‘ रस्तामुक्त ‘ रत्नागिरी!
ऐसपैस आणि गुळगुळीत रस्ते असावेत अशी जी अत्यन्त अवाजवी आणि मूर्खपणाची मागणी केली जाते तिला कायमस्वरूपी हद्दपार करण्याचे क्रांतिकारी कार्य रत्नागिरीचे जे कोणी चालक – मालक – पालक आणि त्यांचे सगेसोबती आहेत त्यांनी केले आहे त्याबद्दल त्यांचे गुणगान करावे, कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एखादे गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सरकार करते तसं रत्नागिरी शहर आणि परिसर ‘रस्तेमुक्त’ करून ‘खड्डेयुक्त’ करण्याचा संकल्प यशस्वी करणाऱ्या सर्व पुढऱ्यांचा, त्यांच्या बगलबच्च्याचा आणि त्यांच्या ताटाखालचं मांजर असलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करावा तेवढा थोडा आहे. चांगले रस्ते ही आदिमानवाच्या काळातील कल्पना आहे यावर ते ठाम आहेत. आता आपण 21 व्या शतकात आहोत, स्मार्टसिटीच्या काळात आहोत… मग त्याला साजेसे ‘खड्डेयुक्त’ रस्ते नकोत का? याच खड्ड्यातून उद्या पैशाची लहानमोठी झाडं उगवणार आहेत… त्यातील काही फोफावणार आहेत… रत्नागिरीकरांना आणि पर्यटकांनाही इतकी सवय झालीय की या सलग आणि चहोबाजूने पसरलेल्या या खड्ड्यात चुकून ‘एखाद इंच’ रस्ता लागला तर गोंधळ उडतो… तो चक्राऊन जातो… आणि अपघात होतात…
काही ठिकाणी रस्ते आणि खड्डे अशा पातळीवर जाणीवपूर्वक करण्यात आलेत की अवकाशातून थेट पाताळात जाण्याचा ‘ थ्रील ‘ अनुभवता आला पाहिजे… खरं तर स्मार्टसिटीची गावंढळ कल्पना बाजूला सारून दूरदृष्टी लाभलेल्यांनी अख्खे रत्नागिरी शहरच ‘ ऍडव्हेन्चर पार्क ‘ केले आहे. अशीच दूरदृष्टी कोयना – पाटण रस्त्याच्या बाबतीत आणि खेड शहरात दाखविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पुराण काळात बाण मारून तळी निर्माण केल्याचे दाखले मिळतात… आणि किती सुंदर योगायोग आहे बघा आजच्या नवयुगात वरील सर्व खड्ड्याच्या निर्मिती ठिकाणी ‘बाण’ च आहे!
मकरंद भागवत.
