यादव भाजपात! खडाखडी महायुतीत!!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
अखेर प्रशांत यादव, सौ. स्वप्ना यादव, त्यांचे शेकडो समर्थक यांनी भर पावसातही मोठे शक्तिप्रदर्शन करीत मुंबईत जाऊन भारतीय जनता पक्षात दणक्यात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा नेते आणि मंत्री नितेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांनी आपल्या नव्या राजकीय डावाचा प्रारंभ केला. खरं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती हेच या प्रवेश सोहळ्याचे खरे आकर्षण होते, मात्र दोन तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आणि जबाबदारीचे भान असल्यामुळे ते प्रदेश कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यातच छोटेखानी सभागृह, अन्य जिल्ह्यातील काही प्रवेश, तुफान पाऊस आणि कार्यकर्ते, समर्थक यांची गर्दी यामुळे श्री. आणि सौ. यादव यांच्या ‘स्वप्ना’तील दिमाखदार प्रवेश सोहळा होऊ शकला नाही याचे शल्य त्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे. खरं तर यादव यांनी ज्या नियोजनपूर्वक मुंबईपर्यंत शक्तिप्रदर्शन केले ते पाहता हा पक्षप्रवेश एखाद्या मोठ्या सभागृहात होणे आवश्यक होते. अर्थात प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पावसाळ्यानंतर चिपळूण दौऱ्यावर येण्याबाबत आग्रही विनंती केली आणि एक भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याला अनुकूलता दर्शवली असल्यामुळे आणि नितेश राणे यांचे पाठबळ असल्याने पुढील दीड दोन महिन्यात ‘पुन्हा एकदा’ स्वा. सावरकर मैदानावर भव्य शामियाना उभारलेला दिसेल. आणि तिथे फडणवीस यांची तोफ धडाडेल हे निश्चित आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरच आल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा भाजपसाठी आणि खुद्द प्रशांत यादव यांच्यासाठी मोठे बळ प्राप्त करून देणारा ठरेल यात शंका नाही. कोणताही कार्यक्रम भव्यदिव्य करणे, त्याला उत्तम नियोजनाची जोड आणि कल्पकता याबाबत सौ. स्वप्ना यादव यांनी आपली कुशलता अनेकदा सिद्ध केली आहेच. मागच्या विधानसभा निवडणुकीतही प्रशांत यादव उमेदवार असल्याने प्रचारात असले तरी सर्व प्रचार यंत्रणा, नियोजन यात सौ. स्वप्ना यादव यांची भूमिका अत्यन्त महत्वाची ठरली. ‘डॅशिंग लेडी ‘ म्हणून त्यांची ओळख आता कोकणात तरी झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावरही स्वप्ना यादव यांचे पाठबळ प्रशांत यांच्यासाठी मोलाचे असणार आहे.
सत्ताधारी भाजपात गेल्यामुळे त्यांना आता राजकारणात मोठा कॅनव्हास उपलब्ध झाला आहे. त्याआधारे ते वाशिष्ठी डेअरीचे जाळे किती विस्तारतात, त्यातून कोकणात ‘दुग्धक्रांती’ घडून येते का, शेतीपूरक उद्योगाना चालना देऊन रोजगारनिर्मिती किती प्रमाणात होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एका बाजूला स्वतःची राजकीय कारकीर्द आणि दुसऱ्या बाजूला डेअरीला येथील अर्थकरणाचा कणा बनवायचे असे आव्हान प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव, त्यांचे हितचिंतक, समर्थक यांना पेलायचे आहे.
