राजकीय ‘खोती’!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
आपल्या तेजस्वी विचारांची मशाल अखंड तेवत ठेवणारे आमदार भास्करराव जाधव आणि गुहागर तालुक्यातील ब्राह्मण समाज यांच्यात ‘ खोती ‘ वरून वाद सुरु झाला आहे तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हल्ली बरेच वर्षांत खोती हा शब्द तसा फारसा चर्चेत नव्हता किंवा आठवणीतही नव्हता. पण मराठी भाषेतील जुने शब्द विस्मरणात जाऊ नयेत, तरुण पिढीलाही हे शब्द कळावेत असा जाधव यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि खरं तर याच उदात्त हेतूने त्यांनी ‘ खोती ‘ चा उल्लेख केला होता. खोतीचा उल्लेख करून कोणत्या समाजाच्या भावना दुखवाव्यात, समाजासमाजात तेढ, द्वेष वाढीस लावावा, त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधावा असा पुसटसा विचारही त्यांच्या मनात येऊ शकत नाहीत. त्यांना गेली चाळीस वर्षे ओळखणारे हे ठामपणे सांगू शकतात. बाकीचे राजकारणी स्वार्थासाठी असले उद्योग करू शकतात, पण भास्करराव असं कदापि करणार नाहीत. त्यांच्याइतका साधा सरळ, निस्वार्थी, सज्जन राजकीय नेता कोकणात तरी कोणी झाला असेल किंवा होईल असे वाटत नाही.
त्यांचे राजकारण हे समाज हितासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी असते. इतकेच नाही तर कोकण विकासाचे ‘स्वप्नं’ ते कायम पाहत असतात. आज गुहागरमध्ये रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन, सहकारी संस्था, शैक्षणिक सुविधा, रोजगार निर्मिती यात जी अलौकिक प्रगती झालेली आहे ती पाहून कौतुक करण्याऐवजी काही नतद्रष्ट लोकं त्यांच्यावर नानाविध आरोप करतात हे अत्यंत चुकीचे आहे असे मला ठामपणे वाटते. निवडणूक काळात त्यांच्याविरोधात शेकडो एकर जमिनीचा, सर्व प्रकारची कंत्राटे आपल्याच कुटुंबातील सदस्यांना घेत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. पण तो चुकीचा आहे. ओसाड जमिनीवर झाडंमाडं, बंगले उभारून त्याचा उपयोग कसा करावा हे दाखविण्याचा व त्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी असा त्यांचा प्रामाणिक हेतू असावा तसेच कंत्राटे घेऊन आपण आपलं कुटुंब कसं सक्षम करावे, आर्थिक उन्नती कशी साधावी ह्याचं प्रात्यक्षिक तरुण कार्यकर्त्यांना दाखवावं इतकी साधीसरळ भावना त्यांची असेल याबाबत माझ्या आणि त्यांच्या हजारो समर्थकांच्या मनात अजिबात शंका नाही.
त्यांच्याइतका निष्ठावंत नेता नाही. स्वतःच्या कातड्याचे जोडे करून बाळासाहेब ठाकरेंना देण्याचे त्यांचे वाक्य आणि त्यासाठीच्या टाळ्या आजही माझ्या स्मरणात आहेत. (संदर्भ : भगवा सप्ताह) शरद पवारांनाही त्यांनी खूपच साथ दिली. त्यामानाने पवार साहेबांनी आमदारकी, अध्यक्षपद, मंत्रीपद असं थातुरमातुर देऊन जाधव यांची बोळवण केली. आजही त्याचं शल्य अनेकांना वाटतं. पक्ष बदलला म्हणजे स्वार्थ असतोच असं नाही. जाधव यांनी काळजावर दगड ठेऊन केवळ आणि केवळ चिपळूण, गुहागर आणि थोडासा खेड येथील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी पक्ष बदलला. त्येवळच्या त्यांना झालेल्या यातना, डोळ्यात आलेले अश्रू हे त्यांच्या अगदी जवळच्या लोकांनाच दिसू शकले. आपल्याला मात्र ते भाग्य लाभले नाही. बाकीच्याना फक्त भास्करराव कडक, स्पष्ट, रोखठोक बोलतात एवढंच दिसतं. पण त्यांची जनतेप्रति, कार्यकर्त्यांप्रति असलेली तळमळ कोणाला दिसत नाही. मधल्या काळात ते राजकीय संन्यास घेण्याची भाषा बोलू लागले आणि संपूर्ण राज्यात हलकल्लोळ माजला. चिपळूण गुहागरमध्ये तर लोकांना वेड लागायची वेळ आली होती. काहींना धरणीकंप झाल्यासारखं वाटू लागलं. आता आपलं काय होणार, आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करणार, राज्याला विरोधी पक्षनेता मिळाला नाही तर राज्याचे काय होणार या चिंतेने सर्वांना ग्रासून टाकले. पण शेवटी भास्कररावांना जनतेचे दुःख कळले आणि त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय क्षणार्धात बदलला. ते मोठ्या तयारीने, उत्साहाने विधानसभा अधिवेशनासाठी गेले आणि त्वेशाने लढले, सरकारला धारेवर धरले. वास्तवात विरोधी पक्षनेतेपद नसले तरी त्यांनी ते आपल्याकडे आहे, आपण जनतेचे रक्षणकर्ते आहोत या भावनेने कामकाज केले.
राजकीय संन्यास घेतला असता तर त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली असती असंही अनेकांना वाटत होतं. नकला हा प्रकार कोणाची चेष्टा करण्यासाठी नाही तर ही कला टीकावी, वाढावी या चांगल्या हेतूने ते प्रचारसभेत, मेळाव्यात, अधिवेशनात नकला करत असतात हे त्यांच्यावर जळणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. भास्करराव राजकारणात नसते आले तर कदाचित रंगभूमीवर त्यांनी नटसम्राट होण्याचा मान मिळवला असता. पण शेवटी काय.. मराठी रंगभूमीचे दुर्दैव!
कोणतीही चूक केली तरी माणसं हट्टीपणा कायम ठेवतात. मोठ्या मनाने माफी मागावी हे त्यांना कळतंच नाही. त्यातून शत्रूत्व वाढतं. पण, भास्करराव याबाबतीत फारच वेगळे. चूक झाली तर ते मोठ्या मनाने, खळखळ न करता माफी मागून मोकळे होतात. त्यांचं मन खूप विशाल आहे. त्याचा तळ गाठणं आपल्यासारख्या सर्वसामान्य कुवतीच्या लोकांचे काम नाही.
राजकारणात सर्व पदे मलाच मिळाली पाहिजेत, सर्व कंत्राटे मलाच मिळाली पाहिजेत अशी जी ‘ आधुनिक खोती ‘ राजकारणात आली आहे त्यापासून ते दूर राहिले आहेत. अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत आपले तन, मन, धन अर्पण करून जनतेची सेवा करायची एवढं एकच ध्येय त्यांनी उराशी बाळगले आहे. आपला मुलगाच राजकीय वारसदार असला पाहिजे अशा पद्धतीची जी नवी ‘ खोती ‘ पद्धत रूढ झाली आहे त्याला जाधव यांचा कडाडून विरोध आहे. सामान्य, गरीब शिवसैनिक किंवा त्यावेळी जो पक्ष असेल त्या पक्षाचा कार्यकर्ता गुहागर, चिपळूणचा आमदार करायचा म्हणजे करायचाच हा त्यांचा प्रण आहे. त्यासाठी ते जीवाचे रान करतील एवढा ठाम विश्वास माझ्यासह असंख्य जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना, त्यांना चांगले ओळखणाऱ्यांना आहे. आणि म्हणूनच गुहागरमधील खोतीचा विषय ताणला जाऊ नये. जे लोकं जाधव यांना सोडून जातात किंवा गेलेत त्यांचा भास्कररावांवर अजिबात राग नाही. उलट जाधव यांना नवीन ताकदीचे कार्यकर्ते उभे करण्याची संधी मिळावी, त्यांच्या स्वाभिमानी, लढाऊ संघटन कौशल्याला वाळवी लागू नये हिच त्यांची भावना असते. त्यातूनच भास्करराव जाधव यांचे नेतृत्व तळपत राहते. त्यामुळे या ‘विकास सूर्या’ ला कोणी ग्रहण लावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करावेसे वाटते. अर्थात एक मात्र आहे…नियतीच्या मनात काय आहे हे आपणास कसे कळणार.. तिच्या नियोजनानुसार प्रत्येकाला सु्बुद्धी किंवा दुर्बद्धी सुचत असते!
