नेत्यांची गटारी!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. ९८५०८६३२६२
गेल्या काही काळात सर्वच पक्षातील काही तथाकथित नेत्यांनी वाचाळपणाचा कळस केला आहे. अत्यन्त हीन दर्जाची, अश्लाघ्य भाषा या नेत्यांची आहे. त्यामुळे यांचे तोंड आहे की गटार असा प्रश्न पडतो. दारुड्यांची गटारी एकवेळ परवडली, पण सत्ता, संपत्ती, अहंकार, दादागिरी आणि प्रसिद्धीच्या नशेत या नेत्यांची जी ‘गटारी’ चालू आहे ती अक्षम्य आणि सुसंस्कृत समाजासाठी घातक आहे. यांच्या तोंडातून बाहेर पडणारे गलिच्छ विचार, भाषा , टीका टिप्पणी पाहून गटारानाही लाज वाटत असेल. कदाचित यांच्या तोंडापेक्षा आपण अधिक स्वच्छ असल्याचा त्यांना अभिमानही वाटत असेल. ‘गंदी नाले के किडे’ कोण असतील तर हे ताळतंत्र सोडलेले, असंस्कृत नेते आहेत. देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दररोज कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाचा नेता काही तरी बरळतो आणि नवनवीन वादाला तोंड फोडतो. आणि यात सर्वांत भयंकर गोष्ट म्हणजे अशा नेत्यांचे समर्थन करणारे, त्यासाठी टाळ्या पिटणारे चमचे कमी नाहीत. जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेऊन एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या करण्यात सर्व वेळ, पैसे खर्च करणारे, त्यासाठी दौरे, यात्रा, मेळावे असले उद्योग करणारे नेते किती दूरदृष्टीचे असतील, त्यांचा वैचारिक पल्ला किती असेल याचा अंदाज येतो. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी, विकासाच्या मुद्द्यांशी देणेघेणे नाहीये तर येनकेनप्रकारेण आपला स्वार्थ कसा साधला जाईल आणि आपले बस्तान कायम कसे टिकेल यासाठी त्यांची धडपड आहे. त्यांना पक्ष्यांच्या भरारीत रस नसून खेकड्यांसारखे एकमेकांचे पाय खेचण्यात रस आहे.
गेल्या काही दिवसांत कोकणासारख्या सुसंस्कृत भागात, ज्याला तब्बल आठ ‘भारतरत्न’ चा गौरवशाली इतिहास आहे, ज्या भूमीने बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सी. डी. देशमुख, तात्यासाहेब नातू अशांसारखे सुसंस्कृत, उच्च आचार विचार असणारे, अत्यंत अभ्यासू लोकप्रतिनिधी पाहिले त्याच कोकणात भाषणपटू म्हणून मिरवणारे काय लायकीची भाषणे ठोकत आहेत, काय पद्धतीचे विचार लोकांना, कार्यकर्त्यांना देत आहेत ते पाहून मान शरमेने खाली जाते. (अर्थात ज्यांना संस्कार आहेत त्यांची) या नेत्यांना शरम वाटण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते महान ज्ञानी , विचारवंत आहेत! आपण बोलतो ते ब्रह्मवाक्य अशा ऐटीत ते बोलत असतात. काहीजण स्वतःला सरस्वती मातेचे अर्थात विद्येच्या देवतेचे उपासक मानतात, पण कधी कधी यांची भाषणं ऐकली की यांच्या जिभेवर सरस्वती नाचते की एखादी हडळ असा प्रश्न पडतो. अंगविक्षेप, नक्कला, हातवारे आणि खोटं बोल पण रेटून बोल ही आताशा राजकीय नेत्यांची खासियत झाली आहे. किंबहुना अशाच लोकांना राजकीय पक्षात मानाचे पान देण्याची चढाओढ सुरू आहे.
या वाचाळवीरांना ना जागेचे, ना वेळेचे, ना परिस्थितीचे भान असते. केवळ राजकीयच व्यासपीठ नव्हे तर चक्क देवदेवतांच्या समोर भान सोडून शिवीगाळ करणारे नेते पाहण्याची वेळ लोकांवर आली आहे. परंतु आपल्या वागण्याचा, बोलण्याचा पश्चात्ताप वाटण्याऐवजी त्याचे समर्थन करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. सध्या अतिशय ‘अलंकारिक’ भाषेत एकमेकांवर टीका केली जात आहे. प्रत्येक जण आपल्याला आयाबहिणीबद्दल मोठा आदर असल्याचे सांगतो आणि वेळ आली की विधिनिषेध सोडून त्यांचीच अब्रू वेशीवर टांगतो आणि आम्ही निलाजरे चमचे त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देतो. त्यामुळे नेत्यांनी गटारी साजरी केली म्हणून केवळ त्यांना दोष देऊन चालणार नाही तर अशांना नेते म्हणून स्वतःच्या डोक्यावर घेऊन मिरवणारे आपणही तितकेच दोषी आहोत. अशा नेत्यांपासून ‘ प्रेरणा’ घेऊन आता अनेक लहानमोठे पदाधिकारी, कार्यकर्ते या मार्गावरून जाताना दिसतात. पण हे फार घातक आहे हे लक्षात घेऊन सर्वच पक्ष नेतृत्वानी अशा नेत्यांना वेळीच आवर घालावा, नसेल सुधारत तर घरी बसवावे. या देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी किमान एवढे तरी करावे. बाकी विकास, सामाजिक भान , नैतिकता याबाबत काहीही अपेक्षा नाही.
