काँग्रेसचा ‘दुष्काळ’ आणि ‘लक्ष्मी’ चे पाऊल!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
गेल्या 30/35 वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील आय काँग्रेसची परिस्थिती ओसाड माळासारखी झालेली आहे. कार्यकर्त्यांचा दुष्काळ, मतांचा दुष्काळ, तडफदार, धडाडीच्या नेत्यांचा दुष्काळ! जिल्ह्यातील काँग्रेसचं पद म्हणजे ओसाड गावची पाटिलकीच! काम कमी आणि शायनींग जास्त अशा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्यामुळे काँग्रेसची फरफट झालेली आहे. ज्यांना स्वतःच्या घरातील मतं पडत नाहीत किंवा पडणार नाहीत अशी मंडळी वर्षानुवर्षे जिल्ह्याचे नेते, कोणी कोकणचे नेते, कोणी प्रदेशचे नेते म्हणून मिरवतात. सामान्य माणसासाठी कधी रस्त्यावर उतरले नाहीत, खिशात कधी हात घातला नाही (फक्त हात दाखविला), कपड्याची इस्त्री कधी मोडली नाही अशी मंडळी पक्ष कसा वाढवणार? मोठे नेते आले की पुढे पुढे करून, नुसते फोटो काढून पक्ष वाढत नसतो हे अजूनही त्यांना कळलेलं नाही. जिल्ह्याचा विचार केला तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच हाडाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दिसतील. बाकी सर्व असून नसून सारखे.
आज खुद्द काँग्रेसची एखादी ग्रामपंचायत दिसेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर शपथ.. त्यामुळे पंचायत समित्या, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी याबाबत काही बोलायलाच नको. इतकी दयनीय अवस्था आहे. एकेकाळी 1990 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होती. जवळपास सर्व आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, नगरपरिषद, पंचायत समित्या, जिल्हा परिषद यांत काँग्रेसचे वर्चस्व होते. बाकीच्या पक्षांना गावात पाच – पन्नास मतं मिळवण्यासाठी धडपड करावी लागे. ‘ हात ‘ इतका मजबूत होता. मात्र, 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप युती झाली, हिंदुत्वाचे वारे जोरात वाहू लागले आणि प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावातामुळे रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गही भगवामय होऊ लागला. 90 ला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आमदार युतीचे झाले. त्यानंतरच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत युतीने बाजी मारली. 95 ला पुन्हा भगवाच फडकला. राज्यात युतीचे सरकारही आले. या सर्वांचा परिणाम म्हणून काँग्रेसची मुळे कमजोर झाली. खतपाणी घालुनही काही उपयोग झाला नाही. अगदी शरद पवार आणि त्यांचे मातब्बर समर्थक काँग्रेसमध्ये असूनही. 1999 ला तर स्वतः शरद पवार आणि त्यांचे वजनदार समर्थक ‘राष्ट्रवादी’ झाले आणि जिल्ह्यात काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती आली. मधला नारायण राणे यांचा बंडाचा काळ सोडता काँगेसला आजतागायत बाकीच्या पक्षांच्या बरोबरीत येता आलेले नाही. नारायण राणे यांचा काळ हा त्यांच्या स्वतःच्या ताकदीचा भाग जास्त होता. कालांतराने नारायण राणे यांना ‘काँग्रेसी ‘ राजकारणाचा अनुभव आला. ‘थंडा करके खाओ ‘ ही काँग्रेसची नीती राणे यांच्यासारख्याना सूट होणारी नव्हतीच. अर्थात एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेसचा पाया हलला होता. तीच परिस्थिती आज आहे.
प्रदेश पातळीवरूनही रत्नागिरी जिल्ह्यात फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. तीच तीच दोन चार डोकी नेते म्हणून मिरवतात. स्टेज मिळालं की जोरदार भाषणे करतात. झालं.. काँग्रेसचं काम झालं… घरी जायला मोकळे! मधल्या काळात चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, प्रशांत यादव यांच्यासारखी मंडळी काँग्रेसच्या मांडवात फेरी मारून गेली. अविनाश लाड आमदारकीच्या नादात स्वतः संपले. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेनभाई दलवाई कधीतरी चिपळूणला येतात, पत्रकार परिषद घेतात, भाजपवर टीका करतात आणि परत मुंबईला जातात. त्यांचे जुनं मित्रमंडळ भेटलं की काँग्रेस वाढेल असा गोड समज ते आजतागायत बाळगून आहेत. पण तेही आता वयस्कर झालेले आहेत. आता जिल्हा काँग्रेसला जुन्या जाणत्यांचे फक्त आशीर्वाद हवे आहेत. संघटनात्मक कामात ‘ लुडबुड ‘ नको आहे. खेकड्यांचा पाय ओढण्याचा ‘गुण’ सर्वात जास्त कोणी अंगीकरला असेल तर तो काँग्रेसवाल्यांनी. दुसरा जरा काय पुढे जाईल… काँग्रेस नाही वाढली तरी चालेल पण आपला मोठेपणा कमी होता नये. अशा वृत्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते कसा पक्ष वाढवणार. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष वाढले का याचा अभ्यास करायचा सोडून नुसती टीका करण्यात काहीच फायदा नाही हे जेवढं लवकर कळेल तेवढे लवकर बरे दिवस येतील. पण हे इतकं सोपं राहिलेलं नाही. आजार गंभीर आहे. दोनचार गोळ्यांनी बरा होणार नाही. /ऑपरेशनचीच गरज आहे.
आता बरेच दिवसांनी काँग्रेसला दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीसाठी नवे जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत. त्यात प्रामुख्याने युवक उद्योजक असलेल्या आणि युवक काँग्रेसमध्ये सक्रिय राहिलेल्या सोनललक्ष्मी घाग हे नाव जास्त चर्चेत आहे. त्यांची प्रदेश पातळीवर तसेच खुद्द राहुल गांधी यांच्याकडे वट असल्याचे सांगितले जाते. (खरं खोटं त्याच जाणोत) तसं असेल तर त्यांना स्वतःचे नेतृत्व सिद्ध करायची मोठी संधी आहे. माझ्या माहितीत तरी बरेच वर्षांत जिल्हाध्यक्ष म्हणून महिलेला संधी दिलेली नाही.. कोणत्याच पक्षाने. पण काँग्रेसने तशी संधी सोनललक्ष्मी यांना देऊन निर्णय तरी चांगला घेतला आहे . आता या संधीचं सोनं कसं करायचं, शून्यातून पक्ष कसा उभा करायचा, महिला शक्ती काँग्रेसकडे कशी वळवायची याबाबत घाग यांना फार मेहनत घ्यावी लागेल. त्यांच्या कर्तृत्वाचा, संघटन कौशल्याचा कस लागणार आहे. सर्व जुन्या नव्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा समन्वय साधून काम करावे लागेल. साजिद आणि मंडळींच्या पलीकडेही काँग्रेस आहे हे कायम लक्षात ठेवावे लागेल. आणि मुळात जिल्हा पातळीवरचे निर्णय घेण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवावे लागतील. नाहीतर उठसुठ हायकमांडला विचारण्याच्या पद्धतीमुळे काहीच उपयोग होणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आक्रमक व्हावं लागेल, इतर मित्रपक्ष किंवा अगदी विरोधी पक्ष यांच्या भूमिका, धोरणे, स्थानिक राजकारण हे सर्व समजून घेतलं तरच घाग मॅडम काहीतरी करू शकतील. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रत्नागिरीत काँग्रेस ‘ धवल ‘ यश मिळवते की येरे माझ्या मागल्या अशी स्थिती राहते हे आगामी काळात कळेलच. नेतृत्वाचा पहिला कस पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत लागेल.
आत्ता तरी ‘लक्ष्मी’ च्या पावलांनी निदान उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसचा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दक्षिणेत रमेश कीर आणि हुस्नबानू खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे भविष्य ठरेल.
ता. क. जुन्या खोडानीही नव्या दमाच्या झाडांना पोषक द्रव्य मिळतील असे पहावे. अजून आपलंच पोषण व्हावं म्हणून धडपडू नये. तरच काँग्रेस वाढेल.. नाहीतर हातात धुपाटणे आहेच कायमचे!
