पोलिसांची गरजच काय? घरी बसवा!

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

मो. 9850863262

 

‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ‘ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करणे हे आपले कर्तव्य आहे असे पोलीस दल मानते. या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून सेवा बजावणारे अधिकारी , कर्मचारी अजून तरी मोठ्या प्रमाणात आहेत. लाचखोरी, हप्तेबाजी, वशिलेबाजी अशा अनेक कारणांनी पोलीस खाते बदनाम झाले आहे यात शंकाच नाही; पण तरीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, सामाजिक – धार्मिक सलोखा राखण्यासाठी, दंगली, जाळपोळ, दगडफेक, लुटालूट अशा प्रसंगी असेल किंवा अतिरेकी हल्ले असतील, आया बहिणींची सुरक्षितता असेल अशावेळी सर्वसामान्य माणसासाठी पोलीस हाच मोठा आधार असतो. वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. आपल्याला सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत यासाठी ते रात्रंदिवस , उन्हातान्हात कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांना ना अन्नपाणी मिळते ना कौटुंबिक सुख. ना राहण्याची धड सोय ना ड्युटीचे बंधन…त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान ठेवलाच पाहिजे. फारतर त्यांनी वाईट मार्गाला न जाता , आपल्या वर्दीला जागून अधिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडावे, वर्दीचा आदरयुक्त दरारा वाटेल असे वागावे अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.

पोलीस प्रशासन हे सरकार आणि जनता यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्याची नितांत गरज आहे. सीमेवर जसे आपले जवान रात्रंदिवस जागता पहारा देत असतात म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो तीच भूमिका पोलीस बांधव आपल्या दैनंदिन जीवनात बजावत असतात. पण, गेल्या काही वर्षांत राजकारणी लोकांनी आणि विशेषतः जो कोणी ज्या वेळी सत्ताधारी असेल त्यांनी पोलिसांना आपले बटिक बनवले आहे. सोईनुसार त्यांना आपल्या तालावर नाचवले जात आहे. आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. कधी कधी तर पोलीस हा खरोखरच ‘ पोलीस ‘ आहे की राजकारण्यांचा ‘ गुलाम ‘ अशी शंका यावी इतकी वाईट परिस्थिती दिसून येते. काही ठिकाणी तर त्यांना घरगडी केलेले दिसते. ( मोठमोठे पोलीस अधिकारी , त्यांचे कुटुंब तळातल्या कर्मचाऱ्यांना घरगडी समजून त्यांच्याकडून कामे करून घेतात, त्यांना उर्मट वागणूक देतात याची खंत वाटते.) मुळात पोलिसांचे काम काय आहे, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य काय आहेत हे स्वतः पोलीस न ठरवता राजकारणी नेतेमंडळी, त्यांचे सगेसोयरे, त्यांचे चमचे हेच ठरवू लागले आहेत. लोकांच्या रक्षणासाठी पोलीस असताना त्यांच्या नेमणुका मंत्री, संत्री, सर्वपक्षीय पुढारी यांच्या संरक्षणासाठी केल्या जातात. खरं तर संरक्षण हा विषय राहिलेला नाहीच ; खोट्या प्रतिष्ठेसाठी पोलीस संरक्षण लागते. मागेपुढे हत्यारबंद पोलीस कर्मचारी, चार चार सायरन वाजवत जाणाऱ्या गाड्या असल्या की आपण फार मोठे झालो, काहीतरी प्रचंड कर्तृत्व, पराक्रम गाजवला असे त्यांना वाटते. आचार विचार चांगले असतील, नसत्या उठाठेवी, भानगडी नसतील तर कशाला कोण त्यांना मरतोय? पण आपले महत्व वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करायची, वर्तणूक करायची, चमकेशगिरी करायची आणि पोलीस संरक्षण मिळवायचे. ते मिळाले की गुर्मी, दादागिरी आणखीनच वाढते. एकीकडे पोलीस कर्मचारी, अधिकारी कमी आहेत म्हणून ओरडायचे आणि आहेत त्यातले बरेचसे गरज नसलेल्यांच्यासाठी राबवायचे. ज्यांना संरक्षण आवश्यक आहे तिथेही गरजेपेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असतात. त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणले तर जनतेच्या भल्याचे ठरेल.

