पावसानंतर मुंबई – गोवा हायवे पूर्ण करू

पावसानंतर मुंबई – गोवा हायवे पूर्ण करू

*पाऊस जाऊ दे, मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल*

 

*ना. नितीन गडकरींशी मित्रत्वाचे संबंध*

 

*मुंबई -गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी करून घेऊ!*

 

*खा. नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत ग्वाही*

 

चिपळूण (प्रतिनिधी):– सध्या पाऊस खूप आहे. पाऊस जाऊ दे. आम्हाला दोन-तीन महिने मिळू दे. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी माझे चांगले मित्र आहेत. मित्रत्वाचा उपयोग मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण पूर्णत्वासाठी करून घेऊ, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये आयोजित जनता दरबारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

खा. राणे जनता दरबारात निमित्त चिपळूणमध्ये आले होते. यावेळी जनता दरबार संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी आदी उपस्थित होते.

 

खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या दोघांवर टीकेची झोड उठवली. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे ला चांगलं काही बोलता येतं का? शुद्ध चांगले विचार देता येतात का? असा सवाल उपस्थित करीत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देतांना ते पुढे म्हणाले की, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ३७० कलम बद्दल बोलायचे. ते कलम गृहमंत्री अमित शहा यांनी रद्द केले, अशा नेतृत्वावर तोंडात काही येतं ते बोलतो, अशा शब्दात ठाकरेंचा समाचार घेतला. तुम्ही त्याचे नाव घेऊ नका. त्याला काही चांगलं बोलता येत नाही. उद्धव ठाकरे नाव न घेण्यासारखा माणूस आहे. संजय राऊत शिवसेनेसाठी कुबडी बनला आहे. थोडे दिवस जाऊ दे. त्याचीच कुबडी बाजूला करून देतील. तसेच कोण आदित्य ठाकरे, त्याचं विधायक सामाजिक कार्य काय आहेत, अशा शब्दांत राऊत व आदित्य ठाकरे यांच्यावर देखील पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना टीका केली.

 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा असून शेतकऱ्यांना मदत करेल. कोकणातील पिकांच्या नुकसानी संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. याबाबत लवकरच शासन मदत जाहीर करेल, अशी ग्वाही नारायण राणे यांनी यावेळी दिली. चिपळूण शहरातील लाल-निळ्या पुर रेषा संदर्भात आपला पाठपुरावा सुरू असून चिपळूणवासीयांना अपेक्षित असलेला लवकरच निर्णय येईल, असे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

Kokan Reporter Newsroom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *