… तर अजितदादांचे कौतुकच!
मकरंद भागवत,पत्रकार, चिपळूण.
मो. ९८५०८६३२६२
अजितदादा त्यांच्या रोखठोक वागण्या बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. कोणतीही भूमिका मांडताना ते ‘हा आपला – तो दुसऱ्याचा’ असा फरक करत नाहीत. विरोधकांवर जसा हल्ला चढवतात त्याचवेळी स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी नेत्यांनाही झापायला मागे पुढे पाहत नाहीत. वेळ पाळणारे , कामाचा आणि निर्णयांचा झपाटा असणारे, पूर्ण करता येईल तेवढंच आश्वासन देणारे आणि प्रशासनावर चांगलाच वचक असलेल्या दादांनी आपल्या या वैशिष्ट्यांची झलक नुकतीच हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा दाखवून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत त्यांनी सरकारची बाजू समर्थपणे सांभाळली. त्यांनी घेतलेले निर्णय, भूमिका किंवा वक्तव्य याबाबत चूक बरोबर अशी मतांतरे असू शकतात. पण वास्तव बोलण्याबाबत ते मागेपुढे बघत नाहीत हे मात्र नक्की. एसटीच्या संपावरून त्यांनी विधानसभेत विलीनीकरणाबाबत ठाम भूमिका मांडली. त्याचबरोबर म्याव म्याव, नक्कल आदी विषयांवरून त्यांनी विरोधी आणि सरकारी पक्षाच्या आमदारांना चांगलेच खडसावले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. आपण कुत्री, मांजर, कोंबड्या अशा प्राणी पक्षी यांचे प्रतिनिधित्व करत नाही अशा भाषेत त्यांनी संबंधितांचे कान टोचले. कार्यकर्ते असोत वा नेते असोत वा अगदी मतदार असोत अनावश्यक लाड करायचे नाहीत, मनात असेल तेच स्पष्ट बोलायचे ही त्यांची पद्धत त्यांच्या वलयात भरच घालणारी आहे याबाबत दुमत नाही.
खरं तर आज दादांवर लिहिण्याची इच्छा झाली ती त्यांची टीव्ही वरील बाईट ऐकून…दादा आज बारामतीत आहेत. सोमवारी साताऱ्यात आहेत. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वसामान्य जनतेला कोरोना संदर्भातील नियम, शिस्त पाळायला सांगताना ते सर्व आधी राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पाळले पाहिजेत असे ठणकावून सांगितले. त्याचबरोबर नियमानुसार पन्नास माणसे असतील आणि नियम, शिस्त पाळली जाणार असेल तरच आपण संबंधित कार्यक्रमाला हजेरी लावू असेही त्यांनी बजावले आहे. गेल्या आठ दहा दिवसांत सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री आणि नेत्यांनी ज्या रीतीने नियम, शिस्त पायदळी तुडवली आहे त्याची चीड सर्वसामान्य माणसामध्ये आहेच. अशा विरोधाभासी पार्श्वभूमीवर अजित दादांनी जर नीतिनियम आणि शिस्त पाळली जात असेल अशाच कार्यक्रमांना हजेरी लावली तर त्याचा मोठा परिणाम होईल असे वाटते. फक्त त्यांनी आपल्या स्वभावाला सुसंगत कृती करावी, केवळ बोलून किंवा इशारा देऊन थांबू नये. आज त्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल कौतुक आहे , पण त्याहीपेक्षा कैक पटीने जास्त कौतुक त्यांनी कृती केली तर असेल.
दादा नेमकं काय करतात ते उद्या कळेलच. तोपर्यंत दादांसाठी ‘पॉझिटिव्ह’ राहू.
