फसवणाऱ्यांचे आभार! फसणाऱ्यांचे अभिनंदन!!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
गेले पाच सहा दिवस चिपळूणस्थित TWJ या कंपनीच्या कथित घोटाळ्याची चर्चा विविध माध्यमातून चालू आहे. गुंतवणुकीवर अल्पावधीत प्रचंड परतावा देण्याची जाहिरातबाजी करून तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित, विविध खात्यांतील वरिष्ठ अधिकारी यांच्या इमेजचा वापर करून, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा प्रकारच्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व देऊन व त्याआधारे संबंधित ठिकाणी एक प्रकारचा भुलभुलैया निर्माण करून अधिकाधिक गुंतवणूकदार जाळ्यात कसे अडकतील हे पाहिले जाते. लाखभर खर्च केले तर त्यातून किमान दहा कोटी तरी गुंतवणूक झाली पाहिजे अशा पद्धतीने काम केले जाते. अर्थात ज्यांना लोकांना फसवायचे आहे आणि स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे आहे त्यांच्या दृष्टीने ते योग्यच आहे. खरा प्रश्न आहे तो फसणाऱ्यांचा!
गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य कंपन्या आल्या. त्यांनी दुप्पट, तिप्पट, चौपट परतावा आणि तोही अत्यन्त अल्पकाळात देण्याच्या बहाण्याने हजारो गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले आणि पुरेसा पैसे जमा करून पळ काढला. यात अनेकांची आयुष्यभराची पुंजी गेली. मेहनतीने मिळवलेले पैसे बुडाले. अनेकांची स्वप्नं आणि संसार उध्वस्त झाले. या धक्क्यातून जे सावरू शकले नाहीत त्यांना जीवही गमवावा लागला. हे सर्व खरंच दुर्दैवी आहे. पण खरं सांगायचं झालं, स्पष्ट बोलायचं झालं तर एकच सांगता येईल ते म्हणजे अगदी सुरवातीच्या काळात माहिती नसल्याने अनेक लोक अशा आमिषाला बळी पडले त्यामुळे त्यांच्याप्रती काहीशी सहानुभूती वाटायची. परंतु त्यानंतर गेली अनेक वर्षे वर्तमानपत्र असो वा टीव्ही चॅनेल्स यामधून सातत्याने अशा प्रकारच्या फसवणुकीच्या बातम्या येत आहेत, अनेकांनी प्रत्यक्ष फसवणुकीचा अनुभव घेतला आहे. शासनही अशा बोगस कंपन्यांपासून सावध राहण्यासाठी जनहितार्थ जाहिराती प्रसिद्ध करत असते. मात्र असे असूनही जे लोभी, पैशासाठी हावरट लोक अशा बोगस कंपन्यांना बळी पडतात आणि नुकसान करून घेतात त्यांच्याबद्दल यत्किंचितही वाईट वाटेनासे झाले आहे. ‘आ बैल मुझे मार’ अशी आपली परिस्थिती आहे. त्यामुळे फसवणाऱ्यांचे आभारच मानायला हवेत आणि जे समजून उमजून फसतात त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे.
फसवणाऱयांनी फसवत रहावे, फसणाऱयांनी फसत रहावे , बातम्या देणाऱयांनी बातम्या देत रहावे. थोडक्यात ही परंपरा अखंड चालत राहो.
फक्त या सर्व प्रकारात एका गोष्टीची चीड येते ती म्हणजे सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची. चांगले पगार आहेत, पेन्शनसह अनेक लाभ आहेत, निवृत्तीनंतरही आर्थिक परिस्थिती चांगली असताना पैशाचा इतका लोभ कशासाठी? शिक्षक, पोलीस कर्मचारी यांचे प्रमाण बघितले तर डोळे पांढरे होतील. ज्यांनी समाजात जागृती करायची त्यांनीच पैशाचा हावरटपणा करावा यासारखे दुर्दैव नाही. दोन नंबरवाले, गरजेपेक्षा जास्त पैसा असणाऱ्याना बुडण्याचा काही फरक पडत नाही. परंतु ज्यांच्याकडे गर्जेपुरताच पैसा आहे, कष्टाने मिळवलेला आहे त्यांनी आतातरी शहाणे व्हावे. अन्यथा पैसे बुडाले म्हणून रडण्यात काही अर्थ नाही.