गतवर्षी शरद पवारांच्या गटात प्रवेश करून त्यांनी राजकीय हुशारी सिद्ध केली होती. त्याचप्रमाणे आत्ता अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत भाजपात प्रवेश केला आहे. (आता हा प्रवेश योग्य की अयोग्य, शरद पवारांची साथ सोडणं नैतिक की अनैतिक ही जी चर्चा सुरु आहे किंवा पुढे चालू राहिल, कदाचित आरोप प्रत्यारोप होत राहतीलही, पण हा भाग सध्या तरी तितकासा महत्वाचा नाही. कारण आज राजकारण कधी कसे फिरेल हे खुद्द ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. आपण तर सामान्य.) भाजपची रत्नागिरी जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती बघता त्यांना अशा सर्व दृष्टीने मातब्बर नेत्याची गरज होतीच आणि यादव यांनीही भविष्याचा विचार करून ‘वाशिष्ठी’त कमळ फुलवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात आता नुकताच अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांना नेमकी काय जबाबदारी मिळते, कोणते बक्षीस मिळते हे अजून कळायचे आहे. मात्र ते सक्रीय होण्यापूर्वीच नवीनच राजकारण जन्माला येत आहे. प्रशांत यादव यांचा प्रवेश हा महायुतीत खडाखडीचे कारण बनेल असे एकंदर परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहता दिसते. प्रशांत यादव यांच्या पक्षप्रवेश प्रसंगी बोलताना आणि मागच्या आठवड्यात पिंपळीतील भेटीप्रसंगी नितेश राणे यांनी ‘शत प्रतिशत ‘ भाजपचा मुद्दा लावून धरलेला दिसतो. इतकेच नाहीतर चिपळूण – संगमेश्वरचा पुढचा आमदार भाजपचाच असेल असे ठामपणे सांगितले आहे. एवढेच नाहीतर नियोजनच्या निधीवरून उदय सामंत यांच्यावरही टीका केली आहे. मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी कोणी किती धमक्या देऊद्या घाबरू नका असे यादव यांना सांगत सामंत यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही फार सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, रवींद्र चव्हाण ज्याच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा तुम्हाला कोणी दुसरं त्रास देणार नाही हा विश्वास बाळगा. त्यांचाही रोख सामंत यांच्याकडे होता. त्याला कारणही तसंच आहे.
एकनाथ शिंदे यांच्यानंतर सर्वात प्रभावशाली नेता म्हणून उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांनी आपला जम बसवला आहे. राजकारणातल्या बरेवाईट डावपेचात ते चांगले तरबेज झाले आहेत. राजकारण कसे खेळावे यात ते प्रवीण झालेले आहेत. त्यानुसार सामंत हे गेली दोन वर्षे आणि आत्ताही काही दिवसांपूर्वीपर्यंत ‘वाशिष्ठीत’ ‘गळ’ टाकून बसले होते. मोठा मासा गळाला लागेल असं त्यांना वाटत होतं, मात्र मासा हुशार निघाला. तो ‘कमळात’ लपून बसला आणि नंतर राणेंच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे सामंत यांची मनाची चरफड होणं साहजिकच आहे. किंमतीवान मासा निसटला आणि तेही खूप प्रयत्न करून म्हटल्यावर कोणीही नाराज तर होणारच! त्यात नितेश राणे यांनी ‘शत प्रतिशत’चा नारा देऊन आणि भाजपचा आमदार होणार असं सांगून मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीला डिवचण्यात कसर सोडलेली नाही. एकमेकांविरुद्ध संघर्ष केलेले प्रशांत यादव आणि आमदार शेखर निकम यांना महायुती म्हणून एकत्र यावं लागलं तरी त्यांचे संबंध ताणले गेलेले असल्यामुळे ते मनाने एकत्र येतील असं ठामपणे सांगता येत नाही. येणाऱ्या सर्वच निवडणुकीत प्रशांत यादव यांच्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांना भाजपच्या आक्रमक धोरणाचा सामना करावा लागणार हे निश्चित. त्यात नितेश राणे यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी असल्याने महायुतीतील ‘ खडाखडी ‘ जास्तच वाढेल असं दिसतं. प्रशांत यादव यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण एकदम ‘ 360 ‘ डिग्रीत फिरलं आहे. वर्षभरापूर्वीचे सर्व संदर्भ बदलले आहेत. त्याहीपेक्षा कारकीर्द आणि वय याचा सारासार विचार करता प्रशांत यादव यांचे राजकीय भविष्य चांगले दिसते. नवीन पिढीतले राजकीय नेतृत्व म्हणून त्यांना मोठी संधी दिसते. उदय सामंत यांनी अगदी तरुण वयात ही किमया साधली. यानंतरच्या काळात जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर प्रशांत यादव यांचा ‘ उदय ‘ होईल आणि तळपते सूर्य ‘ मावळती’ कडे जातील असं वाटतं.
ता. क. – यादव यांची राजकीय भूमिका योग्य की अयोग्य हे शेवटी येणारा काळच ठरवेल. मात्र, यादव यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणं आपल्या हातात आहे.
