गितेंची (अर्धी) शपथ!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
9850863262
चार दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शृंगारतळी येथे भर दुपारी तळपत्या सूर्याच्या साक्षीने जाहीर सभा झाली. त्याआधी दोन तीन दिवस त्यांच्यातल्याच एका सूर्याने वातावरण तापवले होते. सर्व सोबत्यांना एकत्र आणून सतत होत असलेल्या (कथित)अन्यायाबद्दल आग ओकली होती. या आगीची झळ काही अस्तनीतील सापाना बसली होती तशीच त्याची धग ‘मातोश्री’ पर्यंतही गेली होती. या सर्व तापलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तळीत होणाऱ्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. सभेत कोणतेना कोणते नाराजीनाट्य होईल, एकमेकांची तोंडं बघितली जाणार नाहीत, हात झटकले जातील, अन्यायचा पाढा वाचला जाईल, त्यावर टोमणे मारले जातील असं वाटत होतं, पण सभेच्या व्यासपीठावर खेळीमेळीचे वातावरण होते. जिल्हाप्रमुख आणि भास्कर जाधव यांचे अत्यन्त विश्वासू, लाडके सचिन कदम यांनी भास्कर जाधव यांच्यामुळे गीते साहेबांना किती मोठ्या प्रमाणात मतांचा फायदा होईल असे सांगून जाधव यांचे मनापासून कौतुक केले. भास्कर जाधव यांनीही दोन तीन दिवसांपूर्वीचा रडका, त्रासलेला चेहरा बाजूला ठेऊन नेहमीचा आक्रमक चेहरा आणि वक्तृत्व दाखविले. इतकेच नव्हे तर अनंत गीते आणि विनायक राऊत या त्यांच्या दोन आवडत्या नेत्यांना लोकसभेत पाठवू अशी ग्वाही जाधव यांनी खुद्द उद्धवजींना दिली. त्यामुळे उद्धवजींनाही हायसे वाटले. तापलेल्या वातावरणात वाऱ्याची झूळूक अंगावर आल्याचे त्यांना जाणवले. (आता निदान लोकसभा होईपर्यंत तरी काळजी नाही.. विधानसभा येईल तेव्हा बघू असं ते मनातल्या मनात म्हणाले असतील.) सचिन कदमही भास्कर जाधव यांनी दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याने आपल्या डोक्यावरचे (नसलेले) ओझे कमी झाल्याचे पाहून सुखावले. त्याच आनंदात ते दापोलीच्या सभेची तयारी करण्यासाठी कधी पोचले ते त्यांनाही कळले नाही. पाच वर्षांपूर्वी भास्करराव संघटनेत आल्याने सचिन कदम यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याआधी राजकारणात काही दमच वाटत नव्हता. या सर्वांच्यावर धक्का दिला तो खऱ्या अर्थाने राजकारणात मुरलेल्या उद्धवजींनी. त्यांनी भास्कर जाधव यांच्या कर्तृत्वाची, गुहागर मतदारसंघाची त्यांनी केलेल्या जबरदस्त बांधणीची दखल घेऊन त्यांना पूर्व विदर्भाची जबाबदारी दिल्याचे सांगून कौतुक केले आणि आपण अन्याय नाही तर न्याय देतो हे ‘गोड’ भाषेत दाखवून दिले. एकंदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. (खरं काय ते मतमोजणीला कळेल.)
आता मूळ मुद्द्याकडे येतो. लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी नेहमीप्रमाणे जोरदार भाषण करून नेहमीप्रमाणेच उपस्थित कार्यकर्ते आणि मतदारांना हात उंचावून शपथ घ्यायला लावली. ती शपथ अशी होती….आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या गद्दारांच्या शापाच्या, पापाच्या पैशाला हात लावणार नाही. इमानदारीने मतदान करू…. गीते साहेबांनी मतदारांना दिलेली शपथ चांगलीच आहे. मतदारांनी प्रामाणिक मतदान करावे हे योग्यच आहे. ती तर सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक बाब आहे यात दुमत नाही, पण….
