रामदासभाईंचे भाजप प्रेम!

 

 

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

9850863262

 

रामदासभाई कदम यांचे काम आणि बोलणे एकदम रोखठोक. स्वभाव पण मूडी. कधी कोणाशी प्रेमाने बोलतील, वागतील आणि कधी कोणावर तोंडाचा दांडपट्टा फिरेल याचा नेम नाही. त्यामुळे लांबचे सोडाच अगदी जवळचेही बिचकूनच राहतात. वाघाचा मूड बघून, अंदाज घेऊन गुहेत जावे की बाहेरच्या बाहेर कलटी मारावी याचा विचार जवळपास प्रत्येकजण करतो.(यातून पत्रकारही सुटलेले नाहीत.) अर्थात वयोमानानुसार वाघ काही प्रमाणात मवाळ झालाय. आठ दिवसांपूर्वी लोटे येथील जाहीर सभेत रामदासभाईंनी आपण आता साठ – सत्तर टक्के शांत झालोय असं सांगितलं तेव्हा उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. त्याअर्थी बरेचजण ‘अनुभव’ घेतलेले असावेत.

याच सभेत रामदासभाईंनी थेट भाजपवरच इशारा वजा टिकेचे बाण सोडले. कमळाला जखमी केले. (याचसाठी शिंदेना धनुष्यबाण मिळवून दिला का असा पश्चाताप भाजपवाल्याना झाला असल्यास नवल वाटायला नको) अर्थात शिवसेना नेते म्हणून आणि भाजपच्या राजकारणाची रीत बघता रामदासभाई यांनी आपल्या पक्षासाठी जोरकसपणे बोलणे, आक्रमक धोरण स्वीकारणे गैर वाटत नाही. कारण तसे केले नाहीतर भाजप आपल्याला आणि पक्षाला गृहीत धरेल, आपल्या तालावर नाचवेल अशी साधार भीती म्हणा किंवा समजूत भाईंची झाली असणार. शिंदे गटाकडेही सध्यातरी थेट भाजपला अंगावर घेणारा, भिडणारा आणि रोखठोक बोलणारा दुसरा ज्येष्ठ नेता नाही. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनाही आतून आनंदच वाटत असेल. आपल्याला टिकायचे असेल तर भाजपवर काही प्रमाणात दबावतंत्र अवलंबवावे लागेल याची त्यांना जाणीव आहे. ही जबाबदारी रामदासभाई आवडीने पार पाडत आहेत.

आवडीने म्हणण्याचे कारण गेल्या तीस वर्षांत रामदासभाई यांचे ‘ भाजप प्रेम ‘ सर्वश्रुत आहे. असं ‘बाणा’ च्या टोकावरचं आगळवेगळं प्रेम भाजपवाल्यानी खेडमध्येच अनुभवले आहे. रामदासभाई यांनी 1990 पासून खेडमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यास सुरवात केली. तेव्हा महाराष्ट्रात सेना भाजप युती होती, पण रामदासभाई यांनी खेड विधानसभा मतदारसंघात भाजपला जमेसच धरले नाही ते अगदी आजपर्यंत. एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या भागात रामदासभाई यांनी अखंड मेहनत, संपर्क आणि आक्रमक धोरण स्वीकारत काँग्रेसला त्यांच्याच भाषेत सांगायचे तर अक्षरशः गाडले. युती असली तरी मुळात या भागात भाजप हा असून नसल्यासारखा होता आणि जो काही होता त्याला भाईंनी जमेस धरले नाही. शिवसेना एके शिवसेना हाच त्यांचा बाणा राहिला. ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद गट सर्वत्र शंभर टक्के शिवसेना पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि त्यांनी ते करूनही दाखवले. खेड विधानसभेवर भगवा फडकतच राहिला.

2009 मध्ये खेड विधानसभा मतदारसंघ गुहागर आणि दापोलीत विभागला गेल्यावर आणि त्यातही रामदासभाईंचा पराभव झाल्यावर येथील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. भाईंनीही मधल्या काळात तसा फार संपर्क ठेवला नाही. त्यांची पकड ढिली झाली मात्र सुटली नाही हेही खरे आहे. आता मात्र गेल्या एक दीड वर्षांपासून रामदासभाई खेड, गुहागर भागात संपर्क दौरे करू लागले आहेत. येथील विकासाची जबाबदारी ते स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंपासून ते भास्कर जाधव, अनंत गीते, संजय कदम यांच्यावर सडकून टीका करत आहेत. मागील पराभवाचा वाचपा काढण्यासाठी हा वाघ 72 व्या वर्षी 27 च्या तडफेने, त्वेषाने, जिद्दीने मैदानात उतरला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे. एकीकडे पराभवाचा वचपा काढायचा आहे तर दुसरीकडे मुलग्याला दुसऱ्यांदा आमदार करायचे आहे. त्यामुळे ते विरोधकांवर तुटून पडत आहेत, पण त्याचवेळी त्यांच्या पंजाचे तडाखे भाजपलाही बसत आहेत. भाजपवर जरब ठेवायची भाईंची जुनीच आवड आहे. फक्त त्यामुळे कमळच्या पाकळ्या गळून पडणार नाहीत आणि बाण इकडे तिकडे मोडून पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

भाईंच्या भूमिकेने सध्या कोकणातील आणि राज्याच्या राजकारणात रंगत आणली आहे एवढे मात्र खरे. विरोधकांच्या मनातही ‘ लड्डू ‘ फुटत आहेत. भाईंच्या भूमिकेमुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Kokan Reporter Newsroom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *