्र मोजणीचे काम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले असून, प्रत्यक्ष खांब उभारणीचे कामही संबंधित कंपनीमार्फत करण्यात आले आहे. तरीही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून सर्व संबंधितांच्या उपस्थितीत मोजणी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी निवेदनात नमूद केलेले महादेव भिकू गजमल, बारकू गंगाराम वनगे, जयवंत विठोबा वनगे, हनुमंत विठोबा जोशी, दत्ताराम सिताराम गोरखे, शंकर सोनू उदेग, संजय शिवराम जोशी, आत्माराम महादेव जोशी व रविंद्र कृष्णा कदम हे सर्व प्रभावित ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