पण गीते यांनी दिलेली शपथ ही एकतर्फी आहे, अर्धीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण मतदारांना प्रामाणिकपणे मतदान करायला सांगताना आपण राजकारणी नेमके काय करतो, तो तत्व, विचारांशी आणि मुळात जनतेशी किती प्रामाणिक राहतो हा महत्वाचा मुद्दा आहे. मतदान होईपर्यंत मतदार राजा म्हणून गोड गोड बोलणारे, असतील नसतील ती आश्वासने देणारे, विकासाच्या आणाभाका घेणारे राजकारणी एकदा का निवडून गेले (किंवा अगदी पडले तरी ) की आपला रंग दाखवायला सुरवात करतात. सत्ता संपत्तीसाठी वाट्टेल ते उद्योग करतात. इकडून तिकडे.. तिकडून इकडे उड्या मारतात आणि आपणच कसे बरोबर आहोत, आपल्यावर कसा अन्याय झाला, आता इकडे कसा न्याय मिळणार आहे, त्याचा जनतेला कसा फायदा होणार आहे असे निर्ल्लजपणे सांगत फिरतात. एकाका रात्रीत पक्ष बदलतात, भ्रष्टाचार, बाकीच्या नको नको त्या भानगडी लपवण्यासाठी सरड्यासारखे रंग बदलतात. मतदान होईपर्यंत अगदी उठता बसता चार चार वेळा नमस्कार करणारे नेते नंतर स्वतःला संस्थानिक समजतात. मग त्यांचा तोरा, वागण्याबोलण्यातला ताठरपणा, आलिशान गाड्या, बंगले सोबतीला पाच पंचवीस चमचे, चहापेक्षा किटली गरम असणारे पीए असं एकंदर उलट चित्र दिसते. भ्रष्टाचार, खून, मारामाऱ्या, दादागिरी करणारा आपला असतो तेव्हा तो बाब्या असतो… दुसरीकडे असतो तेव्हा तो कार्ट असतो. हे सोईनुसार बदलणारे नाते आहे. आत्ता जे एकमेकांना कौतुकाची पिसे लावत आहेत तेच आधी एकमेकांची पिसे काढत होते . आज एकमेकांची पिसे काढणारे चार दिवसांनी कधी एकमेकांचे गोडवे गातील याचा नेम नाही. कोण कोणाबरोबर कधी सोईरिक करेल, मोडेल हे खुद्द ब्राह्मदेवही सांगू शकणार नाही. स्पष्ट सांगायचे तर आजच्या (अपवाद सोडता )राजकारणी मंडळींपेक्षा वारांगनाही अधिक निष्ठावंत म्हटल्या पाहिजेत. इतकी वाईट, संतापजनक परिस्थिती राजकारणाची झाली आहे. खोटं बोल पण रेटून बोल
हे ‘ क्वालिफिकेशन ‘ ज्याच्याकडे असेल तो आजच्या राजकारणात यशस्वी होतो. ज्याला विकासाचे (स्वतःच्या सोडून ) व्हिजन आहे, तळमळ आहे असे नेते दुर्मिळ झाले आहेत. बुद्धिमान आणि स्वाभिमानी नेते कमी झाले आहेत. वारा येईल तशी पाठ फिरवणारे जास्त झाले आहेत. उत्तम दर्जाची भाषणे, विचार व्यक्त करणारे, समाजाला दिशा देणारेही कमी आहेत. कोणत्याही प्रश्नावर अभ्यासपूर्ण बोलण्याऐवजी टोलवाटोलवी करणाऱ्याला हुशार राजकारणी समजले जाते. त्याला वजनदार, मलईदार पदे दिली जातात. सत्ता, संपत्ती आणि त्यातून येणारे सर्व प्रकारचे फायदे मिळुनही, वर्षानुवर्षे त्याचा उपभोग घेऊनही यांची कायम ‘ घुसमट ‘ कशी होते हे कळत नाही. एकसारखं मलाच मिळालं पाहिजे ही बकासुरी प्रवृत्ती आजच्या नेत्यांत प्रकर्षाने दिसते. यांचे आत्मे कायमच असंतुष्ट असतात. लोकं बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, गरिबी, अवकाळी, महापूर अशा असंख्य समस्यानी ग्रस्त असताना यांना पडलेली असते मला, मला नाहीतर मुलांना, नातवंडना काहीना काहीतरी मिळालेच पाहिजे याची.
त्यामुळे गीते साहेबांनी आपली अर्धी उरलेली शपथ स्वपक्षातील नेत्यांबरोबरच अन्य राजकारण्यांना घ्यायला सांगावी. आम्ही किमान प्रामाणिक राहू, किमान तत्व, नैतिकता पाळू, खोटी आश्वासने देणार नाही, जनतेच्या मताचा आदर करू…एवढी शपथ घ्या तर मतदारांना दिलेल्या शपथेला अर्थ राहील.
