न्यूज चॅनल्सना चढलाय युद्धज्वर!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
पेहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला आठ दिवस होऊन गेल्यानंतरही भारत सरकारने कोणतीही थेट लष्करी कारवाई केली नसल्याने 24 तास बातम्या देणाऱ्या सर्वभाषीय चॅनेल्सची आता गोची होऊ लागली आहे. अतिरेकी हल्ला झाला त्या क्षणापासून प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानबद्दल तीव्र असंतोष, चीड, संताप सर्वकाही आहे. मागच्या दोन अनुभवामुळे मोदी सरकार यावेळी पाकिस्तानला सात जन्म लक्षात राहील अशी अद्दल घडवेल आणि तीही लष्कराला थेट पाकिस्तानमध्ये घुसवून अशी कोट्यवधी नागरिकांची अपेक्षा आहे. मानसिकता आहे. अतिरेकी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना आता जबरदस्त शिक्षा देण्याची वेळ आली आहे याबाबत वाद असू शकत नाहीच, परंतु ती लगेचच्या लगेच, 24 तासात लष्कर घुसवून दिली पाहिजे असा घोषा न्यूज चॅनेल्सनी गेल्या आठ नऊ दिवसांत लावला आहे, त्यासाठी घसा ताणून ताणून, आतडी पिळवटून आरडाओरडा केला जात आहे. जो कोण सापडेल त्याला संरक्षण तज्ज्ञ म्हणून पकडून आणून बसवला जात आहे. तेही कमी काय म्हणून चर्चेसाठी पाकिस्तानी पत्रकारांना बोलावले जात आहे, राजकीय पक्षांचे हुशार – अतिहुशार (उत्तम प्रकारे टोलवाटोलवी करणारे) प्रवक्ते असतातच… आणि कोणताही बारीकसारीक जो हाताला सापडेल तो मुद्दा ‘बडा मुद्दा’ म्हणून घेऊन चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवत आहेत. चर्चेचा धुरळा उडवत आहेत. आता तर अशी शंका यायला लागली आहे की ही सर्व अँकर मंडळी, तज्ज्ञ मंडळी आणि प्रवक्ते मंडळी गेले आठ नऊ दिवस घरी गेलीच नसावीत.. स्टुडिओतच मुक्कामाला असावीत! कधी युद्ध सुरु झाल्याची बातमी ‘ब्रेक’ करावी लागेल हे सांगता येत नाही.. त्यातही पहिली कोण ब्रेक करतो आणि आपणच आधी अंदाज वर्तवला होता यासाठी जी श्रेयाची लढाई सुरु होईल ती कदाचित भारत – पाक युद्धापेक्षाही मोठी असेल.
पहिल्या दिवसापासूनच सर्व लहानमोठ्या न्यूज चॅनेल्सना युद्धज्वर चढला आहे. स्क्रीनवर रणगाडे धावतायत, युद्धनौका चालल्यात, क्षेपणास्त्र डागली जात आहेत, तोफा आग ओकतायत, अँकर युद्धभूमीवरील जवानाप्रमाणे त्वेषाने आरडाओरडा करत असतात. एकंदर भारतीय नागरिकांच्या संतापाचा, मानसिकतेचा पुरेपूर लाभ टीआरपीसाठी उठविला जात आहे. त्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यासाठी जेवढा उथळपणा करता येईल तेवढा केला जात आहे. जाहिरातीचे ब्रेक घेत मिळालेल्या अपुऱ्या वेळेत कोणालाही कोणताही मुद्दा व्यवस्थित मांडता येणार नाही, त्यातून सर्वसामान्य माणसाला काही बोध होणार नाही, योग्य ती माहिती मिळणार नाही, केवळ आणि केवळ आरडाओरडा, आरोप प्रत्यारोप, वादावादी यासाठीच या चर्चा घडवून आणल्या जातात असे दिसते . त्यापेक्षा नळावरची भांडणं बरी असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
‘युद्धस्य कथा रम्य:’ असं म्हटलं जातं. युद्धाच्या कथा ऐकायला चांगल्या वाटतात. परंतु त्याचे परिणाम भयंकर असतात. अर्थात त्यामुळे युद्ध करूच नये असे नाही. सामंजस्याने, विवेकाने प्रश्न सोडवला जात नसेल, शत्रूचे शेपूट वाकडंच राहणार असेल तर शेवटी युद्धाशिवाय पर्याय नाही. नाहीतर रावणवध, कौरववध झालाच नसता. परंतु सरकार म्हणून किंवा अगदी लष्कर म्हणून नेहमी दक्ष असलं तरी जेव्हा एखादं युद्ध पुकारण्याची वेळ येते तेव्हा असंख्य बाबींचा, परिणामांचा, विविध प्लॅन्सचा नक्कीच विचार करावा लागतो. शत्रूला धडा शिकवायचा म्हणजे डोकं ठिकाणावर न ठेवता, सारासार विचार न करता, आवश्यक त्या खबरदारी न घेता थेट युद्ध पुकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. शौर्याला संयमाची, चतुर्याची जोड आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईतून हेच शिकण्यासारखे आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
सरकार कोणाचेही असो. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कधी, कोणता निर्णय घ्यायचा हे त्यांनी विचारपूर्वकच ठरवले असणार. कठोर कारवाईची मागणी रास्त आहे. मात्र त्यासाठी सरकारवर, लष्करावर, विविध पातळीवर होणाऱ्या मुत्सदेगिरीवर आपण भरोसा ठेवला पाहिजे. आता युद्ध प्रत्यक्ष रणक्षेत्रात खेळले जाईल असे नाही. विज्ञान – तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की दृष्य स्वरूपात काही कृती दिसणार नाही पण फटका मात्र प्रचंड असेल. कदाचित तो कळायला थोडा वेळही जाईल.
आत्ताच्या घडीला कोणतेच सरकार थंड बसू शकत नाही. त्यामुळे ज्या काही हालचाली चालू आहेत त्यातून काहीतरी मोठे मिशन पार पाडले जाईल असा विश्वास वाटतो. न्यूज चॅनल्स ज्या पद्धतीने युद्धाचा ज्वर वाढवत नेत आहेत, त्यासाठी बारीकसारीक गोष्टींचा किस काढला जात आहे, आगाऊपणा करत सुरक्षा विषयक हलचाली, दृष्य आणि माहिती दिली जात आहे हा पोरकटपणा थांबला पाहिजे. जनतेनेही सरकारवर, लष्करावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कारण नुसतं युद्ध, युद्ध म्हणून बोलणं सोपं आहे पण उद्या वेळ आली तर होणाऱ्या परिणामांची तयारीही असायला हवी.
गेल्या अनेक वर्षांचा वाईट अनुभव, त्रास लक्षात घेऊन भारताने पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा ही प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. मोदी सरकार योग्य वेळी, योग्य ती कारवाई करेल असाही विश्वास आहे.
ता. क. सर्व न्यूज चॅनेल्सनी मुंबई, दिल्ली येथील आपापले भव्यदिव्य, एसी स्टुडिओ सोडून अजून सीमेवर कुठेतरी बंकरमधून आपापले त्याच त्याच बातम्यांचे, चर्चेचे गुऱ्हाळ सुरु केलेले दिसत नाही हे आपले नशीबच समजायचे.
