आठवणीतले जोशी सर…

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

9850863262

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी अर्थात जोशी सरांचे निधन झाल्याची बातमी पहाटे पहाटेच कानावर पडली. मुख्यमंत्री असताना ते एकदा चिपळूणला आले होते. त्यांची एक छोटेखानी सभा ट्रेड सेंटरच्या मधल्या जागेत झाली होती. त्यानंतर खेर्डी एमआयडीसीत पत्रकार परिषदही झाली होती. त्यावेळी पालकमंत्री या नात्याने रवींद्र माने, स्थानिक आमदार भास्करराव जाधव आणि जिल्ह्यातील सेना – भाजपचे आमदार त्यांच्याबरोबर होतेच. या दौऱ्यात पत्रकार म्हणून प्रथमच मुख्यमंत्री पदावरील एका महत्वाच्या व्यक्तीला जवळून पाहण्याचा, ऐकण्याचा, पत्रकार परिषद कव्हर करण्याचा अनुभव घेत होतो. अतिशय प्रसन्न, नीटनेटकं पण सहजता असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व कोणालाही आवडेल असंच होतं. वक्ताशीरपणा, राजकीय चातुर्य, हजरजबाबीपणा, उत्तम वक्तृत्व या गोष्टी सहज नजरेत आणि मनात भरण्यासारख्या होत्या. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती म्हटल्यावर जवळ जाताना, बोलताना काहीसे दडपण तर येणारच त्यात आमचा पत्रकारितेत अगदी सुरुवातीचा काळ होता. मात्र प्रत्यक्ष भेटीनंतर जोशी सर म्हणजे अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याची जाणीव झाली आणि त्याचा आनंदही वाटला.

या दौऱ्यानंतर एक दोन महिन्यातच केव्हातरी सर एकदा रायगड जिल्ह्यातील त्यांच्या नांदवी या मूळ गावी बंगल्यावर मुक्कामाला होते. तेव्हा त्यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांना स्नेहभोजन आणि गप्पागोष्टी यासाठी निमंत्रित केले होते. त्यादिवशी एवढी सुरक्षा, अधिकारी, पीए यांची धावपळ असली तरी सर आणि आमच्यात अगदी मोकळेपणाने गप्पागोष्टी सुरु होत्या. सरांची किस्से सांगण्याची पद्धत, त्यातील मिश्किलपणा जवळून अनुभवता आला.

याच दरम्यान आणखी काहीसा आश्चर्यकारक पण आनंददायी अनुभव आला. सरांच्या बंगल्याभोवती असलेल्या बागेत पत्रकारांसाठी भोजनाची (बुफे )व्यवस्था केली होती. आम्ही सर्वजण डिश घेऊन रांगेत उभे होतो तेवढ्यात अचानक जोशी सर आमच्या रांगेत येऊन उभे राहिले आणि म्हणाले आज मी तुमच्याबरोबरच जेवणार आहे. अर्थात सर असे अचानक आल्याने त्यांचे सुरक्षा रक्षक, अधिकारी, पीए यांची थोडीफार धावपळ उडाली, मात्र आमच्यासाठी तो सुखद क्षण होता. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीत असलेला विनम्र भाव, सहजगत्या सर्वांशी मिळुनमिसळून वागण्याचा स्वभाव नक्कीच भावला. त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नाही. अधेमधे टीव्हीवर काही कारणांनी त्यांचे दर्शन होत होते. त्यांचे विचार, प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत होत्या. वृद्धत्व आणि तब्येतीच्या कारणाने गेल्या काही काळापासून तेही फार कमीच झाले होते. आज पहाटे पहाटेच सरांच्या जाण्याची दुःखद बातमी पाहिली आणि मन 26 – 27 वर्षे मागे गेले. एकदोनच का असेना पण त्या आठवणी जाग्या झाल्या. डोळ्याच्या कडा ओलावल्या. आता सर आणि बाळासाहेब वर स्वर्गात पुन्हा एकदा पन्नास साठ वर्षांपासूनच्या आठवणींना उजाळा देतील. दोघेही मिश्किल, हजरजबाबी असल्याने गप्पांचा फड नक्की रंगेल यात वाद नाही. जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Kokan Reporter Newsroom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *