रडत’राऊत आणि पॉवर’फुल संयम!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
9850863262
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अखेर पार पडल्या, मात्र निकालावरून सुरु झालेले कवित्व अजून काही दिवस तरी चालू राहील. आकडेवारी काहीशी अनपेक्षित असली तरी सत्ता महायुतीची येईल हे नक्की होते. महायुती 160/170 च्या आसपास असेल असं वाटत होतं, मात्र मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत ‘न भूतो न भविष्यती’ असं प्रचंड बहुमत दिले. दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे आणि आघाडीच्या गोटात सुतकी वातावरण असणार हे ओघाने आलेच. महायुतीवाले सरकार बनवण्याच्या हालचालीत व्यस्त आहेत, त्यांचे आमदार मंत्रिपदाची स्वप्नं रंगवत आहेत तर दुसरीकडे आघाडीत सन्नाटा पसरला आहे.
याच सन्नाट्यात फक्त रडारड ऐकू येतेय ती उद्धव ठाकरे शिवसेनेत.. त्यातही मोठा सूर लावून रडत आहेत ते संजय राऊत! त्याला साथ द्यायला ताई, शेठ असे आहेतच. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि अगदी झोपेतही इव्हीएम च्या नावाने गळे काढले जात आहेत. स्वतःच्या बाजूने निकाल लागले की इव्हीएम चा काही प्रॉब्लेम नसतो.. विरोधात कल गेला की लगेच इव्हीएम ची गडबड असते असली निर्लज्जपणाची दुटप्पी भूमिका ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कायम घेत आली आहे. स्वतःच्या चुका, स्वतःचे अपयश लपवण्यासाठी इव्हीएम चा वापर करायचा अशी दळभद्री भूमिका यांची आहे. आणि मुळात हे करतानाच हा लोकांचा कल असू शकत नाही असं म्हणून मतदारांचा बिनदिक्कत आरोप करताना आपण कोट्यवधी मतदारांचा अपमान करतोय एवढेही भान या मंडळींना राहिलेले नाही. तुम्हाला काय दिसलं, काय वाटलं यावरच मतदार मतदान करेल असं कसं म्हणता येईल? शेवटी मतदार आपल्या मनाचा राजा आहे.. त्याचं स्वतःच मत तोच ठरवणार! कधी कोणाच्या विरोधात, कधी कोणाच्या बाजूने हवा वाटते पण निकाल त्याच्या उलटही लागतात. सगळंच मतदान हवा पाहून होत नाही. एवढं तरी भान संजय राऊत आणि त्यांच्या ‘रडक्या’ पाठीराख्यांनी ठेवायला हवे. रोज सकाळी टीव्ही वर येऊन वाट्टेल ते बोलायचे, कधी कधी तर अक्षरशः बरळायचे यामुळे राऊत जरी सतत प्रकाशझोतात राहत असले तरी शिवसेनेच्या गडावर मात्र अंधार पसरत गेला.. गडाचे बुरुज एकेक करत ढासळत गेले आणि आजही जात आहेत. सेनापती उद्धवजीनी असा किल्लेदार नेमला आहे की त्याने गड उध्वस्त करून तिथे ओसाड माळ निर्माण करण्याचा विडाच उचलला आहे. काँग्रेसबरोबर जायची वेळ आली तर आपण शिवसेनेचे दुकान बंद करू असं शिवसेनाप्रमुखांनी ठामपणे सांगितलं होतं. संजय राऊत यांनी त्या दुकानाची आधी टपरी केली.. आता रस्त्यावर ठेला लावलाय… आणि ते असेच रडत राहिले, किरकिर करत राहिले, बरळत राहिले तर पुढच्या टप्प्यात शिवसेनेची हातगाडी करून गल्लीबोळ फिरत बसावे लागेल… आता उद्धवजींना निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राऊतना आणखी मोकाट सोडायचे की वेसण घालून गप्प बसवायचे… वेळेत निर्णय नाही घेतला तर संजय राऊत उरल्यासुरल्या शिवसेनेलाही भिकेला लावल्याशिवाय राहणार नाहीत.
आघाडीतल्या शिवसेना प्रवक्त्यांच्या उथळ प्रतिक्रिया, लहान पोरांसारख्या रडक्या सबबी ऐकल्यानंतर त्यांच्यातील अपरिपक्वता ठळकपणे दिसून येते. आत्मचिंतन न करता , स्वतःच्या चुका न सुधारता केवळ वाट्टेल तसे रेटून बोलायचे, अपयशचे खापर दुसऱ्या कशावर तरी फोडायचे यामुळे ठाकरे सेनेचा दिवसेंदिवस ऱ्हास सुरु आहे. त्याला सर्वात जास्त जबाबदार संजय राऊत आणि त्यांना गरजेपेक्षा जास्त मोकळीक देणारे सेना नेतृत्व जबाबदार आहेत. ‘रडत’ राऊत यांचा भोंगा काही काळ बंद करून संघटनेत काय बदल होतात हे पाहण्यास तरी काय हरकत आहे. नाहीतरी बरीचशी वाट लागलीच आहे. त्यात आणखी भर पडेल नाहीतर कदाचित संघटना पुन्हा उभारीही घेऊ शकेल… उद्धवजींनी असा सकारात्मक आणि ‘धाडसी’ विचार करावा.
*एकीकडे अपरिपक्वता दाखविणारे शिवसेना नेते आणि दुसरीकडे राजकारणातला संयम, प्रगल्भता, परिपक्वपणा काय असू शकतो, किती उच्च असू शकतो याचे सक्षात दर्शन शरद पवार यांनी घडविले.* निकाल लागल्यावर खरं तर जास्त उत्सुकता होती ती शरद पवार यांच्या प्रतिक्रियेची. पण त्या दिवशी त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ते काल बोलले. एकीकडे शिवसेना प्रवक्ते इतके उतावीळ होते तर दुसरीकडे शरद पवार एकदम शांत आणि धिरोदात्त.. मोठ्या पराभवातही ते शांत, संयम बाळगून होते. यश – अपयश सारख्या पातळीवर कसं मोजायचं हे त्यांच्याकडून जरूर शिकावं. राजकारण काही असेल.. कोणाला आवडेल, न आवडेल पण नेतृत्वाच्या अंगी संयम, प्रगल्भता असणं किती गरजेचं आहे हे शरद पवार यांची प्रतिक्रिया ऐकल्यावर कळते.
आघाडीत एकत्र असतानाही त्यांनी संजय राऊत यांच्या एकदम उलट प्रतिक्रिया दिली. एकतर त्यांनी कोणतीही खळखळ न करता जनमताचा कौल मान्य केला. दुसरी गोष्ट त्यांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना इव्हीएम वर खापर फोडण्यास नकार दिला. तिसरी गोष्ट त्यांनी आत्मचिंतन करून, चुकांचा अभ्यास करून पुन्हा तयारीने मैदानात उतरण्याची जिद्द व्यक्त केली. चौथी गोष्ट त्यांनी लाडकी बहीण योजना आणि हिंदू मते एकवटल्याची व त्यामुळे महायुतीला मोठा फायदा झाल्याचे निरीक्षण नोंदवले. पाचवी गोष्ट म्हणजे कितीही राजकीय भांडण असलं तरी त्यांनी अजितदादा यांच्या विजयाचे, कामाचे कौतुक केले. एवढंच नाही तर युगेंद्र आणि अजितदादा यांची तुलना होऊ शकत नाही असं स्पष्ट सांगतानाच पक्ष म्हणून बारामतीत कोणाला तरी दादांच्या विरोधात उतरवणे आवश्यक होते हेही सांगितले. या सर्व प्रतिक्रियेवरून राजकारणातील संयम आणि प्रगल्भता अधोरेखित होते.
ता. क. – काँग्रेसबद्दल बोलायलाच नको. आघाडी असूनही ते स्वतःच्याच विश्वात रममाण होते, आपण मोठे भाऊ आहोत, सर्वात जुना आणि मोठा पक्ष आहोत, काही नाही केलं तरी लोकांनाच बदल हवाय ते आपल्याला सहज निवडून देतील अशा मानसिकतेत ते होते. शरद पवार गट आणि ठाकरे गट बराचसा एकजुटीने कार्यरत वाटला, पण काँग्रेसवाले वेगळी चूल मांडून बसल्यासारखे दिसले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फाजील आत्मविश्वास!
