‘कोकण रत्न’पुरस्काराने प्रशांत यादव सन्मानित
मुंबई :* वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांना मुंबईतील कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या ` कोकण रत्न` पुरस्काराने शुक्रवारी (ता. 31) पद्मश्री मुरलिकांत पटेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शुक्रवारी दुपारी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते अविनाश नारकर यांनाही मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विंग कमांडकर वैष्णवी टोकेकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती सुर्वे यांचा युथ आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पद्मश्री मुरलिकांत पेटकर, अनंत फाऊंडेशनच्या श्रीमती अपूर्व वैद्य, लेखक व रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर, महेश निंबाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दिनकर तावडे, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, संदीप परब, रमेश राणे, साहिल दळवी, शंतनू रांगणेकर, शरदचंद्र आढाव, सार्थक सावंत, प्रशांतकुमार सुवर्णा, आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने पद्मश्री मुरलिकांत पेटकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यंदा संस्थेच्या 14व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आळे होते. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणात दुग्धोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच सहकार, महिला सक्षमीकरण, तरुण-तरुणींसाठी रोजगार, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याकरिता विविध उपक्रम राबविल्याबद्दल प्रशांत यादव यांचा गौरव करण्यात आला. श्री. यादव यांना मिळालेल्या कोकण रत्न पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
या सोहळ्यात संस्थेतर्फे युथ आयकॉन पुरस्काराने विंग कमांडकर वैष्णवी टोकेकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती सुर्वे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच झिरो टू हिरो पुरस्काराने अनुराधा पेढे, श्वेतांबरी शेट्ये, अनिता अळवे, गीता बेलपत्रे, रेणुका जाधव यांना, तर रिल टू रिअल पुरस्काराने मंगेश काकड, संजय अप्पन, आर. पी. जाळगावकर, विरु वज्रगड, अधिराज घणघाव आणि युवराज घणगाव यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