गेल्या काही वर्षांत आणखीन नवीनच प्रथा निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस दल खरच गरजेचे आहे का असा प्रश्न पडतो. राजकारणी लोक (सत्ताधारी आणि विरोधक) मतांच्या राजकारणासाठी कोणत्याही थराला जातात याचे हे द्योतक आहे. आपल्याकडे रोज कुठेना कुठेतरी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी, मागण्यांसाठी आंदोलने होत असतात. ती शांततापूर्ण मार्गाने होतात तेव्हा ठीक आहे. परंतु अनेकदा त्यात दगडफेक, जाळपोळ, लुटालूट, बलात्कार, खुनी हल्ले अशा विघातक घटना घडतात, घडवल्या जातात. त्यातून त्यांना आपली पोळी भाजून घ्यायची असते. या जाळपोळ किंवा दगडफेकीत अनेकांचे नुकसान होते, कुटुंब, व्यवसाय इतकेच नव्हे तर आयुष्य उध्वस्त होतात. अनेकांच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी होते. अशावेळी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांची येते. हे सर्व करताना ते स्टेप बाय स्टेप कारवाई करत असतात. आवाहन, विनंती, गरज वाटली तर आधी सौम्य लाठीचार्ज, हवेत गोळीबार, अश्रुधुर, पाण्याचा फवारा अशा पद्धतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. आंदोलनकर्त्यांना ठार मारायचे आहे अशा पद्धतीने कारवाई होत नाही. कारण पोलीस झाले तरी तीही माणसंच आहेत आणि आपल्याच आजूबाजूची, गावातली, जिल्ह्यातील असतात. त्यांनाही माणुसकी असतेच. ( एखादा अधिकारी किंवा कर्मचारी चक्रमच असेल तर गरजेपेक्षा जास्त कठोर कारवाई केल्याचे प्रकार घडलेले नाहीत असे नाही पण ते अपवादात्मक) परंतु समजावण्याचा अनेकदा प्रयत्न करून, विनंती करूनही जर आंदोलनकर्ते विघातक कृत्य करीत असतील तर शेवटी पोलिसांचाही नाईलाज आहे. अशावेळी वर्दीला जागून त्यांनी कठोर कारवाई केली तर त्यांचा दोष नाही. ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात. अशावेळी केवळ आंदोलकच जखमी होतात किंवा मरतात असे नाही तर दगडफेक , जाळपोळ यात पोलीसही जखमी होतात, अनेकांच्या जीवावर बेतते.

हे सर्व होत असताना लगेच वेगवेगळ्या जाती धर्माच्या , संघटनांच्या पुढाऱ्यांना कंठ फुटतो. लगेच पोलिसांवर आरोप, कारवाई करा, चौकशी लावा, निलंबित करा, बदली करा अशा मागण्यांना जोर येतो. हे कमी म्हणून की काय यातील गुन्हेगारांवर कारवाई करू नका , त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या असल्या मागण्या करायच्या, त्यासाठी येनकेन प्रकारे दबाव आणायचा. आणि राजकारणी, सत्ताधारी केवळ मतांच्या जोगव्यासाठी असल्या निर्ल्लज मागण्यांना बळी पडतात. त्यांना पाठीचा कणाच राहिलेला नाही. जाळपोळ , दगडफेक, हत्या करणारे कोणी मोठे क्रांतिकारक , स्वातंत्र्यसैनिक आहेत का? पण पोलिसांना दोन्हीकडे तोंड द्यावे लागते. कारवाई केली तरी ओरड आणि नाही केली तरी ओरड. पोलिसांचे अक्षरशः सँडविच झाले आहे. त्यांचा ‘ मृदुंग ‘ ही झाला आहे..दोन्हीकडून थपडा खाताहेत. म्हणूनच आता पोलिसांनीही स्वतःच्या वर्दीशी इमान ठेवत, तिची शान राखण्यासाठी आणि मुळात ‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ‘ हे ब्रीदवाक्य खरे करण्यासाठी निर्धार केला पाहिजे. सरकारचे आदेश, नीतीनियम , शिस्त पाळणे आवश्यक आहेच मात्र ते करताना आपण राजकारण्यांचे बटिक किंवा गुलाम नाही एवढी तरी जाणीव कायम मनात असली पाहिजे. तेवढा आत्मसन्मान प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यात असलाच पाहिजे. सेवा आणि गुलामी यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. याची जास्त जबाबदारी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांवर आहे. ते प्रामाणिक राहिले, चूक ते चूक म्हणण्याचे धाडस त्यांनी दाखवले, ठाम भूमिका घेतली तर आपोआपच कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना बळ मिळेल. तो लाचार होणार नाही. राजकारणी लोक हे सज्जन, नैतिक, प्रामाणिक असण्याचे दिवस कधीच संपलेत. काही अपवाद वगळता बहुतांशी उपटसुंभ सत्ता, संपत्ती आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे स्वार्थ साधण्यासाठी, चमकेशगीरी करण्यासाठी, लोकांना रुबाब दाखवण्यासाठी राजकारणात येताना दिसतात. त्यासाठी पोलिसांचा वापर करतात. त्यांना कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवतात. म्हणून आता पोलिसांनी सावध होण्याची आवश्यकता आहे.

सरकार मग ते कोणाचेही असो जर जाळपोळ, दगडफेक, लुटालूट, हत्या, बलात्कार असे समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना जर पाठीशी घालणार असेल , त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार असेल तर चोऱ्यामाऱ्या करणारे, भामटे , भुरटे यांना तरी कशाला जेलमध्ये पाठवता? त्यांना पण द्या सोडून. आणि मुळात गुन्हेगारांवर कारवाई करायचीच नसेल तर मग पोलीस दलाची गरजच काय…सर्वांना मोकळे रान द्या, त्यांना काय धुडगूस घालायचा तो घालुद्या …त्यांना मोठमोठे पुरस्कार द्या, पेन्शन चालू करा, पुतळे उभे करा, आमदार खासदार मंत्री करा…पोलीस ही वेडगळ आणि पुचाट कल्पना आहे असे जाहीर करून ती इतिहासजमा करा. सर्व पोलिसांना घरी पाठवा.

Kokan Reporter Newsroom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *