सूर्यकांत खेतले चिपळूणचे नवे सभापती!

चिपळूणच्या सभापतीपदी महायुतीचे सूर्यकांत खेतले तर उपसभापती संदेश आयरे चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर 14 जागा जिंकणाऱ्या महायुतीचा झेंडा फडकला आहे.आज मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या सूर्यकांत खेतले यांचा तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या संदेश आयरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या दोन उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम यांच्यासह महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे म्हणजेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्र निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजप-शिवसेना युतीच्या शिवसेना ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीत युतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला दरवाजे बंद केले होते परंतु सत्तेसाठी त्यांना राष्ट्रवादीलाच सोबत घ्यावे लागले.दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत गेल्या महिनाभरापासून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.अखेरीस पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापन केली आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले.सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करणार आहेत अशी चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अखेर राष्ट्रवादीने महायुतीसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. सभापती खेतले व उपसभापती आयरे यांचे अनेक मान्यवरानी अभिनंदन केले.

 

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *